उमेदवारी यादी आली, CM शिंदेंची मोठी खेळी! खास माणूस जरांगेंना भेटला? पाठिंब्यासाठी हालचाली?

By ऑनलाइन लोकमत | Published: October 23, 2024 01:15 PM2024-10-23T13:15:53+5:302024-10-23T13:26:48+5:30

Maharashtra Assembly Election 2024: रात्री यादी जाहीर होताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा खास माणूस पहाटेच मनोज जरांगेंना भेटल्याचे समजते. मनोज जरांगेंच्या मनधरणीसाठी १० दिवसांत दुसऱ्यांदा ही भेट झाल्याचे म्हटले जात आहे.

maharashtra assembly election 2024 cm eknath shinde osd mangesh chivte likely to met manoj jarange patil | उमेदवारी यादी आली, CM शिंदेंची मोठी खेळी! खास माणूस जरांगेंना भेटला? पाठिंब्यासाठी हालचाली?

उमेदवारी यादी आली, CM शिंदेंची मोठी खेळी! खास माणूस जरांगेंना भेटला? पाठिंब्यासाठी हालचाली?

Maharashtra Assembly Election 2024: महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली असून, राजकीय घडामोडींना मोठा वेग आल्याचे पाहायला मिळत आहे. भाजपाने ९९ जणांची यादी जाहीर करत बाजी मारल्यानंतर शिवसेना शिंदे गट आणि मनसेने उमेदवारी यादी जाहीर केली आहे. यानंतर आरोप-प्रत्यारोप, दावे-प्रतिदावे केले जात आहेत. महाविकास आघाडीचा अद्याप तरी जागावाटपाचा फॉर्म्युला तयार झाला असून, लवकरच उमेदवारी यादी येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यातच पहिली यादी जाहीर केल्यानंतर लगेचच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा एक खास माणूस मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी आंदोलन करणाऱ्या मनोज जरांगे यांची भेट घेण्यासाठी अंतरवाली सराटीत पोहोचल्याचे समजते.

भाजपपाठोपाठ शिंदे सेनेने आपल्या ४५ उमेदवारांची यादी जाहीर केली. या यादीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह सर्व मंत्री आणि बहुतांश आमदारांचा समावेश आहे. मंत्री उदय सामंत यांना रत्नागिरीतून तर त्यांचे बंधू किरण सामंत यांना राजापूरमधून उमेदवारी देण्यात आली आहे. लोकसभेला पराभूत झालेल्या यामिनी जाधव यांना भायखळा इथून तर खासदार रवींद्र वायकर यांच्या पत्नी मनीषा वायकर यांना जोगेश्वरी पूर्वेतून तिकीट देण्यात आले आहे. या यादीत नऊ मंत्र्यांचा समावेश असून, मुंबईतील सहा आमदारांना पुन्हा संधी दिली. ठाणे, पालघर, रायगडमधून पाच उमेदवार जाहीर करण्यात आले. यातच ओबीसी आणि मराठा समाजाच्या आरक्षणावरून पाडापाडीचे राजकारण होणार असल्याचे चित्र दिसत आहे, अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे. 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा खास माणूस मनोज जरांगेच्या भेटीला

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून विधानसभा निवडणुकीत शिवसेनेच्या उमेदवारांना मनोज जरांगे यांनी अभय द्यावे, यासाठी हालचाली सुरु असल्याचे समजत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे OSD मंगेश चिवटे यांनी अंतरवाली सराटीत नुकतीच मनोज जरांगे यांची भेट घेतल्याची माहिती समोर आली आहे. मंगळवारी रात्री उशिरा शिवसेना शिंदे गटाची उमेदवारी यादी जाहीर झाल्यावर, मंगेश चिवटे हे बुधवारी पहाटे मनोज जरांगे यांच्या भेटीला गेल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्याचे सांगितले जात आहे.

गेल्या १० दिवसांतील दुसरी भेट?

आंतरवाली सराटीत मनोज जरांगे आणि मंगेश चिवटे यांच्यात काही काळ चर्चा झाली. गेल्या १० दिवसांतील ही दुसरी भेट असल्याचे म्हटले जात आहे. या भेटीच्या माध्यमातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मनोज जरांगे यांचे मन वळवण्याचा प्रयत्न करत असल्याची चर्चा चांगलीच रंगली आहे. विधानसभा निवडणुकीत मनोज जरांगे यांनी शिवसेनेचे उमेदवार असलेल्या मतदारसंघात मराठा उमेदवार उभे करू नये, असा निरोप एकनाथ शिंदे यांच्याकडून जरांगे यांना पाठवण्यात आल्याचे समजते. आता मनोज जरांगे काय भूमिका घेतात, हे पाहावे लागेल. मनोज जरांगेंनी एकनाथ शिंदेंच्या आवाहनाला प्रतिसाद दिल्यास विधानसभा निवडणुकीत एकनाथ शिंदे यांना खूप मोठा फायदा होऊ शकतो. एकनाथ शिंदेंबाबत मनोज जरांगेंचे धोरण नरमाईचे राहिले असल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे आता एकनाथ शिंदे यांची त्यांच्या पक्षाविरोधात उमेदवार न देण्याची विनंती मान्य करणार का, हे पाहावे लागेल. याबाबत एबीपी माझाने वृत्त दिले आहे. 

दरम्यान, गेल्या काही दिवसांमध्ये अनेक राजकीय नेत्यांनी अंतरवाली सराटीत जाऊन मनोज जरांगे यांची भेट घेतली आहे. यात मंत्री उदय सामंत, एमआयएमचे माजी खासदार इम्तियाज जलील, मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, माजी मंत्री राजेश टोपे, भाजपा नेते सुरेश धस यांच्यासह अनेक नेते मंडळी, पदाधिकारी यांचा समावेश आहे. 
 

Web Title: maharashtra assembly election 2024 cm eknath shinde osd mangesh chivte likely to met manoj jarange patil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.