देवेंद्र फडणवीसांना येणाऱ्या धमक्यांवर सातारचे खासदार छत्रपती उदयनराजे संतापले
By ऑनलाइन लोकमत | Published: November 6, 2024 07:47 PM2024-11-06T19:47:31+5:302024-11-06T19:49:10+5:30
जो काम करत नाही त्याला ठेच लागणार कशी, कारण तो एकाच जागेवर बसून असतो. काही करत नाही. स्वत:चं नाकर्तेपण दडवण्यासाठी चिखलफेक करायची असं उदयनराजेंनी म्हटलं.
कराड - देवेंद्र फडणवीस आज इतकं काम करतायेत, जो माणूस काम करतो त्याला आज धमक्या मिळतायेत. जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या जातात. माणसांनी काम करायचं नाही का?, मग अशा व्यक्तीच्या मागे, पक्षामागे, युतीमागे आपण उभं राहणार नसेल तर कुणाच्या मागे उभं राहायचं हा प्रश्न प्रत्येकाने स्वत:च्या मनाला विचारला पाहिजे असं खासदार उदयनराजे यांनी म्हटलं.
कराडच्या जाहीर सभेत उदयनराजे म्हणाले की, पश्चिम महाराष्ट्र पहिल्यापासून काँग्रेसचा बालेकिल्ला समजला जायचा. मात्र इथल्या लोकांना केवळ झुलवत ठेवलं गेले. पश्चिम महाराष्ट्रातील लोकांचे प्रश्न होते, ते सोडवले नाहीत. राजकारणात सगळ्यात ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी फक्त आश्वासने दिली. आश्वासन देताना आपण जेव्हा लोकांसमोर जातो, आशीर्वाद देत आमदार, खासदार बनवतात. मात्र लोकांचं ऋण कधी फेडले गेले नाही. त्यामुळे फार याकडे लक्ष देऊ नका. वर नरेंद्र आणि खाली देवेंद्र अशी म्हण आहे. आधीच्या काळात योजना पूर्ण झाल्या असत्या तर तेव्हाचे तरूण जे आज त्यांचे वय झाले त्यांचे आयुष्य व्यर्थ गेले नसते. लोकांची जास्तीत जास्त प्रगती झाली पाहिजे यादृष्टीने आम्ही कार्यरत असणार आहे असं त्यांनी सांगितले.
तसेच महायुती आणि आघाडीतला फरक सांगतो, जेव्हा लोक विचारांनी एकत्र येतात तेव्हा युती होते. लोक कल्याणाचा विचार घेऊन लोकांसमोर जातो. लोकांचे हित पाहतो. त्यांच्या अडीअडचणी सोडवतो. आज देशात अनेक वर्ष काँग्रेसची सत्ता होती. ५० हून अधिक वर्ष देशात सत्ता असताना योजना का राबवल्या गेल्या नाही. वैचारिक दृष्ट्या युती केली जाते. जो महाराजांचा विचार होता, तो लोक कल्याण हे मनात ठेवून ध्येय गाठायचे असते. विचारांनी एकत्र आलेले त्यांना कुठल्याही आमिषाची गरज भासत नाही. राज्यात आणि इतर राज्यात जिथे युतीचं भाजपाचं सरकार आहे तिथे चांगल्या योजना राबवल्या गेल्यात असंही उदयनराजे म्हणाले.
दरम्यान, सत्ता मिळवण्यासाठी स्वत:च्या हिंमतीवर काही करू शकत नसते, मग याला पकड, त्याला पकड असं करून बनलेली आघाडी असते. आज आघाडीची अवस्था पाहा. कोल्हापूरात बघा काय घडले, हीच अवस्था राज्यभरात आहे. जो काम करतो त्याला ठेच लागते. जो काम करत नाही त्याला ठेच लागणार कशी, कारण तो एकाच जागेवर बसून असतो. काही करत नाही. स्वत:चं नाकर्तेपण दडवण्यासाठी चिखलफेक करायची. चिखलफेक करून काही होत नाही मग व्यक्ती दोषावर उतरायचं. एकदा चूक घडली तर ५ वर्ष पश्चातापाची वेळ येते. गेलेली वेळ अन् समुद्राच्या लाटा कुणासाठी थांबत नसतात. आपल्या आयुष्यातील ५ वर्ष, कुटुंबातील जे तरुण उद्याचा भविष्यकाळ आहेत. त्यांचा विचार करून महायुतीच्या मागे राहावे असं आवाहन उदयनराजेंनी जनतेला केले.