परप्रांतीयांच्या मतांसाठी भाजपचे ‘मायक्रो मॅनेजमेंट’, राज्य, भाषानिहाय डेटा बँक करून जबाबदारी
By ऑनलाइन लोकमत | Published: November 7, 2024 10:09 AM2024-11-07T10:09:09+5:302024-11-07T10:11:16+5:30
Maharashtra Assembly Election 2024: महाराष्ट्रात राहणाऱ्या परप्रांतीय मतदारांची मते पदरात पाडून घेण्यासाठी भारतीय जनता पक्षाने खास योजना आखली आहे.
- चंद्रशेखर बर्वे
नवी दिल्ली - महाराष्ट्रात राहणाऱ्या परप्रांतीय मतदारांची मते पदरात पाडून घेण्यासाठी भारतीय जनता पक्षाने खास योजना आखली आहे. महाराष्ट्रात हिंदी भाषक राज्यांसह इतर राज्यांतीलही नागरिक मोठ्या प्रमाणावर राहतात. सूत्रानुसार, भाजपने महाराष्ट्रात राहणाऱ्या परप्रांतीयांची राज्ये आणि भाषानिहाय डेटा बॅंक तयार करून त्यावर काम करायला सुरुवात केली आहे.
राज्यात उत्तर भारतीयांची संख्या लक्षणीय आहे. मात्र, त्यात केवळ उत्तर प्रदेश आणि बिहारच्या नागरिकांचा समावेश नसून मध्यप्रदेश, छत्तीसगड, राजस्थान, उत्तराखंड या सर्व राज्यांतील नागरिकांचाही समावेश आहे. या सर्वांची बोलीभाषा वेगळी आहे. शिवाय गुजरात, केरळ, तामिळनाडू, ओडिशा, पश्चिम बंगाल आदी राज्यांतील नागरिकांची संख्या सुद्धा खूप आहे. विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात भाजपचा या नागरिकांवर फोकस राहणार आहे.
राज्य आणि भाषेनुसार पक्षाच्या नेत्यांना प्रचाराची जबाबदारी देण्यात आली आहे. उत्तर प्रदेश आणि बिहारच्या नेत्यांना त्यांच्या राज्यातील मतदारांमध्ये प्रचार करण्यास सांगण्यात आले आहे. उत्तर भारतीय भोजपुरी, अवधी, बंजारी, ब्रिजभाषा, बिष्णोई, छत्तीसगडी, गढवाली, हरयाणवी, लोधी, राजस्थानी, लंबांडी अशा विविध भाषा बोलतात. या भाषा बोलणाऱ्या नेत्यांना प्रचारासाठी महाराष्ट्रात जाण्यास सांगण्यात आले आहे. महाराष्ट्रात सव्वा कोटीच्यावर हिंदी भाषक राहतात. महाराष्ट्रातील गुजराती, केरळी, तामिळनाडू, ओडिशा, बंगाली आदी राज्यांतील मतदारांची मते मिळविण्यासाठी त्या त्या राज्यांतील नेत्यांना सांगण्यात आले आहे.
या नेत्यांवर दिली जबाबदारी
विहिंपचे प्रवक्ते श्रीराज नायर यांच्यानुसार, मुंबईतील डोंबिवली म्हणजे मिनी केरळ. राज्यात अंदाजे २५ लाख मल्याळी नागरिक राहतात. परराष्ट्र राज्यमंत्री व्ही. मुरलीधरन यांना मोहिमेवर पाठविले आहे. युवा आघाडीचे प्रमुख खासदार तेजस्वी सूर्या आणि महिला आघाडीच्या प्रमुख वानती श्रीनिवासन हेही त्यांच्या राज्यांतील लोकांमध्ये प्रचारासाठी जाणार आहेत. भाजपने याच युक्तीच्या माध्यमातून माजी मुख्यमंत्री नवीन पटनायक यांची ओडिशातील २४ वर्षांची सत्ता उलथवून लावली होती.