मेहबूब शेख यांच्या उमेदवारीमागे वेगळीच शंका; माजी आमदारांसह १५० पदाधिकाऱ्यांचा राजीनामा
By ऑनलाइन लोकमत | Published: October 25, 2024 08:57 PM2024-10-25T20:57:53+5:302024-10-25T20:59:02+5:30
बीडच्या आष्टी तालुक्यात मेहबूब शेख यांना शरद पवारांच्या राष्ट्रवादीने उमेदवारी दिली आहे. मात्र याठिकाणी इच्छुक असलेले माजी आमदार साहेबराव दरेकर आणि समर्थक आक्रमक झाले आहेत.
बीड - प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या मनातलं आम्हाला कळलं नाही, आमचा विश्वासघात करायचा होता का हे समजलं नाही. आष्टी मतदारसंघात मेहबूब शेख यांना उमेदवारी देण्याचा जो निर्णय घेतला तो चुकीचा आहे. लोकसभेला आम्ही रात्रंदिवस प्रचार केला. आम्ही २८ तारखेला अपक्ष अर्ज भरणार आहे. १५० पदाधिकाऱ्याने सामूहिक राजीनामे दिलेत अशा शब्दात माजी आमदार साहेबराव दरेकर यांनी पक्षाच्या निर्णयावर नाराजी व्यक्त केली आहे.
माजी आमदार साहेबराव दरेकर म्हणाले की, मला शब्द देण्यात आला होता. राष्ट्रवादीत २-३ गट असावेत. जयंत पाटील, रोहित पवारांचा गट यामुळे आमच्यासारख्यांचा बळी जातो. आमचा विश्वासघात करण्यात आला. आम्ही २५ चक्करा मारल्यात. साहेबांना भेटलो. जर माझं तिकीट फायनल नसेल तर ते सांगायचे नव्हते. तालुक्याच्या दृष्टीने हा चुकीचा निर्णय झाला आहे. बजरंग सोनवणे यांच्याही मनात नसताना अध्यक्ष हुकुमीपद्धतीने वागत असतील तर आम्ही का सहन करायचे असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
रोहित पवार टार्गेट करण्याचं षडयंत्र; कार्यकर्त्यांचा दावा
पुणे लोकसभा निवडणुकीवेळी राष्ट्रवादीचा सेनापती कोण असा वाद निर्माण झाला होता. आष्टी तालुक्यालगतच्या मतदारसंघात साहेबराव दरेकर यांचा दांडगा जनसंपर्क आहे. खासदाकीच्या निवडणुकीत बीडसोबत निलेश लंके यांच्या प्रचारात दरेकर सक्रीय होते. ३०-३५ हजारांचे मताधिक्य दरेकर अण्णांमुळे लंकेंना मिळाले. रोहित पवारांना पाडण्यासाठी आष्टीत उमेदवारी बदलण्यात आली, हा डाव जयंत पाटलांचा आहे असा दावा इथल्या संतप्त कार्यकर्त्यांनी केला. पुण्यात राष्ट्रवादीचा सेनापती लागलेले बॅनर्स आणि आष्टी तालुक्यात दिलेली उमेदवारी याचे कनेक्शन असल्याची शंका आम्हाला वाटते असंही ते म्हणाले.
आष्टी मतदारसंघात साहेबराव दरेकरांना उमेदवारी डावलण्यामागचं नेमकं कारण काय हे कळत नाही. राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष परमेश्वर शेळके यांच्यासह इतरांनी राजीनामा दिला आहे. मेहबूब शेख या मतदारसंघात निवडून येणार नाहीत. इथं मुस्लिमांची संख्या २०-२२ हजार आहे. साहेबराव दरेकर यांचा विश्वासघात केला आहे. जनतेची भावना दरेकर यांच्यासोबत आहे. त्यामुळे आम्ही कुठल्याही परिस्थितीत यांना निवडून आणणार असा विश्वास कार्यकर्त्यांनी व्यक्त केला.