विधानसभा निवडणुकीत भाजपा किती जागा जिंकेल? आकड्याबाबत देवेंद्र फडणवीसांचं सूचक विधान
By ऑनलाइन लोकमत | Published: October 27, 2024 02:33 PM2024-10-27T14:33:49+5:302024-10-27T14:42:15+5:30
Maharashtra Assembly Election 2024: विविध कारणांमुळे भाजपासाठी विधानसभा निवडणूक अवघड जाणार असल्याचा दावा केला जात आहे. त्या पार्श्वभूमीवर आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपा आणि महायुतीला किती जागा मिळतील, याबाबत भाजपाचे महाराष्ट्रातील नेते देवेंद्र फडणवीस यांनी मोठं विधान केलं आहे.
लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रामध्ये भाजपाची मोठ्या प्रमाणात पिछेहाट झाली होती. त्यामुळे लोकसभा निवडणुकीतील पराभवामधून धडा घेत भाजपाकडून विधानसभा निवडणुकीसाठी सावधपणे एक एक पाऊल टाकलं जात आहे. तसेच भाजपाने जागावाटपाचा तिढा सोडवत इतर प्रमुख पक्षांच्या आपल्या बहुतांश उमेदवारांच्या नावांची घोषणा केली होती. मात्र अँटी इन्क्मबन्सी, फोडाफोडीचं राजकारण, मराठा आरक्षण आदी मुद्द्यांमुळे भाजपासाठी विधानसभा निवडणूक अवघड जाणार असल्याचा दावा केला जात आहे. त्या पार्श्वभूमीवर आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपा आणि महायुतीला किती जागा मिळतील, याबाबत भाजपाचे महाराष्ट्रातील नेते देवेंद्र फडणवीस यांनी मोठं विधान केलं आहे.
एनडीटीव्हीच्या कार्यक्रमात उपस्थितांशी संवाद साधताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, महाराष्ट्रामध्ये भाजपा सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर येईल. तसेच या निवडणुकीत महायुतीचा विजय होईल. आम्हाला विजयाबाबत पूर्ण विश्वास आहे. बाकी मी आकडा लावणाऱ्यांपैकी नाही. त्यामुळे आम्ही किती जागा जिंकू याबातत आकडा सांगणार नाही. या निवडणुकीत महायुतीकडे अनुकूल वातावरण आहे. मात्र भाजपा सर्वात मोठा पक्ष ठरेल आणि आम्ही मित्रपक्षांसोबत मिळून सरकार स्थापन करू एवढं बहुमत आम्हाला मिळेल, असा विश्वास देवेंद्र फडणवीस म्हणाले.
यावेळी भाजपाने विद्यमान आमदारांना कोणत्या निकषांवर उमेदवारी दिली याबाबत माहिती देताना देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, आम्ही यावेळी एक वेगळ्या प्रकारे... तीन-चार पद्धतीचा अभ्यास करून जे विद्यमान आमदार आहेत, त्यांच्या अँटिइन्कबन्सीचं मिटर तयार केलं होतं. मिटरमध्ये जे लोक ५० टक्क्यांच्या खाली आहेत, त्यांना आपण जागा द्यायची नाही. जे ५० टक्क्यांच्या वर आहेत, त्यांना जागा द्यायची असं ठरवलं. त्यातून जे ५० टक्क्यांच्या वर आहेत, त्यांना आम्ही जागा दिलेल्या आहेत. काही लोक ५० टक्क्यांच्या खाली आम्हाला दिसत आहेत, त्यांना आम्ही तिकीट देणार नाही.