भाजप+ १५०; काँग्रेस १०० पार; तर शिंदेसेनेने दिले ८० उमेदवार; भाजपच्या नेत्यांना शिंदेसेनेकडून उमेदवारी
By ऑनलाइन लोकमत | Published: October 29, 2024 05:48 AM2024-10-29T05:48:45+5:302024-10-29T06:54:38+5:30
Maharashtra Assembly Election 2024 : मित्रपक्षांना भाजपने ४, शिंदेसेनेेने २ दिल्या जागा
Maharashtra Assembly Election 2024 : मुंबई : विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने २५, शिंदेसेनेने १५ तर काँग्रेसने ४ उमेदवारांची यादी सोमवारी जाहीर केली. भाजपने आतापर्यंत १४६ उमेदवार जाहीर करीत ४ जागा मित्रपक्षांसाठी सोडल्या. यासह भाजप आतापर्यंत १५० जागांवर पोहोचला आहे. तर काँग्रेसही १०२ जागांवर पोहोचला आहे. मविआमध्ये काँग्रेस सर्वाधिक जागा लढत असल्याचे यातून स्पष्ट झाले आहे. शिंदेसेनेने आजच्या यादीसह एकूण ८० उमेदवार रिंगणात उतरविले असून त्यात काही भाजप नेत्यांनाही संधी दिली आहे.
भाजपने दादाराव केचे (आर्वी), विकास कुंभारे (मध्य नागपूर), डॉ. संदीप धुर्वे (आर्णी), नामदेव ससाणे (उमरखेड) व सुनील राणे (बोरिवली) यांचे तिकीट कापले. मात्र, हरीश पिंपळे (मूर्तिजापूर), भारती लव्हेकर (वर्सोवा), पराग शाह (घाटकोपर पूर्व), राम सातपुते (माळशिरस) यांना पुन्हा संधी दिली. चंद्रपूरचे अपक्ष आमदार किशोर जोरगेवार आणि काँग्रेसमधून आलेले माजी आमदार जितेश अंतापूरकर (देगलूर) यांनाही उमेदवारी दिली.
रा. स्व. संघाचे मुख्यालय ज्या मध्य नागपूर मतदारसंघात येते तेथील विद्यमान आमदार विकास कुंभारे यांना उमेदवारी नाकारली. तेथे माजी महापौर प्रवीण दटके यांना उमेदवारी दिली.
भाजपने आतापर्यंत राज्यात १४६ उमेदवार जाहीर केले आहेत. त्यात ९३ विद्यमान आमदारांचा समावेश आहे. वसईमधून उमेदवारी मिळालेल्या स्नेहा दुबे या माजी आमदार व श्रमजीवी संघटनेचे नेते विवेक पंडित यांच्या कन्या आहेत.
फडणवीसांचे दुसरे पीए रिंगणात
देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांचे पीए राहिलेले अभिमन्यू पवार हे २०१९ मध्ये औसामधून लढले आणि जिंकले होते. आता फडणवीस यांचे सहा महिने पूर्वीपर्यंत पीए असलेले सुमित वानखेडे यांना आर्वीतून (जि.वर्धा) उमेदवारी देण्यात आली आहे. आर्वीमध्ये शरद पवार गटाने वर्धेचे खासदार अमर काळे यांच्या पत्नी मयुरा काळे यांना उमेदवारी दिली आहे.
...या चार जागा मित्रपक्षांना
भाजपने बडनेराची जागा युवा स्वाभिमानीला, गंगाखेडची जागा राष्ट्रीय समाज पक्षाला, कलिना; मुंबईची जागा रिपब्लिकन पक्षाला, तर शाहुवाडीची जागा जनसुराज्य पार्टीला सोडली आहे. बडनेरामध्ये रवि राणा, गंगाखेडमध्ये रत्नाकर गुट्टे, तर शाहुवाडीत विनय कोरे हे उमेदवार असतील.
लोकसभेपूर्वी काँग्रेस सोडली, आता ‘भाजप’चे उमेदवार : माजी आमदार दिवंगत रावसाहेब अंतापूरकर (काँग्रेस) यांच्या निधनानंतर त्यांचे पुत्र जितेश काँग्रेसकडून पोटनिवडणूक लढले आणि जिंकले होते. लोकसभा निवडणुकीपूर्वी त्यांनी ‘भाजप’मध्ये प्रवेश केला. ‘भाजप’ने त्यांना देगलूरमध्ये उमेदवारी दिली.
लातूरमध्ये चाकूरकर-देशमुख सामना : लातूर शहरमध्ये भाजप उमेदवार अर्चना पाटील-चाकूरकर या माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील-चाकूरकर यांच्या सून आहेत. त्यांचा सामना काँग्रेसचे अमित देशमुख यांच्याशी होईल.