राज्यात विधानसभा निवडणूक केव्हा लागणार? जयंत पाटलांनी तारीख सांगितली
By ऑनलाइन लोकमत | Published: June 26, 2024 05:38 PM2024-06-26T17:38:53+5:302024-06-26T17:39:25+5:30
उद्यापासून पावसाळी अधिवेशन सुरु होत आहे, अशातच शरद पवार गटाच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी विधानसभा निवडणुकीची तारीख जाहीर करून टाकली आहे.
महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये आता मोठा युद्ध रंगणार आहे. लोकसभेला महायुतीचा दारुण पराभव झाल्याने मविआमध्ये आनंदाचे वातावरण आहे. याच्या जोरावर विधानसभेलाही सत्ताधाऱ्यांना खाली खेचण्याच्या योजना विरोधकांकडून आखल्या जात आहेत. उद्यापासून पावसाळी अधिवेशन सुरु होत आहे, अशातच शरद पवार गटाच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी विधानसभा निवडणुकीची तारीख जाहीर करून टाकली आहे.
महायुतीमध्ये सारे काही आलबेल नसून शिंदे शिवसेना, भाजपा आणि अजित पवार राष्ट्रवादीत आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडू लागल्या आहेत. लोकसभा निवडणुकीचे अपयश शिवसेना आणि भाजपा अजित पवारांवर लादत आहेत. तर अजित पवार गटही दोघांना जोरदार प्रत्यूत्तर देत आहे. यामुळे अजित पवार गट महायुतीत राहणार की बाहेर पडणार याचीही चर्चा रंगू लागली आहे.
अजित पवार गटातील आमदार नाराज असून ते लवकरच शरद पवारांकडे परतण्याची शक्यताही वर्तविली जात आहे. यात छगन भुजबळांचे नावही आहे. या पार्श्वभूमीवर शरद पवारांनीच कोणाला परत घेणार कोणाला नाही याची अट जाहीर केली आहे. तसेच मविआच्या मित्रपक्षांनाही विचारणार असल्याचेही म्हटले आहे. यामुळे अजित पवार गटाच्या आमदारांची अवस्था ना घर का ना घाट का अशी होणार असल्याचीही चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे.
येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत आम्हाला चांगला प्रतिसाद मिळेल. शिवसेनेलाही उद्धव ठाकरे यांच्यामुळे चांगला प्रतिसाद मिळेल. विधानसभा निवडणुकीत तिनही पक्षांना चांगला प्रतिसाद मिळेल, काही दिवसातच जागावाटपावर चर्चा होणार आहे, असंही आमदार जयंत पाटील म्हणाले. आमच्या पक्षाला मधल्या काळात मोठ्या प्रमाणात त्रास झाला. त्यामुळे जे पक्षासाठी योग्य आहे तोच निर्णय घेऊ, असंही पाटील म्हणाले. यावेळी पाटील यांनी विधानसभा निवडणूक २० ऑक्टोबरला होईल असे सांगितले.