उमेदवार द्यायचे की पाडायचे? मनोज जरांगे पाटील यांनी घेतला मोठा निर्णय, केली महत्त्वाची घोषणा
By ऑनलाइन लोकमत | Published: October 20, 2024 03:35 PM2024-10-20T15:35:02+5:302024-10-20T15:35:55+5:30
Maharashtra Assembly Election 2024: जिथे आपला उमेदवार निवडणूक येण्याची शक्यता असेल, तिथे उमेदवार द्यायचे, तर इतर ठिकाणी मराठा आरक्षणाला विरोध असणाऱ्यांना पाडण्याची भूमिका घ्यायची, अशी घोषणा मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे.
लोकसभा निवडणुकीत मराठा आरक्षणावरून आक्रमक भूमिका घेणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलानाचा मतदानावर मोठ्या प्रमाणात परिणाम झाल्याचे दिसून आले होते. दरम्यान, आरक्षणाचा प्रश्न न सुटल्याने विधानसभा निवडणुकीसाठी काय भूमिका घ्यायची, याबाबतचा निर्णय २० ऑक्टोबर रोजी घेण्याची घोषणा जरांगे पाटील यांनी घेतली होती. त्यानुसार मनोज जरांगे पाटील यांनी विधानसभा निवडणुकीत उमेदवार द्यायचे की पाडायचे याबाबतचा मोठा निर्णय जाहीर केला आहे. जिथे आपला उमेदवार निवडणूक येण्याची शक्यता असेल, तिथे उमेदवार द्यायचे, तर इतर ठिकाणी मराठा आरक्षणाला विरोध असणाऱ्यांना पाडण्याची भूमिका घ्यायची, अशी घोषणा मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे. तसेच एससी-एसटी आरक्षण असलेल्या ठिकाणी उमेदवार द्यायचे नाहीत, मात्र तिथे आपल्या भूमिकेला पाठिंबा असणाऱ्यांच्या मागे उभं राहायचं, अशी घोषणाही जरांगे पाटील यांनी केली आहे.
याबाबत आज मराठा आंदोलकांच्या उपस्थितीत मोठी घोषणा करताना मनोज जरांगे पाटील म्हणाले की, आपल्यावरती जाणारा वर्ग खूप मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्यांना वाटतंय की यांच्या हातातून हे संपले तर बरं होईल. आपल्या हातानं आपल्याला संपवायचं नाही, म्हणून काही तरी वेगळा मार्ग काढायचा आहे. तुम्हाला सांगतो गाफील राहू नका, आपला पराभव झाला तर आपल्याला एकमेकांच्या तोंडाकडेही बघावं असं वाटणार नाही, असं हे लोक आपल्याला हसतील. तुम्हाला हरवणं मला परवडणारी नाही. महायुती आणि महाविकास आघाडी हे दोघेही चाबरे आहेत. यांच्या याद्या दिल्लीत पडून आहेत. आम्ही काय निर्णय घेतो, याची हे वाट पाहत आहेत. प्रत्येक मतदारसंघात आपलं एक लाखाचं मतदान आहे. एक लाखाची लीड कशीच तुटत नाही. यश अपयश प्रत्येक बाबतीत असतं. जर आपणं उमेदवार उभे केले आणि ते पराभूत झाले, तर माझ्या आंदोलनाचं काय, माझ्या समाजाचं काय? असा सवाल जरांगे पाटील यांनी उपस्थित आंदोलकांना केला.
पक्षाकडून आणि नेत्याकडून बोलायचं बंद करा. समाज डोळ्यासमोर धरा. समाजाचं काय होईल हे डोळ्यासमोर धरा. आपल्याला आजच मार्ग काढायचा आहे. असं सांगत जरांगे पाटील पुढे म्हणाले की, आपण विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवार दिले तर भाजपा खूश होईल. तसेच उमेदवार दिले नाही तर महाविकास आघाडीला आनंद होईल. मात्र मराठा आरक्षणाबाबत दोघेही काही स्पष्ट बोललेले नाहीत. आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये जिथे मराठा समाजाचे उमेदवार विजयी होण्याची शक्यता असेल, तिथे आपण उमेदवार जाहीर करू. मात्र इतर ठिकाणी जिथे आपले उमेदवार नसतील, तेथील जो उमेदवार मी तुमच्या सर्व मागण्यांशी सहमत आहे, असं ५०० रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर लिहून देईल, त्याला पाठिंबा देऊ, अशी घोषणा मनोज जरांगे पाटील यांनी केली. तसेच एससी, एसटींसाठी आरक्षित जागेवर आपण उमेदवार द्यायचे नाहीत. मात्र तिथे आपल्या आंदोलनाला पाठिंबा असणाऱ्या उमेदवाराच्या मागे उभं राहायचं, अशी घोषणाही त्यांनी केली.
जरांगे पाटील यांनी पुढे सांगितले की, उमेदवार देताना आपल्याला कुठे मराठ्यांची ताकद आहे आणि कुठे मुस्लिमांची ताकद आहे, त्याचं गणित जुळवून पाहवं लागणार आहे. कारण अशी समीकरणं जुळवणं आवश्यक आहेत. मी अशी समीकरणं जुळवून पाहत आहे. आता तुम्हीही विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरून टाका. मात्र मी अर्ज मागे घ्या, म्हटलं की, अर्ज मागे घ्यायचा, अशी सक्त सूचनाही मनोज जगांरे पाटील यांनी दिली.