छत्रपती संभाजीराजेंचा मनोज जरांगेंकडे युतीचा प्रस्ताव; अपक्ष उमेदवारीचे सांगितले तोटे

By ऑनलाइन लोकमत | Published: October 26, 2024 03:33 PM2024-10-26T15:33:10+5:302024-10-26T15:36:23+5:30

मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर मनोज जरांगे पाटील गेल्या वर्षभरापासून आंदोलन करत आहेत. त्यात विधानसभा निवडणुकीत जरांगे पाटील इच्छुकांना उभे करण्याची तयारी करत आहेत. 

Maharashtra Assembly Election 2024 - Chhatrapati Sambhaji Raje proposes alliance with Manoj Jarange Patil | छत्रपती संभाजीराजेंचा मनोज जरांगेंकडे युतीचा प्रस्ताव; अपक्ष उमेदवारीचे सांगितले तोटे

छत्रपती संभाजीराजेंचा मनोज जरांगेंकडे युतीचा प्रस्ताव; अपक्ष उमेदवारीचे सांगितले तोटे

जालना - समाजाची ताकद एकजुटीने दिसणे गरजेचे आहे. समाजाच्या मतांची विभागणी झाल्यास इतरांनाच याचा फायदा होऊन परत तेच समाजाच्या डोक्यावर बसतील. आपण एकत्र येणे अत्यंत आवश्यक आहे असं सांगून स्वराज्य प्रमुख छत्रपती संभाजीराजे यांनी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्याकडे युतीचा प्रस्ताव ठेवला आहे. अंतरवाली सराटी येथे संभाजीराजे यांनी मनोज जरांगे पाटलांची भेट घेत अपक्ष उमेदवार उभे करण्याचे तोटे सांगितले.

छत्रपती संभाजीराजे म्हणाले की, विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे पाटील यांची भेट घेऊन अत्यंत महत्त्वाच्या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा केली. मनोज जरांगे पाटील हे ज्या ठिकाणी उमेदवार देतील त्या उमेदवारांना अपक्ष म्हणून निवडणूक लढावी लागणार आहे. निवडणूक आयोग जे चिन्ह देईल ते स्वीकारावे लागणार आहे. प्रत्येक मतदारसंघातील उमेदवाराला आयोग वेगवेगळे चिन्ह देईल. त्यामुळे चिन्हाचा प्रचार करणे अवघड होणार आहे. हे अपक्ष उमेदवार निवडून आल्यानंतर कायद्याच्या नजरेतून ते अपक्ष असल्यामुळे त्यांच्यावर कोणतेही कायदेशीर बंधन लागू नसते. त्यामुळे ते कोणत्याही पक्षात प्रवेश करू शकतात अथवा सरकार स्थापनेसाठी कोणत्याही पक्षाला पाठिंबा देऊ शकतात. त्यांना कोणताही व्हिप लागू होत नाही. पक्षांतर बंदीचा कायदा लागू होत नाही असं त्यांनी सांगितले. 

त्याशिवाय सगळे आमदार आपल्या शब्दात राहतील, समाजाला सोडून जाणार नाहीत हे सर्व भावनिकता म्हणून बोलणे ठीक आहे, पण व्यावहारिकदृष्ट्या प्रत्यक्ष राजकारणात भावना चालत नाहीत. आजपर्यंत समाजाच्या नावावर निवडून आलेले बहुतांश आमदार नंतर समाजाला पाठ दाखवतात हे मागील सत्तर वर्ष आपण बघत आलो आहे. अपक्ष उमेदवार दिले तर अपक्ष व स्वराज्य पक्षाचे उमेदवार यांच्यातच समाजाची मतविभागणी होईल आणि इतर पक्षांच्या उमेदवारांना याचा फायदा होऊन तेच निवडून येतील. यामुळे समाजाच्या हातात काहीच राहणार नाही. समाजाचा मोठा घात होईल व परत समाज विखुरला जाईल. अपक्ष म्हणून उमेदवार उभे करण्यात हा सगळ्यात मोठा धोका असल्याचे मनोज जरांगे पाटील यांच्या लक्षात आणून दिले अशी माहिती संभाजीराजेंनी दिली. 

दरम्यान, भविष्यात त्याच्यावर काहीही इलाज करता येणार नाही. त्यामुळे आत्ताच योग्य निर्णय घेऊन आपण एकत्र येणे गरजेचे असल्याचे स्पष्ट मत मांडले. महाराष्ट्र स्वराज्य पक्ष नोंदणीकृत आहे. आयोगाचे अधिकृत निवडणूक चिन्ह आहे. सर्व उमेदवारांना एकच चिन्ह असेल. एबी फॉर्म असणार आहे. त्यामुळे निवडून आलेल्या सर्व आमदारांना पक्षांतर बंदी कायदा व व्हीप लागू होणार आहे. त्यांना कायदेशीर बंधने असणार आहेत. त्यामुळे अपक्ष म्हणून उमेदवार न देता, स्वराज्य पक्षाच्या चिन्हावर हे उमेदवार उभे करावेत असा प्रस्ताव संभाजीराजेंनी यावेळी मनोज जरांगे पाटील यांना दिला किंवा अपक्षच उभे करायचे असतील तर मतविभागणी टाळण्यासाठी दोघांनी युती करण्याचाही निर्णय त्यांच्यावर सोपवला आहे असंही संभाजीराजेंनी सांगितले. 

Web Title: Maharashtra Assembly Election 2024 - Chhatrapati Sambhaji Raje proposes alliance with Manoj Jarange Patil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.