महाराष्ट्रात कुणाची हवा? समोर आलेला हा नवा सर्व्हे भाजपची झोप उडवणारा अन् CM शिंदेंचंही टेन्शन वाढवणारा!
By ऑनलाइन लोकमत | Published: October 31, 2024 05:03 PM2024-10-31T17:03:12+5:302024-10-31T17:04:14+5:30
महाराष्ट्रात कुणाची हवा? समोर आलेला सर्व्हे भाजपची झोप उडवणारा अन् CM शिंदेंचही टेन्शन वाढवणारा!
महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. 20 नोव्हेंबरला मतदान होणार असून 23 नोव्हेंबरला निकाल जाहीर होणार आहे. दरम्यान, यासंदर्भातील सी व्होटर्सचा सर्व्हे समोर आला आहे. या सर्व्हेनुसार 51 टक्के लोकांनी असे भाष्य केले आहे, जे महायुती सरकारच्या हृदयाचे ठोके वाढवतील. तर, जाणून घेऊयात, महाराष्ट्रात कुणाची आहे हवा आणि कुणाचे पारडे आहे जड...?
या सर्व्हेमध्ये, सध्याच्या भाजप-शिंदे सरकारवर आपण नाराज आहात का आणि हे बदलण्याची आपली इच्छा आहे का? या प्रश्नावर 51.3 टक्के लोकांनी 'हो' असे उत्तर दिले. ते म्हणाले, आमच्या मनात राग आहे आणि हे सरकार बदलण्याची आमची इच्छा आहे. तसेच 3.7 टक्के लोकांनी म्हटले आहे की, आमच्या मनात राग आहे, मात्र हे सरकार बदलण्याची इच्छा नाही. 41.0 टक्के लोकांनी सांगितले की ते रागावलेले नाही आणि बदलण्याची त्यांची इच्छा नाही. अर्थात 41 टक्के लोकांना पुन्हा भाजप-शिंदे सरकार हवे आहे. तसेच 4% लोक म्हणाले, सध्या काहीही सांगू शकत नाही. महत्वाचे म्हणजे, 51 टक्क्यांहून अधिक लोकांमध्ये या सरकारसंदर्भात राग आहे आणि त्यांना हे बदलायचे आहे.
मुख्यमंत्री पदासाठी जनतेची पसंती -
यावेळी, मुख्यमंत्री पदासाठी त्यांची पसंती कुणाला, असा प्रश्न विचारला असता, 27.6 टक्के लोकांनी एकनाथ शिंदे, असे उत्तर दिले. 22. 9 टक्के लोकांनी उद्धव ठाकरेंचे नाव घेतले. तर 10.8 टक्के लोकांनी देवेंद्र फडणवीस यांना पसंती दिली. याशिवाय, 5.9 टक्के लोकांनी शरद पवार तर 3.1 % लोकांनी अजित पवारांना पसंती दिली.
भाजप-शिवसेना सरकारची कामगीरी कशी वाटते? यावर 52.5 टक्के लोकांनी चांगली, असे उत्तर दिले. तर 21.5 टक्के लोकांनी सरासरी तर 23.2 टक्के लोकांनी खराब असे उत्तर दिले.
निवडणुकीत कोणते घठक प्रभावी ठरतील?-
असा प्रश्न विचारला असता 23.0 टक्के लोकांनी मराठा आरक्षण असे सांगितले, 12. 2 टक्के लोकांनी पंतप्रधान मोदींची कामगिरी महत्वाची ठरेल असे सांगितले. 9.8 टक्के लोकांनी स्लम पुनर्विकासाचा मुद्दा सांगितला. 7 टक्के लोकांनी सरकारची कामगिरी आणि योजनांवर भाष्य केले. 8.2 टक्के लोकांनी सरकारी रुग्णालयाची स्थिती, 6 % लोकांनी राज्याची आर्थिक स्थिती तर आणि 2.5 टक्के लोकांनी एनसीपीमधील फूट मोठा फॅक्टर असल्याचे म्हटले आहे.