महाराष्ट्रात निवडणूक आचारसंहितेचा भंग; आतापर्यंत २८० कोटींची मालमत्ता जप्त

By ऑनलाइन लोकमत | Published: November 6, 2024 06:26 PM2024-11-06T18:26:43+5:302024-11-06T18:41:37+5:30

Maharashtra Assembly Election 2024 : निवडणूक आयोगाने केलेल्या कारवाईत आतापर्यंत महाराष्ट्रातून २८० कोटी रुपये जप्त करण्यात आले आहेत.

Maharashtra Assembly Election 2024 Election Commission 280 crores have been seized from Maharashtra so far | महाराष्ट्रात निवडणूक आचारसंहितेचा भंग; आतापर्यंत २८० कोटींची मालमत्ता जप्त

महाराष्ट्रात निवडणूक आचारसंहितेचा भंग; आतापर्यंत २८० कोटींची मालमत्ता जप्त

Election Commission of India :महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक काही १४ दिवसांवर येऊन ठेपली आहे. २० नोव्हेंबर रोजी महाराष्ट्रातील सर्व २८८ जागांसाठी मतदान होणार आहे. याआधीही १५ ऑक्टोबरपासून आदर्श आचारसंहिता लागू झाली असली तरी त्याचे पालन होताना दिसत नाहीये. मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाकडून दिलेल्या माहितीनुसार, याआधी १५ ते २५ ऑक्टोबर या कालावधीत राज्यभरातून सी-व्हिजिल ॲपवर एकूण १२५९ तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. त्यापैकी १२५० तक्रारींचे निवडणूक आयोगाने तत्काळ निराकरण केले. अशातच आता राज्यात निवडणूक जाहीर झाल्यापासून २८० कोटी रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे.

महाराष्ट्र आणि झारखंड विधानसभा निवडणुकीबाबत निवडणूक आयोगाने अत्यंत कडक पावले उचलली आहेत. मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी  महाराष्ट्र पोलीस महासंचालकांना राजकीय गुन्ह्यांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले होते. मुख्य निवडणूक आयुक्तांनी झारखंड, महाराष्ट्र आणि त्यांच्या सीमावर्ती राज्यांचे मुख्य सचिव, पोलीस आयुक्त आणि इतर अधिकाऱ्यांची बैठक घेतली होती. यामध्ये निवडणुकीदरम्यानच्या कायदा आणि सुव्यवस्थेबाबत चर्चा करण्यात आली. त्यानंतर आता आचारसंहिता लागू झाल्यापासून आतापर्यंत २८० कोटी रुपयांची मालमत्ता  जप्त करण्यात आले आहेत. तर झारखंडमधून १५८ कोटींची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे.

महाराष्ट्र, झारखंड आणि पोटनिवडणुकीत चालू असलेल्या निवडणुकांमध्ये कोणतेही प्रलोभन रोखण्यासाठी निवडणूक आयोगाच्या अंतर्गत यंत्रणांनी ५५८ कोटी रुपयांची रोकड, मोफत वस्तू, दारू, ड्रग्ज आणि मौल्यवान धातू जप्त केले आहेत. निवडणुका जाहीर झाल्यापासून  एकट्या महाराष्ट्र राज्यातील कारवाईमध्ये सुमारे २८० कोटी आणि झारखंडमधून आतापर्यंत १५८ कोटी रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आले आहेत.

दरम्यान, २०१९ मधील विधानसभा निवडणुकीच्या तुलनेत दोन निवडणुकांच्या राज्यांमध्ये जप्तीची रक्कम ३.५ पटीने वाढली आहे. महाराष्ट्रात आतापर्यंत ७३.११ कोटींची रोकड, ३७.९८ कोटींचे मद्य, ३७.७६ कोटींचे अंमली पदार्थ,९०.५३ कोटींचे मौल्यवान धातू जप्त करण्यात आले आहेत.
 

Web Title: Maharashtra Assembly Election 2024 Election Commission 280 crores have been seized from Maharashtra so far

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.