तिढ्याच्या जागांमुळे खोडा, आघाडी अन् युतीत इच्छुकांची घालमेल; २ दिवसात तोडगा निघणार?
By नितीन काळेल | Published: October 26, 2024 07:54 PM2024-10-26T19:54:20+5:302024-10-26T19:54:20+5:30
सातारा जिल्ह्यात महायुतीने सहा जागांचे उमेदवार जाहीर केले. अपेक्षेप्रमाणे प्रस्थापितांना पुन्हा मैदानात उतरवले आहे
सातारा : विधानसभा निवडणुकीसाठी महायुती आणि आघाडीत जागा वाटपांचा घोळ सुरूच असल्याने सातारा जिल्ह्यातील तिढ्यांच्या जागांचा फैसला झालेला नाही. त्यामुळे इच्छुकांची घालमेल सुरू आहे. दोन दिवसात हा घोळ संपवावा लागणाार आहे. तरच सोमवारी-मंगळवारी अर्ज भरता येणार आहे. पक्षांच्या पहिल्याच यादीतच प्रस्थापितांच्या उमेदवारी जाहीर झाल्याने ते निश्चिंत आहेत. राज्यातील विधानसभा निवडणूकीतसाठी महाविकास आघाडी आणि महायुतीचे जागा वाटप अद्याप पूर्ण झालेले नाही.मित्रपक्षांची जागांसाठी रस्सीखेच सुरू आहे.
सातारा जिल्ह्यात महायुतीने सहा जागांचे उमेदवार जाहीर केले. अपेक्षेप्रमाणे प्रस्थापितांना पुन्हा मैदानात उतरवले आहे. पण, कऱ्हाड उत्तर मतदारसंघासाठी भाजप आणि राष्ट्रवादी काॅंग्रेसही ताकद लावत आहे. यासाठी मुंबई तसेच दिल्लीतही बैठक झाली. पण, त्यावर ‘उत्तर’ सापडलेच नाही. पुन्हा एकदा अंतिम बैठक होणार असल्याची माहिती मिळत आहे. फलटणलाही भाजप आणि राष्ट्रवादीतच काथ्याकुट सुरू आहे. काहीही करून भाजप मतदारसंघ ताब्यात घेण्यासाठी पूर्ण ताकद लावत आहे. त्यामुळे फलटणचा तिढाही वाढला आहे. शनिवार आणि रविवारमुळे दोन दिवस सुट्टी असल्याने अर्ज भरता येणार नाहीत. या दोन दिवसात हा तिढा सोडवावा लागणार आहे.
इच्छुक मुंबईत तळ ठोकून...
आघाडीतील पक्षांचे पाच जागांचे उमेदवार जाहीर झाले आहेत. अजूनही माण, वाई आणि साताऱ्याच्या उमेदवारांवर शिक्कामोर्तब झाले नाही. काँग्रेस आणखी एका जागेसाठी अडून आहे. पण वाई मतदारसंघ मिळण्याचीच त्यांना आशा आहे. तर माण मतदारसंघासाठी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून पाचजण तयारीत आहेत. शरद पवार उमेदवारीची माळ कोणाच्या गळ्यात घालणार हे निश्चित नाही. पण प्रभाकर देशमुख यांचे नाव सर्वांत आघाडीवर आहे. सातारा मतदारसंघ उद्धवसेनेला गेल्याचे जवळपास स्पष्ट आहे. पण याठिकाणी जिल्हाप्रमुख सचिन मोहिते हे उमेदवारीसाठी मुंबईत तळ ठोकून आहेत. तर राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे अमित कदम यांचे कार्यकर्ते आम्हालाच उद्धवसेनेची उमेदवार मिळणार म्हणून सांगत आहेत. त्यामुळे आघाडीतील तिढा वाढत चालला आहे.