खालच्या पातळीवरील टीका टाळा, महिलांचा सन्मान राखा, मुख्य निवडणूक आयुक्तांकडून कारवाईच्या सूचना
By ऑनलाइन लोकमत | Published: November 9, 2024 05:06 PM2024-11-09T17:06:35+5:302024-11-09T17:06:58+5:30
Maharashtra Assembly Election 2024: विधानसभा निवडणुकीत महिला उमेदवारांविरोधात अशोभनीय वक्तव्य केल्याबाबत निवडणूक आयोगाने कडक भूमिका घेतली आहे. याशिवाय महिलांबाबत आक्षेपार्ह टीका करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याच्या सूचनाही दिल्या आहेत.
मुंबई - विधानसभा निवडणुकीत महिला उमेदवारांविरोधात अशोभनीय वक्तव्य केल्याबाबत निवडणूक आयोगाने कडक भूमिका घेतली आहे. याशिवाय महिलांबाबत आक्षेपार्ह टीका करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याच्या सूचनाही दिल्या आहेत.
विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने राजीव कुमार यांनी राज्यातील सर्व जिल्हा निवडणूक अधिकारी, २८८ मतदारसंघांचे निवडणूक निर्णय अधिकारी, पोलिस अधिकारी यांच्याशी ऑनलाइन संवाद साधला.
प्रचाराची पातळी सोडली जात असेल तर कोणत्याही राजकीय पक्षाचा मुलाहिजा न ठेवता कारवाई करा. महिलांच्या सन्मान आणि प्रतिष्ठेला ठेच पोहोचेल अशी कोणतीही विधाने करू नयेत. सर्व नेते आणि कार्यकर्ते यांच्या खासगी जीवनाशी संबंधित मुद्यांवरून टीका करू नये, असे त्यांनी बजावले.
सर्वच राजकीय पक्ष आणि उमेदवारांबाबत अधिकाऱ्यांनी समान दृष्टिकोन बाळगावा, कोणताही भेदभाव करू नये, तसे केल्यास कारवाईला सामोरे जावे लागेल, असा इशाराही राजीव कुमार यांनी दिला.
मतदानाचा टक्का वाढला पाहिजे
बस्तर, गडचिरोलीसारख्या नक्षलग्रस्त भागात ७० टक्क्यांहून अधिक मतदान होते, काश्मीरसारख्या दहशतवादग्रस्त भागात भरभरून मतदान झाले, पण मुंबई, पुणे, ठाण्यासारख्या शहरी भागांमध्ये
४०-४५ टक्क्यांवर मतदान होत नाही याबद्दल राजीव कुमार यांनी खंत व्यक्त केली. शहरी मतदारांना मतदानासाठी प्रोत्साहित करण्याचे आवाहन त्यांनी केले. निवडणुकीतील सर्वच गैरप्रकार रोखण्यासाठी कठोर कारवाई करा असे निर्देश त्यांनी दिले.