निवडणुकीच्या घोषणेपूर्वी भाजपानं सोडवला मोठा तिढा? महायुतीबाबत महत्त्वाची माहिती समोर
By ऑनलाइन लोकमत | Published: October 15, 2024 12:23 PM2024-10-15T12:23:32+5:302024-10-15T12:23:58+5:30
Maharashtra Assembly Election 2024: सत्ताधारी महायुतीमधील भाजपा, शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने जागावाटप जवळपास पूर्ण केल्याचं वृत्त आलं आहे. महायुतीमधील नेत्यांनी याबाबतचे संकेत दिले आहेत.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचं बिगुल आज वाजण्याची शक्यता आहे. आज संध्याकाळी होणाऱ्या केंद्रीय निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेमधून विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता आहे. दरम्यान, निवडणुकीच्या घोषणेपूर्वी सत्ताधारी महायुती आणि विरोधी पक्षांमधील महाविकास आघाडीमध्ये बैठकांना जोर आला आहे. त्यातच सत्ताधारी महायुतीमधीलभाजपा, शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने जागावाटप जवळपास पूर्ण केल्याचं वृत्त आलं आहे. महायुतीमधील नेत्यांनी याबाबतचे संकेत दिले आहेत.
भाजपामधील सूत्रांनी सांगितलं की, महायुतीमधील जागावाटपाची प्रक्रिया जवळपास पूर्ण झाली असून, भाजपा राज्यामधील २८८ पैकी १५८ जागांवर लढेल. तर शिवसेना शिंदे गटाला ७० आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट ५० जागा देण्याचा प्रस्ताव भाजपाकडून देण्यात आला आहे. तर विधानसभेसाठी शिंदे गटाने ९० तर अजित पवार गटाने ७० जागांची मागणी केली होती. मात्र त्यांना आता अपेक्षेपेक्षा कमी जागांवरच समाधान मानावे लागण्याची शक्यता आहे.
भाजपाच्या सोमवारी दिल्लीत झालेल्या बैठकीमध्ये विधानसभा निवडणुकीबाबत काही महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले आहेत. या बैठकीनंतर भाजपाने मुख्यमंत्रिपदासाठी कुठलाही चेहरा न देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीपर्यंत एकनाथ शिंदे हेच मुख्यमंत्रिपदाचा चेहरा राहणार आहेत. दिल्लीमध्ये झालेल्या या बैठकीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी सहभाग घेतला होता. त्याशिवाय भाजपाचे महाराष्ट्रातील प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, देवेंद्र फडणवीस आणि पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे हेही उपस्थित होते.
यावेळी विधानसभा निवडणुकीसाठी महायुतीकडून एक ब्लूप्रिंट तयार करण्यात आली आहे. तसेच त्यामधून महायुतीसमोर येणाऱ्या आव्हानांवर तोडगा काढण्यात आला आहे. त्यात महायुतीमधील सहकाऱ्यांकडून करण्यात आलेली अधिक जागांची मागणी, त्यात अजित पवार गटाला अधिकाधिक जागा देण्यास भाजपामधून असलेला विरोध यांचा समावेश आहे.