अपक्ष आमदार किशोर जोरगेवार भाजपात प्रवेश करणार; सुधीर मुनगंटीवारांची नाराजी दूर?
By ऑनलाइन लोकमत | Published: October 26, 2024 06:37 PM2024-10-26T18:37:22+5:302024-10-26T18:38:12+5:30
चंद्रपूर मतदारसंघात अपक्ष आमदार किशोर जोरगेवार यांना भाजपाकडून उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे.
चंद्रपूर - मागील निवडणुकीत काँग्रेस आणि भाजपा उमेदवाराचा दारूण पराभव करणारे अपक्ष आमदार किशोर जोरगेवार अखेर भाजपात प्रवेश करणार आहे. गेल्या काही दिवसांपासून जोरगेवार यांच्याबाबतीत अनेक नाट्यमय घडामोडी घडल्या. किशोर जोरगेवार शरद पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश करणार होते, परंतु त्याला स्थानिक काँग्रेस खासदार प्रतिभा धानोरकर यांनी विरोध केला. त्यानंतर जोरगेवारांचा राष्ट्रवादीतील पक्षप्रवेश खोळंबला. आता ते भाजपात प्रवेश करणार आहेत.
किशोर जोरगेवारांचा राष्ट्रवादीतील प्रवेश खोळंबल्यानंतर ते भाजपात पक्षप्रवेश करतील अशी चर्चा सुरू झाली. मात्र त्याला भाजपा नेते सुधीर मुनगंटीवार यांनी विरोध केला. मुनगंटीवारांनी त्यांची नाराजी थेट दिल्लीत व्यक्त केली. त्यामुळे किशोर जोरगेवार हे पुन्हा अपक्ष निवडणुकीच्या रिंगणात उतरणार होते. परंतु भाजपाच्या वरिष्ठ नेतृत्वाने सुधीर मुनगंटीवारांची नाराजी दूर केली असून अपक्ष आमदार किशोर जोरगेवार यांच्या भाजपा पक्षप्रवेशाचा मार्ग मोकळा आहे.
उद्या सकाळी ११ वाजता अपक्ष आमदार किशोर जोरगेवार यांचा भाजपा पक्षप्रवेश चंद्रपूरात पार पडणार आहे. यावेळी सुधीर मुनगंटीवार उपस्थित असणार आहे. भाजपा नेतृत्वाकडून किशोर जोरगेवारांच्या पक्षप्रवेशाला ग्रीन सिग्नल मिळाल्याने मुनगंटीवारांचा विरोध मावळल्याचं समोर आले. किशोर जोरगेवार हे चंद्रपूरातून भाजपाचे उमेदवार असण्याची शक्यता आहे. किशोर जोरगेवार यांच्या पक्षप्रवेशामागे माजी खासदार हंसराज अहिर यांचे पाठबळ लाभले त्यामुळे जोरगेवारांचा भाजपा पक्षप्रवेश निश्चित झाला आहे. ज्यांनी किशोर जोरगेवारांना विरोध केला त्यांच्या उपस्थितीत किशोर जोरगेवार भाजपात पक्षप्रवेश करत असल्याने राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चा रंगल्या आहेत.
चंद्रपूरातील राजकीय परिस्थितीवर जोरगेवार काय म्हणाले होते?
अपक्ष आमदार किशोर जोरगेवार म्हणाले होते की, २०१९ मध्ये काँग्रेसने माझा प्रवेश करून घेतला. मला एबी फॉर्म दिला, त्यानंतर ऐनवेळी उमेदवारी दुसऱ्याला दिली. निकालात काँग्रेस उमेदवाराला १४ हजार मते मिळाली, तर मला काँग्रेस उमेदवारापेक्षा १ लाख ३ हजार मते जास्त मिळाली. देशात सर्वाधिक ७३ हजारांच्या मताधिक्याने अपक्ष म्हणून मी निवडून आलो. तीच स्थिती भाजपाची झाली. भाजपाचा उमेदवार ४४ हजार मतांवर थांबला. गेल्या ७५ वर्षात देशात अपक्षांच्या इतिहासात मी ७३ हजारांच्या मताधिक्याने निवडून आलेला पहिला अपक्ष आमदार आहे असं त्यांनी सांगितले होते.