"प्रत्येक गड-किल्ल्यावर मशीद असायला हवी..."; काँग्रेस खासदाराची राज ठाकरेंवर टीका
By ऑनलाइन लोकमत | Published: November 8, 2024 04:34 PM2024-11-08T16:34:22+5:302024-11-08T16:43:12+5:30
अमरावती येथे राज ठाकरेंनी सभा घेत मशिदीवरील भोंग्यासह हिंदुत्वाच्या मुद्द्यांवरून जनतेला साद घातली. त्यावरून स्थानिक काँग्रेस खासदार वानखेडेंनी पलटवार केला आहे.
दर्यापूर - अमरावती येथील सभेत मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंगे काढण्यावरून विधान केले. या विधानावर काँग्रेस खासदार बळवंत वानखेडे यांनी जोरदार टीका केली. राज ठाकरे यांचे हे वक्तव्य छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांना काळिमा फासणारे आहे असं खासदारांनी म्हटलं. दर्यापूर येथे महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा होती. या सभेत बळवंत वानखेडे यांनी राज यांच्या विधानावर भाष्य केले.
खासदार बळवंत वानखेडे म्हणाले की, काल राज ठाकरे आले होते, त्यांनी मशिदीवरील भोंगे काढण्याचं विधान केले. त्यांची ही घोषणा जुनीच आहे. परंतु वाईट या गोष्टीचे वाटते. त्यांच्या झेंड्यावर छत्रपती शिवरायांची मुद्रा आहे. छत्रपती शिवरायांना अपेक्षित होते, मंदिर असेल त्याच्या बाजूला मशीद असली पाहिजे. आपले जे गडकिल्ले आहेत तिथे मशीद असली पाहिजे हे धोरण छत्रपती शिवरायांचं होते. त्या शिवरायांच्या विचारांना काळिमा फासणारं विधान होते अशी टीका त्यांनी केली.
त्याशिवाय बडनेरा मतदारसंघात मी हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे बॅनर पाहिले, त्याबाजूला जिल्ह्यातील भाभीचे फोटो होते. बाळासाहेब ठाकरेंसोबत फोटो लावण्याची या लोकांना लाज कशी वाटत नाही. ज्यांनी मातोश्री बनवली. त्या मातोश्रीला त्रास देणे, उद्धव ठाकरेंना त्रास देणे हे काम त्यांनी केले. आजपर्यंतच्या उत्कृष्ट मुख्यमंत्र्यांपैकी उद्धव ठाकरे आदर्श मुख्यमंत्री होते. त्यांनी कोरोना काळात सर्वांना सोबत घेऊन केलेले काम, ही किमया त्यांच्यात होती. योगायोगाने काय झाले सगळ्यांना माहिती आहे. ५० खोके हे सगळ्यांना माहिती आहे असं सांगत खासदार बळवंत वानखेडे यांनी नवनीत राणांसह एकनाथ शिंदे आणि समर्थक आमदारांवर निशाणा साधला.
दरम्यान, उद्धव ठाकरेंचे मी आभार मानतो, त्यांच्या आशीर्वादाने मी आज लोकसभेत पोहचलो. खऱ्या अर्थाने त्यांचा आशीर्वाद मला लाभला. अमरावती जिल्ह्याची खासदारकी त्यांच्या वाट्याला होती. मात्र त्यांनी मला इथं उमेदवार केले त्यामुळे त्यांचे आभार मानतो. ही लढाई उद्धव ठाकरे, शरद पवार, राहुल गांधी यांचे हात बळकट करण्यासाठी आहे. राज्य वाचवण्यासाठी, देश वाचवण्यासाठी तसेच संविधान वाचवण्यासाठी ही लढाई आहे. आपल्याला महाविकास आघाडी सरकार आणणं गरजेचे आहे. जाहीरनामा प्रसिद्ध झाला आहे. जाहीरनाम्यातील प्रत्येक गोष्ट राबवण्यासाठी महाविकास आघाडी सज्ज आहे असा विश्वास खासदार बळवंत वानखेडे यांनी व्यक्त केला.