“शरद पवार ४ वेळा CM, केंद्रात-राज्यात एकच सत्ता, तरी राज्याचा विकास केला नाही”: उदयनराजे
By ऑनलाइन लोकमत | Published: October 18, 2024 04:06 PM2024-10-18T16:06:38+5:302024-10-18T16:13:29+5:30
Maharashtra Assembly Election 2024: शरद पवारांच्या कार्यकाळात राज्य मागे पडले. राज्याला विकासापासून कायम दूर ठेवले. फक्त निवडणुकीपुरता छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार जनतेसमोर मांडला, अशी टीका उदयनराजे यांनी केली.
Maharashtra Assembly Election 2024: भाजपा आणि महायुतीने सर्व समाजाला एकसंध ठेवण्याचे आणि सर्व समाजाचे कल्याण करण्याचे काम केले. युवकांपासून वृद्धांपर्यंत आणि महिलांसाठी अनेक योजना सुरू केल्या. शरद पवारांनी फक्त निवडणुकीपुरता छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार जनतेसमोर मांडला. समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचे काम केले. याबाबत शरद पवार यांनी आत्मपरीक्षण करावे. देशातील अन्य छोट्या राज्यातून आलेल्या नेत्यांनी त्यांची राज्ये विकसित केली आहेत, ते नेते वरिष्ठ पदावर गेले. पण शरद पवार हे करू शकले नाहीत, या शब्दांत भाजपा खासदार उदयनराजे यांनी शरद पवार यांच्यावर टीकास्त्र सोडले.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजला आहे. महाराष्ट्रात २० नोव्हेंबरला मतदान होणार असून २३ नोव्हेंबरला निकाल जाहीर होणार आहेत. आचारसंहिता लागू होताच राज्यातील राजकारणाला वेग आला आहे. यातच सर्वच पक्षांच्या सभा, मेळावे, बैठकांचे सत्र सुरू झाले आहे. जागावाटप अंतिम होऊन उमेदवारी याद्या जाहीर झाल्या की, प्रचाराचा जोरदार धडका सुरू झाल्याचे पाहायला मिळेल. यातच एका मेळाव्यात बोलताना उदयनराजे यांनी शरद पवार यांच्यावर हल्लाबोल केला.
शरद पवारांच्या कार्यकाळात महाराष्ट्र राज्य मागे पडले
जी कामे भाजप महायुतीच्या कालावधीत झाली, ती शरद पवारांच्या प्रदीर्घ राजकीय कालावधीत का होऊ शकली नाहीत, याचा विचार जनतेने करायला हवा. शरद पवार यांनी राज्याला विकासापासून कायम दूर ठेवत स्वत:च्या राजकीय फायद्यासाठी राज्यात जाती-जातींमध्ये भांडण लावण्याचे ठोस काम केले, असा आरोप उदयनराजे यांनी केला. तसेच शरद पवार चारवेळा मुख्यमंत्री झाले. तेव्हा केंद्रात आणि राज्यामध्ये एकच सत्ता होती. असे असले तरी शरद पवारांच्या कार्यकाळात आपले राज्य मागे पडले. अन्य छोटी छोटी राज्ये महाराष्ट्राच्या पुढे गेली. याला सर्वस्वी शरद पवार जबाबदार आहेत, या शब्दांत उदयनराजे यांनी घणाघात केला.
दरम्यान, शरद पवार यांनी राज्यात कृष्णा खोरे, दुष्काळी जलसिंचन, औद्योगिकीकरण, पाणी प्रश्न, रस्ते विकासापासून महाराष्ट्राला वंचित ठेवले. राज्यासाठी कोणतेही मोठे विकासाचे काम केले नाही. आपल्याकडून हे का घडू शकले नाही, याचा विचार त्यांनी करावा. राज्यात दुजाभाव निर्माण करण्याचे काम केले. छत्रपती शिवाजी महाराजांचा सर्वधर्मसमभावाचा विचार त्यांनी पायदळी तुडवला. शाहू-फुले-आंबेडकरांचे नाव घ्यायचे आणि सतत समाजाला फसविण्याचे काम शरद पवारांनी केले. सत्ता आणि सत्तेच्या माध्यमातून स्वतःला आणि स्वतःची हुजरेगिरी करणाऱ्या कार्यकर्त्यांना मोठे केले. निवडणूक येतील जातील पण समाजात हे विष कालवण्याचे काम केले त्याबद्दल त्यांना भविष्य माफ करणार नाही. समाजाची दिशाभूल करू नये, या शब्दांत उदयनराजे यांनी निशाणा साधला.