माहिम मतदारसंघात अमित ठाकरेंना भाजपाचा पाठिंबा?; देवेंद्र फडणवीसांची स्पष्ट भूमिका
By ऑनलाइन लोकमत | Published: October 30, 2024 02:51 PM2024-10-30T14:51:53+5:302024-10-30T14:52:51+5:30
माहिम मतदारसंघात सध्या शिवसेना शिंदे गटाकडून सदा सरवणकर यांना उमेदवारी दिली आहे तर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडून महेश सावंत यांना तिकीट मिळालं आहे.
मुंबई - अमित ठाकरेंना मदत केली पाहिजे ही स्पष्ट भूमिका भारतीय जनता पार्टीची होती आणि आहे. राज ठाकरेंनी त्याठिकाणी मागील निवडणुकीत आम्हाला पाठिंबा दिला मग एका जागेवर त्यांना मदत लागणार असेल तर दिली पाहिजे असं मोठं विधान भाजपा नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केले आहे. त्यामुळे माहिम मतदारसंघातील उमेदवारीवरून महायुतीत संभ्रमावस्था निर्माण झाली आहे. फडणवीसांआधी मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष शेलार यांनीही हीच भावना व्यक्त केली होती.
आज देवेंद्र फडणवीस यांनी यावर भाष्य करत म्हटलंय की, अमित ठाकरेंना मदत करावी असं मत भाजपाचं होतं आणि आहे. मुख्यमंत्र्यांचेही मत त्यापेक्षा वेगळे नाही. मी स्वत: मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडे गेलो होतो. एखादी जागा अदलाबदल करून घेऊ असंही सांगितले. मुख्यमंत्र्यांनी तो प्रयत्न करून पाहिला. तिथले जे उमेदवार आहेत त्यांना बोलवून चर्चा केली पण त्यांच्या पक्षातील नेत्यांचे मत असं आहे, जर ते लढले नाहीत तर ती मते थेट उबाठाकडे जातील. त्यातून दोघांचे नुकसान होईल. त्यामुळे त्यांनी काही ऐकलं नाही असं फडणवीसांनी सांगितले.
पण अजूनही माझे स्पष्ट मत आहे, राज ठाकरे यांनी जी काही लोकसभेला मोदींसाठी मदत केली, त्यामुळे या एका जागेवर राज ठाकरेंना किंवा अमित ठाकरेंना समर्थन दिले पाहिजे असं भाजपाचं स्पष्ट मत आहे असं देवेंद्र फडणवीस यांनी त्यांनी सांगितले. माहिम मतदारसंघात सध्या शिवसेना शिंदे गटाकडून सदा सरवणकर यांना उमेदवारी दिली आहे तर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडून महेश सावंत यांना तिकीट मिळालं आहे. त्यात मनसेकडून या मतदारसंघात राज ठाकरेंचे पुत्र अमित ठाकरे यांना रिंगणात उतरवलं आहे. त्यामुळे इथल्या मतदारसंघात तिरंगी लढत पाहायला मिळणार आहे.