"मुख्यमंत्री केलं तर वरचढ होईल म्हणून अजित पवारांना पण...; भुजबळांचा शरद पवारांविषयी गौप्यस्फोट
By ऑनलाइन लोकमत | Published: November 12, 2024 08:04 PM2024-11-12T20:04:51+5:302024-11-12T20:22:48+5:30
Chhagan Bhujbal : शरद पवार यांनी केलेल्या टीकेवर छगन भुजबळ यांनी पत्रकार परिषदेतून प्रत्युत्तर दिलं आहे.
Maharashtra Assembly Election 2024 : विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक शरद पवार यांनी मंत्री छगन भुजबळ यांना लक्ष्य केलं आहे. २००४ साली महाराष्ट्राचे नेतृत्व छगन भुजबळ यांच्याकडे दिले असते तर राज्याची अवस्था चिंताजनक झाली असती असं विधान शरद पवार यांनी केला आहे. त्यावर आता मुख्यमंत्री केल्यावर वरचढ होतात म्हणून त्यांनी मला मुख्यमंत्री केले नसल्याचा पलटवार छगन भुजबळ यांनी केला आहे. तर शिवसेना फोडण्याचे चांगले कामसुद्धा शरद पवार यांनी केल्याचा आरोप छगन भुजबळ यांनी केला आहे.
२००४ मध्ये भुजबळांकडे नेतृत्व दिलं असतं तर महाराष्ट्राची अवस्था चिंताजनक झाली असती असा दावा शरद पवार यांनी एका मुलाखतीदरम्यान केला. छगन भुजबळांना नंतर तुरुंगात जावं लागलं, असेही शरद पवारांनी म्हटलं. शरद पवारांनी केलेल्या दाव्यावर
छगन भुजबळ यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. पत्रकार परिषदेदरम्यान छगन भुजबळ यांनी अनेक खळबळजनक दावे केले आहेत.
"सुधाकर नाईक आणि शरद पवारांचे मतभेद झाले. त्यांच्या टोकाचे मतभेद झाले होते. त्यावेळी नरसिंहराव यांनी त्यांना पुन्हा महाराष्ट्रात पाठवलं. त्यांना असं वाटत असावं की आपण कोणालाही मुख्यमंत्री केलं तर ते आपल्या वरचढ होतात. म्हणून कोणालाच मुख्यमंत्री न केलेलं बरं. त्यांनी ना अजित पवारांना ना आर आर पाटलांना किंवा छगन भुजबळ यांना मुख्यमंत्री केलं नाही. शरद पवार कधीपासून ज्योतिष्य पाहायला लागले कधीपासून भविष्यात भुजबळांचे काय होणार आहे हे तुम्हाला कळायला लागले," छगन भुजबळांनी म्हटलं.
"३६ लोकांची सही झाल्यानंतर मी सही केली होती. पण त्या अगोदर त्या लोकांना घेऊन शिवसेना सोडण्यासाठी प्रवृत्त त्यांच्या दृष्टीने चांगले काम पवार साहेबांनीच केलं होतं. ते जर केलं नसतं तर कदाचित तर फुटाफूट झालीच नसती. मी एकटा तर काही शिवसेना सोडू शकत नव्हतो," असेही छगन भुजबळ म्हणाले.