“उद्धव ठाकरे केवळ २ वेळा आले, भेटीसाठी १० मिनिटे वेळ दिला नाही”; महंतांचा ठाकरे गटाला रामराम

By ऑनलाइन लोकमत | Published: October 23, 2024 12:40 PM2024-10-23T12:40:40+5:302024-10-23T12:41:06+5:30

Maharashtra Assembly Election 2024: पक्षवाढीसाठी राज्यभर दौरे केले. बंजारा समाजात नवचैतन्य आणले. गेल्या १० महिन्यात हजारो मेसेज, फोन केले. परंतु, भेटीबाबत अद्यापही कोणताचा रिप्लाय आला नाही, असा दावा बंजारा समाजाच्या महंतांनी केला आहे.

maharashtra assembly election 2024 banjara samaj mahant sunil maharaj criticized uddhav thackeray and likely left the thackeray group party | “उद्धव ठाकरे केवळ २ वेळा आले, भेटीसाठी १० मिनिटे वेळ दिला नाही”; महंतांचा ठाकरे गटाला रामराम

“उद्धव ठाकरे केवळ २ वेळा आले, भेटीसाठी १० मिनिटे वेळ दिला नाही”; महंतांचा ठाकरे गटाला रामराम

Maharashtra Assembly Election 2024: महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली असून, राजकीय घडामोडींना मोठा वेग आल्याचे पाहायला मिळत आहे. भाजपाने ९९ जणांची यादी जाहीर करत बाजी मारल्यानंतर शिवसेना शिंदे गट आणि मनसेने उमेदवारी यादी जाहीर केली आहे. यानंतर आरोप-प्रत्यारोप, दावे-प्रतिदावे केले जात आहेत. यातच महाविकास आघाडीचा फॉर्म्युला अखेर ठरला असून, लवकरच उमेदवारी यादी येऊ शकते, असे म्हटले जात आहे. या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर बंजारा समाजाच्या महंतांनी ठाकरे गटाला सोडचिठ्ठी देण्याचा निर्णय घेतल्याचे समजते.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली १३ खासदार आणि ४० आमदारांनी बंडखोरी केली आणि नवीन पक्ष स्थापन केला. उद्धव ठाकरे यांच्याकडून केवळ पक्ष नव्हे, तर पक्षचिन्हही हिसकावून घेतले. अशा परिस्थिती प्रामाणिक आणि स्वच्छ प्रतिमेचे नेते उद्धव ठाकरे यांना सहकार्य करावे. समाजाचे त्यांच्या माध्यमातून भले व्हावे, समाजाला न्याय मिळावा, या उद्देशाने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षात प्रवेश केला. यानंतर पक्षवाढीसाठी राज्यभर दौरे केले. समाजात नवचैतन्य निर्माण केले, असा दावा पोहरादेवी येथील बंजारा समाजाचे महंत सुनील महाराज यांनी केला. 

गेल्या १० ते १२ महिन्यांपासून मला एकदाही वेळ दिलेली नाही

एका बाजूला माझे हे काम सुरू असताना उद्धव ठाकरे एकदा पोहरादेवीच्या दर्शनाला आले. त्यानंतर जनसंवाद यात्रेला संबोधित करण्यासाठी करंजा, वाशिमला आले. अनेकदा उद्धव ठाकरे यांना मेसेज केले. पक्षवाढीसाठी आणि समाजाच्या हितासाठी आम्हाला एकदा तुमची भेट हवी आहे. उद्धव ठाकरे यांच्या पीए यांना हजारो वेळा मेसेज टाकले, फोन केले. परंतु, गेल्या १० ते १२ महिन्यांपासून मला एकदाही वेळ दिलेली नाही. माझ्या फोनना, मेसेजला, विनंतीला कोणताच रिप्लाय देण्यात आलेला नाही, अशी हकिकत महंत सुनील महाराज यांनी कथन केली.

दरम्यान,  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केली असली तरी ते खरोखरच बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांवर चालणारे आहे, हे माझ्या लक्षात आले. विधानसभा निवडणुकीची तिकीटे, उमेदवारी जाहीर होत आहे. परंतु, ठाकरे गटाची बंजारा समाजाला प्रतिनिधित्व द्यायची तयारी किंवा इच्छा दिसत नाही. शरद पवार यांनी बंजारा समाजाच्या दोन जणांना उमेदवारी दिली आहे, त्याबाबत त्यांचे आभार मानतो. परंतु, ठाकरे गटात बंजारा समाजाला न्याय मिळाला नाही. त्यामुळे ठाकरे गटातून बाहेर पडत आहे, असे महंत सुनील महाराज यांनी स्पष्ट केले आहे. येत्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बंजारा महंत सुनील महाराज  यांनी हा निर्णय घेतल्याने याचा फटका महाविकास आघाडीला बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
 

Web Title: maharashtra assembly election 2024 banjara samaj mahant sunil maharaj criticized uddhav thackeray and likely left the thackeray group party

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.