"जे अर्ज मागे घेणार नाही त्यांना..."; भाजपमधून बंडखोर केलेल्यांना चंद्रशेखर बावनकुळेंनी दिला इशारा
By ऑनलाइन लोकमत | Published: October 31, 2024 02:36 PM2024-10-31T14:36:47+5:302024-10-31T14:37:40+5:30
भाजपमधून बंडखोरी केलेल्या अपक्ष उमेदवारांना प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी इशारा दिला आहे.
Chandrashekhar Bawankule : विधानसभा निवडणुकीसाठी महायुती आणि महाविकास आघाडीच्या घटक पक्षांमधील अनेकांनी बंडखोरी करत, तर काहींनी पक्षाच्या नावावर उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. महायुती आणि महाविकास आघाडीकडून अधिकृत उमेदवार दिल्यानंतरही इच्छुकांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. त्यामुळे अधिकृत उमेदवारांची चिंता वाढली आहे. अपक्ष बंडखोर उमेदवारांचे बंड शमविण्यासाठी आता भाजपने पावलं उचलण्यास सुरुवात केली आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी भाजपमधील बंडखोरांना उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या सूचना केल्या आहेत.
विधानसभा निवडणुकीत भाजप एकूण १५६ जागांवर निवडणूक लढणार आहे. उर्वरित जागा शिवसेना शिंदे गट आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या वाट्याला आल्या आहेत. तर ज्या जागांचा प्रश्न सुटलेला नाही त्याजागी महायुतीमध्ये मैत्रीपूर्ण लढत होणार आहे. मात्र काही ठिकाणी शिंदे गट आणि राष्ट्रवादीने उमेदवार दिल्याने भाजपमधील नाराज इच्छुकांनी बंडखोरी करत महायुतीच्या उमेदवारांच्या विरोधात अर्ज दाखल केले आहेत. त्यामुळे आता सर्व बंडखोरांना भाजपने आपला अर्ज मागे घेण्यास सांगितलं आहे. जे अर्ज मागे घेणार नाहीत त्यांच्यावर कारवाई केली जाणार असल्याचे चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलं आहे.
बंडखोरी थांबवण्यासाठी प्रयत्न सुरु असल्याचे चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले. "परवा रात्री आमची बैठक झाली. देवेंद्र फडणवीस, मी आणि आमचे सर्व राज्याचे निवडणूक संचालन समिती या बैठकीत होते. सर्व जिल्हाध्यक्ष, नेत्यांना आम्ही सूचना दिल्या आहेत. एकावेळी एका ठिकाणी एकच व्यक्ती लढू शकते," असं स्पष्टीकरण चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिलं आहे.
"नाराजीतून काहींनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. भाजपच्या सर्व पदाधिकाऱ्यांना उमेदवारी अर्ज मागे घेण्याची विनंती केली आहे. माझी विनंती, सूचना यांचे प्रत्येक कार्यकर्ता, पदाधिकारी पालन करेल असं मला वाटतं. आपला पक्ष आईसारखा आहे त्यामुळे पक्षावर श्रद्धा ठेवून पक्ष भलं करेल ही भावना ठेवून अर्ज मागे घेण्याची विनंती केली आहे. ज्यांनी अर्ज भरला आहे त्यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या आहेत. ते अर्ज मागे घेतील असा १०० टक्के विश्वास आहे. जे मागे घेणार नाहीत त्यांच्यावर पक्ष कारवाई करेल," असा इशाराही बावनकुळे यांनी दिला.
दरम्यान, बंडखोरांची संख्या यावेळी वाढली असून काही ठिकाणी मैत्रीपूर्ण लढती होणार असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मान्य केले आहे. दुसरीकडे काँग्रेसने आमच्यात मैत्रीपूर्ण लढती होणार नाही, असा दावा काँग्रेसचे प्रभारी रमेश चैनीथला यांनी केला आहे.