“रवी राणा यांच्यामुळेच नवनीत राणा खासदार होऊ शकल्या नाहीत”; बच्चू कडूंचा थेट प्रहार
By ऑनलाइन लोकमत | Published: October 18, 2024 10:18 AM2024-10-18T10:18:59+5:302024-10-18T10:19:41+5:30
Maharashtra Assembly Election 2024: नवनीत राणा यांना खुद्द रवी राणा यांनी खासदार होऊ दिले नाही, अशी टीका बच्चू कडू यांनी केली.
Maharashtra Assembly Election 2024: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजला आहे. महाराष्ट्रात २० नोव्हेंबरला मतदान होणार असून २३ नोव्हेंबरला निकाल जाहीर होणार आहेत. आचारसंहिता लागू होताच राज्यातील राजकारणाला वेग आला आहे. महायुती आणि महाविकास आघाडीला सक्षम पर्याय तसेच तगडी टक्कर देण्याच्या उद्देशाने परिवर्तन महाशक्ती नावाची तिसरी आघाडी निवडणूक रिंगणात उतरली आहे. या आघाडीत बच्चू कडू, राजू शेट्टी यांच्यासह स्वराज्य पक्षाचे प्रमुख युवराज संभाजीराजे छत्रपती यांचाही समावेश आहे. तिसऱ्या आघाडीचे नेते बच्चू कडू यांनी रवी राणा आणि नवनीत राणा यांच्यावर टीका केली आहे.
परिवर्तन महाशक्तीमध्ये समविचारी अशा तब्बल ३० ते ४० संघटना सहभागी झाल्या आहेत. आमचे सर्वांचे विधानसभेच्या १५० जागांवर एकमत झाले आहे. स्वराज्य पक्षाच्या कार्यालयात परिवर्तन महाशक्ती आघाडीतील राजू शेट्टी, बच्चू कडू, संभाजीराजे तसेच शंकरअण्णा धोंडगे, वामनराव चटप व अन्य संघटनांचे प्रतिनिधींची एक बैठक झाली.
रवी राणा यांच्यामुळेच नवनीत राणा खासदार होऊ शकल्या नाहीत
अलीकडेच झालेल्या लोकसभा निवडणुकीत नवनीत राणा यांचा पराभव झाला. अमरावतीच्या जागेवरून बच्चू कडू नाराज असल्याची चर्चा होती. यानंतर आता बच्चू कडू यांनी पुन्हा एकदा रवी राणा आणि नवनीत राणा यांच्यावर टीका केली. नवनीत राणा यांना खुद्द रवी राणा यांनी खासदार होऊ दिले नाही. नवनीत राणा या खासदार होऊ नये, याला रवी राणा हेच जबाबदार आहेत. एखाद्याला निवडणूक लढायची असते तेव्हा सगळ्यांना समजून घ्यायला हवे, असा टोला बच्चू कडू यांनी लगावला. तसेच अमरावती येथील सगळ्या भाजपाच्या नेत्यांशी रवी राणांनी वैर घेतले होते. त्यांच्याशी वाद घातला होता. त्यामुळेच नवनीत राणा यांचा पराभव झाला. आता विधानसभेला काय होते ते बघा, असे बच्चू कडू यांनी सांगितले.
दरम्यान, मी महाविकास आघाडी सोडली. कारण त्यांच्या सत्तेच्या काळात त्यांनी शेतकऱ्यांचे अहित करणारे अनेक निर्णय घेतले. ऊसाच्या एफआरपीची मोडतोड करण्याचे काही कारण नव्हते व तसा अधिकारही त्यांना नव्हता. तरीही तो निर्णय त्यांनी घेतला. शरद पवार कसे परिवर्तन करणार? तो तर आमचा अधिकार आहे व आम्हीच ते करू अशा शब्दांमध्ये शेतकरी नेते माजी खासदार राजू शेट्टी यांनी शरद पवार यांच्यावर टीका केली.