दातृत्वाची जेथे प्रचिती, तेथे उमेदवार मिळती; भाजपचा मित्रपक्षांना ‘उमेदवार पुरवठा’, सोबत जागाही दिल्या 

By यदू जोशी | Published: October 29, 2024 10:04 AM2024-10-29T10:04:04+5:302024-10-29T10:04:35+5:30

Maharashtra Assembly Election 2024 : मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात चर्चा झाली अन् मग मुरजी पटेल शिंदेसेनेचे उमेदवार झाले.

Maharashtra Assembly Election 2024 : BJP's allies were given 'candidate supply', along with seats  | दातृत्वाची जेथे प्रचिती, तेथे उमेदवार मिळती; भाजपचा मित्रपक्षांना ‘उमेदवार पुरवठा’, सोबत जागाही दिल्या 

दातृत्वाची जेथे प्रचिती, तेथे उमेदवार मिळती; भाजपचा मित्रपक्षांना ‘उमेदवार पुरवठा’, सोबत जागाही दिल्या 

Maharashtra Assembly Election 2024 : मुंबई : यावेळच्या विधानसभा निवडणुकीत या पक्षातून त्या पक्षात कोलांटउड्या घेण्याचे अनेक प्रकार घडत आहेत. शिंदेसेनेला आणि अजित पवार गटाला महायुतीत जागा तर जास्त हव्या होत्या, पण उमेदवार मिळेनात. भाजपचे दातृत्व बघा, त्यांनी मित्रांना जागाही दिल्या आणि उमेदवारांचा पुरवठादेखील केला.

ज्या जागांवर भाजपने मित्रांना उमेदवार दिले, त्यातील बहुतेक जागा भाजपला हव्या होत्या, पण मन मोठे करावे लागले आणि उमेदवारांसह जागा मित्रांना द्याव्या लागल्या. मुंबईच्या अंधेरी पूर्वची जागा आम्हालाच द्या, यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अडून बसले होते. तेथील स्थानिक भाजप नेते मुरजी पटेल यांना उमेदवारी देण्याचेही त्यांनी ठरविले, पटेल आज शिंदेसेनेत जाणार, उद्या जाणार अशा बातम्या सुरू झाल्या, पण मुहूर्त सापडेना. कारण, भाजपलाही ही जागा हवी होती, पण त्यांचेही उमेदवार मुरजी पटेलच होते. मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात चर्चा झाली अन् मग मुरजी पटेल शिंदेसेनेचे उमेदवार झाले.

पालघरची जागा भाजपला हवी होती, पण शिंदेसेना अडली. दोघांचे उमेदवार एकच होते, राजेंद्र गावित. २०१९ मध्ये ते शिवसेनेचे खासदार होते. लोकसभा निवडणुकीपूर्वी ते भाजपमध्ये गेले, पण त्यांच्याऐवजी डॉ. हेमंत सावरा यांना भाजपची उमेदवारी मिळाली व ते जिंकले. आता प्रश्न होता, गावित यांच्या पुनर्वसनाचा. भाजप शिंदेंसाठी धावून गेला. गावित भाजप सोडून शिंदेसेनेत गेले व उमेदवारीची माळ त्यांच्या गळ्यात पडली.

शिंदेसेनेत प्रवेश अन्... 
भाजपच्या प्रवक्त्या शायना एन.सी. यांना शिंदेसेनेने मुंबादेवीतून उमेदवारी दिली. तसेच, भाजपतून शिंदेसेनेत प्रवेश केलेल्या अजित पिंगळे (धाराशिव), दिग्विजय बागल (करमाळा), अमोल खताळ (संगमनेर) आणि विठ्ठल लंघे (नेवासा) यांनाही शिंदेसेनेने सोमवारी रात्री उमेदवारी जाहीर केली आहे.  
माजी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांची कन्या संजना यांनी रविवारी शिंदेसेनेत प्रवेश केला. कन्नडमधून त्यांना उमेदवारी दिल आहे.
माजी मुख्यमंत्री नारायण राणेंचे पुत्र निलेश भाजपमधून शिंदेसेनेत गेले, कुडाळची उमेदवारी त्यांना मिळाली. 
बाळापूरची जागा भाजप अन् शिंदेसेनेलाही हवी होती. दोघांचे उमेदवार एकच. वंचितमधून भाजपमध्ये गेलेले माजी आमदार बळीराम शिरसकर. शिरसकर शिंदेसेनेचे उमेदवार झाले. 
बोईसरचे माजी आमदार विलास तरे भाजपमध्ये होते. दोन दिवसांपूर्वी त्यांनी शिंदेसेनेत प्रवेश केला, लगेच त्यांना उमेदवारी मिळाली. भिवंडी पूर्वमधील शिंदेसेनेचे उमेदवार संतोष शेट्टी हे दोन दिवसांपूर्वी पर्यंत भाजपमध्ये होते. 

अजित पवार गटालाही केली उमेदवारांची मदत 
भाजपने अजित पवार गटाचीही उमेदवार तुटवड्यातून सुटका केली. पाचएक पक्ष बदलण्याचा अनुभव असलेले, पण भाजपमध्ये स्थिरावलेले नांदेड लोकसभेतील पराभूत उमेदवार माजी खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांना त्यांच्या हातात घड्याळ देऊन अजित पवारांच्या तंबूत पाठविण्यात आले आणि लोहा मतदारसंघाची उमेदवारी त्यांना बहाल करण्यात आली.
संजयकाका पाटील हे सांगलीचे माजी भाजप खासदार, अलीकडे ते पराभूत झाले. आता रोहित पाटील (तासगाव कवठेमहांकाळ) यांच्याविरोधात
अजित पवार गटाला ते उमेदवार म्हणून मिळाले आहेत.
भाजपचे सांगली जिल्हाध्यक्ष निशिकांत पाटील यांनी पक्षाचा राजीनामा दिला, ते अजित पवार गटात गेले आणि लगेच इस्लामपूरची उमेदवारी मिळाली. शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याविरोधात ते लढतील.
माजी मंत्री आणि भाजपचे नेते राजकुमार बडोले यांनी अजित पवार गटात उडी घेतली आणि उमेदवारीची माळ त्यांच्या गळ्यात पडली.

Web Title: Maharashtra Assembly Election 2024 : BJP's allies were given 'candidate supply', along with seats 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.