शरद पवारांनी केला करेक्ट कार्यक्रम; २२ लाख कार्यकर्त्यांसह पक्ष गळाला, विधानसभेला कुणाचा गेम?
By ऑनलाइन लोकमत | Published: October 1, 2024 06:35 PM2024-10-01T18:35:58+5:302024-10-01T18:36:57+5:30
BRS Party Likely to Merge In NCP Sharad Pawar Group: महाराष्ट्रातील आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही मोठी घडामोड मानली जात आहे.
BRS Party Likely to Merge In NCP Sharad Pawar Group: एकीकडे महाविकास आघाडी आणि महायुतीत जागावाटपांवरून बैठकांचे, चर्चांचे सत्र सुरू आहे. तर दुसरीकडे संभाजीराजे छत्रपती, राजू शेट्टी आणि बच्चू कडू एकत्रितपणे परिवर्तन महाशक्ती तिसरी आघाडी करत सक्षम पर्याय देण्यासाठी कंबर कसून तयारीला लागले आहेत. यातच मराठा आणि ओबीसी आरक्षणाचा मुद्दा चांगलाच तापताना पाहायला मिळत आहे. मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण असेल, यावरून महायुती आणि महाविकास आघाडीत चढाओढ असल्याचे दिसत आहे. यातच आता लाखो कार्यकर्ते असलेला एक पक्षच शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये विलीन होणार असल्याचे सांगितले जात आहे.
तेलंगणचे माजी मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी महाराष्ट्रात भारत राष्ट्र समितीची बीजे रोवली. परंतु, तेलंगण येथे झालेल्या विधानसभा निवडणुकीत बीआरएसचा दारूण पराभव झाला. महाराष्ट्रात प्रचंड मोठा ताफा घेऊन येऊन के. चंद्रशेखर राव यांनी जोरदार शक्तिप्रदर्शन केले होते. अनेक नेते, पदाधिकारी आणि लाखोंच्या संख्येने कार्यकर्त्यांनी या पक्षात पटापट प्रवेश केले. परंतु, याच पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी आता सगळे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्यासह शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. यासाठी तारीखही ठरवण्यात आली आहे. महाराष्ट्रातील आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही मोठी घडामोड मानली जात आहे.
बीआसएसचे महाराष्ट्रातील काम थांबलेले आहे
शेतकऱ्यांसाठी अतिशय उत्कृष्ट काम तेलंगण राज्यात झाले. तसेच बाकीच्या घटकांसाठी झालेले काम पाहून आम्ही महाराष्ट्रात बीआरएस पक्षाचे काम हाती घेतले. राज्यात पक्ष वाढावा, यासाठी आम्ही प्रयत्नशील होतो. गेल्या दोन वर्षात पक्ष वाढवण्यासाठी खूप प्रयत्न केले. के. चंद्रशेखर राव यांच्या नेतृत्वाखाली घराघरात बीआरएस पक्ष पोहोचवला. परंतु, तेलंगणमधील बीआरएसचे सरकार गेले. तसेच आणखी काही कारणांमुळे महाराष्ट्रातील काम थांबलेले आहे, असे बाळासाहेब देशमुख यांनी म्हटले आहे.
२२ लाख लोक सभासद म्हणून नोंदवले
महाराष्ट्रात आता निवडणुका होत आहेत. २२ लाख लोक सभासद म्हणून नोंदवले होते. पक्षाची भूमिका आम्ही लोकांपर्यंत पोहोचवले. तेलंगणात ज्या धर्तीवर काम झाले, तशाच पद्धतीने राज्यात काम करणारा शरद पवार यांचा पक्ष आहे. शरद पवार मोठे नेते आहेत. आता आमचे सगळ्यांचे एकमत झाल्यानंतर कार्यकर्त्यांशी चर्चा केली. यानंतर कार्यकर्त्यांसह शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला, अशी माहिती बाळासाहेब देशमुख यांनी दिली.
शरद पवार यांच्याशी ४० ते ४२ मिनिटे चर्चा
यासंदर्भात शरद पवार यांच्याशी ४० ते ४२ मिनिटे चर्चा झाली. अनेक विषयांवर चर्चा झाली. या बैठकीनंतर असे ठरवण्यात आले की, ०६ ऑक्टोबर रोजी एक मोठा मेळावा घेऊन शरद पवार यांच्या नेतृत्वखाली आम्ही सगळे कार्यकर्ते, नेते राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करणार आहोत. आमचा धागा आणि आमचा उद्देश समान आहे, असे बाळासाहेब देशमुख यांनी सांगितले.
दरम्यान, राज्यभरात भारत राष्ट्र समितीच्या वतीने अधिकृतपणे नेमलेले पदाधिकारी यांनी एकत्रितपणे शरद पवार यांच्याशी चर्चा झाली. त्यानुसार आम्ही शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली त्यांच्या राष्ट्रवादी गटात प्रवेश करणार आहोत, असे बाळासाहेब देशमुख यांनी स्पष्टपणे सांगितले.