शिंदेंच्या शिवसेनेत गेलेल्या बच्चू कडूंच्या आमदाराचा महायुतीत पत्ता कट
By ऑनलाइन लोकमत | Published: October 26, 2024 08:50 PM2024-10-26T20:50:04+5:302024-10-26T20:50:57+5:30
Mla Rajkumar Dayaram Patel: २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत बच्चू कडू यांच्या प्रहार जनशक्ती पार्टीकडून निवडून आलेल्या राजकुमार पटेल यांनी निवडणुकीआधी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला.
Mahayuti melghat vidhan sabha election 2024: विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मेळघाट विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजकुमार पटेल यानी बच्चू कडूंची साथ सोडली. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत त्यांनी प्रवेश केला. त्यांना पुन्हा मेळघाट विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी मिळण्याची चर्चा होती. पण, महायुतीकडून त्यांचा पत्ता कट करण्यात आला आहे. भाजपने मेळघाट विधानसभा मतदारसंघाचा उमेदवार आज जाहीर केला.
मेळघाट विधानसभा मतदारसंघात २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपचा उमेदवार दुसऱ्या क्रमांकावर राहिला. प्रहार जनशक्ती पार्टीकडून निवडणूक लढवणाऱ्या राजकुमार दयाराम पटेल यांनी भाजपचे तेव्हाचे उमेदवार रमेश मावसकर यांचा पराभव केला होता.
भाजपने उमेदवार बदलला
मेळघाट विधानसभा मतदारसंघासाठी भाजपने उमेदवाराची घोषणा केली. भाजपने यावेळी केवलराम काळे यांना उमेदवारी दिली आहे. केवलराम काळे यांनी २०१९ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसकडून निवडणूक लढवली होती.
२०१९ मध्ये राजकुमार पटेल यांना ८४ हजार ५६९ मते मिळाली होती. तर भाजपचे उमेदवार रमेश मावसकर यांना ४३ हजार २०७ मते मिळाली होती. याच निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसकडून निवडणूक लढवणाऱ्या केवलराम काळे यांना ३५ हजार ८६३ मते मिळाली होती.
काँग्रेसचा पारंपरिक मतदारसंघ असलेल्या मेळघाट विधानसभा मतदारसंघात २०१९ मध्ये पहिल्यांदाच प्रहार जनशक्ती पार्टीने विजय मिळवला होता. त्यामुळे हा मतदारसंघ यावेळी प्रहार पुन्हा मिळवणार का? याबद्दल उत्सुकता आहे.