"लाडकी बहिण म्हणायचं अन्..."; मुलीवर गुन्हा दाखल होताच बाळासाहेब थोरात यांची संतप्त प्रतिक्रिया, स्पष्टच बोलले
By ऑनलाइन लोकमत | Published: October 27, 2024 05:20 PM2024-10-27T17:20:31+5:302024-10-27T17:21:56+5:30
Maharashtra Assembly Election 2024: 'लाडकी बहना म्हणायचं आणि बहिणीचे हे हाल करायचे'. मतासाठी काही करता," असे म्हणत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
संगमनेरमधील धांदरफळ बुद्रुक येथे माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांच्या प्रचार सभेत भाजप नेते वसंतराव देशमुख यांनी बाळासाहेब थोरात यांच्यासह त्यांची कन्या डॉ. जयश्री थोरात यांच्यासंदर्भात आक्षेपर्ह वक्तव्य केले होते. जयश्री थोरात यांच्यासंदर्भातील या वक्तव्याच्या निषेधार्थ थोरात समर्थकांनी शनिवारी येथील पोलिस ठाण्याबाहेर आठ तास ठिय्या आंदोलनही केले. यानंतर पोलिसांनी वसंत देशमुख यांच्यावर गुन्हा दाखल करत त्यांना पुण्यातून ताब्यातही घेतले. याच बरोबर, आचारसंहिता असताना जमावबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी जयश्री थोरात यांच्यासह 50 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामुळे संगमनेरमधील राजकीय वातावरण तापले आहे. यावर आता, 'लाडकी बहना म्हणायचं आणि बहिणीचे हे हाल करायचे'. मतासाठी काही करता," असे म्हणत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
यावर बोलताना थोरात म्हणाले, "संपूर्ण महाराष्ट्राने सभेतील ते वक्तव्य बघितले. त्याला प्रोत्साहन देणारे हे विखेच होते. हे काही नाकारता येणार नाही. त्यांनी वक्तव्य केले. तो गुन्हेगार आहे, यासाठी त्याला शिक्षाकरण्याऐवजी, आता त्यांनी जयश्रीवरच गुन्हा दाखल केला आहे. म्हणजे आपले प्रशासन कोणत्या दिशेने चालेल आहे. हे वेगळे सांगण्याची गरज आहे, असे मला वाटत नाही. आता प्रशानस चोराला पकडण्याऐवजी ज्याची चोरी झाली आहे, त्यालाच पकडायला निघाले आहेत, असे चित्र दिसत आहे. म्हणजे गुन्हेगाराला पकडण्याएवजी, ज्याला त्रास झाला त्यालाच पकडायला निघाले आहेत, अशी अवस्था आहे."
"लाडकी बहना म्हणायचं अन्..." -
थोरात म्हणाले, "त्या मुलीवर गुन्हा दाखल करत आहेत, तिच्या सहकाऱ्यांवर गुन्हा दाखल करत आहेत. हे अत्यंत पराकोटीचं दुर्दैवी असे कृत्य प्रशासन करत आहे. हे निषेधार्ह आहे. असे आहे की, हे त्यांचे सर्व सहकारी असतील, प्रक्षोभ तर होणारच ना मनामध्ये. म्हणून एकत्र आलेतर गुन्हा दाखल होऊ शकतो. ही तर आश्चर्यकारकच गोष्ट आहे आणि माझी जनता तर निषेध करेलच, पण महाराष्ट्रातील जनतासुद्धा महायुतीचा निषेध केल्याशिवाय राहणार नाही आणि ते आपल्याला मतांच्या रुपाने दिसल्याशिवाय राहणार नाही. एवढेच नाही तर, 'लाडकी बहना म्हणायचं आणि बहिणीचे हे हाल करायचे'. मतासाठी काही करता," असेही थोरात यांनी म्हटले आहे. ते मुंबईत एबीपी माझासोबत बोलत होते.
तर जनता धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही -
मुलीवरील टीकेसंदर्भात बोलताना थोरात म्हणाले, "जी टीका केली गेली, तिची जी हीन आणि गलिच्छ पातळी आहे, गेल्या पाच वर्षांत महाराष्ट्रातील राजकारणातील भाषणाची, बोलण्याची पातळी बदलली होती. त्या पातळीचा शेवट, तळ गाठला गेलाय आता. एवढ्या वाईट पातळीवर जाऊन ते भाषण केलं गेलं आहे. आता मुली म्हणून मला वाईट वाटणे सहाजिकच आहे. ती फार भक्कम आहे. ठीक आहे तिची लढण्याची तयारी आहे. राजकारणात ते असावेही. तीने ते सर्व करण्याची तयारीही ठेवली आहे. परंतू केवळ त्या मुलीसाठी वाईट वाटते असे नाही. तर त्यांनी संपूर्ण महिला वर्गालाच शिवी दिली आहे, असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. तुम्ही लाडकी बहिण म्हणायचं आणि बहिणींनाच शिव्या द्यायच्या, एवढ्या वाईट पद्धतीने बोलायचे, हे जर महायुतीचे धोरण असे, तर जनता त्यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही."