कागलमध्ये राडा! मुश्रीफ आणि घाटगे समर्थक भिडले; एकमेकांची कॉलर पकडून हाणामारी

By ऑनलाइन लोकमत | Published: October 25, 2024 07:03 PM2024-10-25T19:03:37+5:302024-10-25T19:13:32+5:30

कागलमध्ये यंदा हसन मुश्रीफविरुद्ध समरजितसिंह घाटगे अशी लढत पाहायला मिळत आहे. त्यात स्थानिक पातळीवर दोन्ही गट आक्रमक झाल्याचं दिसून येत आहे. 

Maharashtra Assembly Election 2024 - Clash between NCP 2 Groups Hasan Mushrif and Samarjit Singh Ghatge activists in Kagal | कागलमध्ये राडा! मुश्रीफ आणि घाटगे समर्थक भिडले; एकमेकांची कॉलर पकडून हाणामारी

कागलमध्ये राडा! मुश्रीफ आणि घाटगे समर्थक भिडले; एकमेकांची कॉलर पकडून हाणामारी

कागल - विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील वातावरण तापलं आहे. त्यात कागलमध्ये राष्ट्रवादीच्या २ गटात थेट लढत आहे. इथं हसन मुश्रीफ विरोधात शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून समरजितसिंह घाटगे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. आज एका खासगी वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमावेळी कागलमध्ये मुश्रीफ आणि घाटगे समर्थक एकमेकांना भिडले. कार्यकर्त्यांनी कॉलर पकडून हाणामारी केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

एबीपी माझा या वाहिनीने मुद्द्याचं बोला हा कार्यक्रम कागलमध्ये आयोजित केला होता. यावेळी हसन मुश्रीफ आणि समरजित घाटगे समर्थक आपापले मुद्दे मांडत होते. मात्र काही मुद्द्यांवरून या दोन्ही गटात वाद झाला. त्यानंतर हा वाद इतका विकोपाला गेला ज्यात दोन्ही गटाचे कार्यकर्ते एकमेकांना भिडले, तिथे जोरदार हाणामारी सुरू झाली. कार्यक्रमाच्या सुरुवातीपासून दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांकडून घोषणाबाजी सुरू होती. मात्र अपशब्द उच्चारल्यानंतर दोन्ही बाजूचे कार्यकर्ते एकमेकांवर धावून गेले. त्यानंतर कॉलर पकडून कार्यकर्त्यांनी हाणामारी सुरू केली. त्यात रस्त्याकडेला पार्किंग असणाऱ्या अनेक दुचाकीही खाली पडल्या. 

या कार्यक्रमाचं निवेदन करणारे अभिनेता पंढरीनाथ कांबळे यांनी कार्यकर्त्यांना समजवण्याचा प्रयत्न केला मात्र कुणीही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. एकमेकांची कॉलर पकडून दगडफेक करण्यापर्यंत वाद झाला. या कार्यक्रमावेळी लोकही मोठ्या प्रमाणात होते. सुरुवातीचे १२ मिनिटे कार्यक्रम व्यवस्थित सुरळीत पार पडला, नागरिक त्यांचे मुद्दे मांडत होते. परंतु शांततेत सुरू असणाऱ्या कार्यक्रमात दोन्ही गटाकडून घोषणाबाजी झाली. त्यात कार्यकर्ते एकमेकांच्या अंगावर धावून गेले. या कार्यक्रमाजवळ एका इमारतीचं बांधकाम सुरू होते त्याठिकाणी असलेल्या विटा कार्यकर्ते एकमेकांवर मारत होते. त्यानंतर या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच ते घटनास्थळी पोहचले आणि गोंधळ नियंत्रणात आणला.

कागलमध्ये मुश्रीफ आणि घाटगे यांच्यात लढत

हसन मुश्रीफ हे अजित पवारांच्या राष्ट्रवादीसोबत गेल्या महायुतीकडून पुन्हा त्यांना उमेदवारी देण्यात आली. तर आपल्याला तिकीट मिळणार नाही यामुळे भाजपात असलेले समरजितसिंह घाटगे हे शरद पवारांच्या राष्ट्रवादीत गेले. राष्ट्रवादीकडून समरजितसिंह घाटगे यांना विधानसभेची उमेदवारी दिली आहे. त्यामुळे कागलमध्ये हसन मुश्रीफ आणि समरजितसिंह घाटगे यांच्यात येत्या विधानसभेला लढत होणार आहे. मात्र प्रचाराच्या सुरुवातीपासून इतका संघर्ष कागलमध्ये सुरू झाल्याने येत्या काळात तणावाची परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. 

Web Title: Maharashtra Assembly Election 2024 - Clash between NCP 2 Groups Hasan Mushrif and Samarjit Singh Ghatge activists in Kagal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.