"महिलांचा अपमान करणाऱ्यांवर कारवाई करा"; महाराष्ट्रातल्या प्रकरणांवरुन निवडणूक आयुक्तांचे कठोर आदेश
By ऑनलाइन लोकमत | Published: November 8, 2024 07:26 PM2024-11-08T19:26:09+5:302024-11-08T19:38:33+5:30
निवडणूक आयोगाने महाराष्ट्र निवडणूक प्रचारादरम्यान महिला राजकीय नेत्यांसाठी अयोग्य भाषा वापरल्याचा निषेध केला आहे.
Election Commission: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान महिलांबाबत केलेल्या वक्तव्याची निवडणूक आयोगाने दखल घेतली आहे. महिलांबद्दल अपमानास्पद आणि अशोभनीय टिप्पणी करणाऱ्यांवर कठोरपणे कारवाईचे आदेश निवडणूक आयोगाने अधिकाऱ्यांना स्पष्टपणे दिले आहेत. मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी अशा लोकांवर कठोर कारवाई करण्यास सांगितले आहे. ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत आणि आमदार सुनील राऊत यांनी शिंदे गटाच्या महिला उमेदवारांबाबत केलेल्या वक्तव्यांमुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता.
मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी महाराष्ट्रातील निवडणूक प्रचारादरम्यान महिला उमेदवारांसाठी अयोग्य भाषा वापरल्याबाबत रोष व्यक्त केला आहे. मुख्य निवडणूक आयुक्तांनी अधिकाऱ्यांना अशा प्रकारच्या टिप्पणी करणाऱ्या कोणत्याही उमेदवारावर त्वरित आणि निर्णायक कारवाई करण्यास सांगितले आहे. निवडणूक आणि कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या अधिकाऱ्यांशी झालेल्या बैठकीत कुमार यांनी महिलांची प्रतिष्ठा आणि आदर कमी करणाऱ्या भाषेबद्दल तीव्र नापसंती आणि चिंता व्यक्त केली.
निवडणूक आचारसंहितेनुसार, राजकीय पक्ष आणि उमेदवारांनी महिलांच्या सन्मानाला बाधा पोहोचणारे कोणतेही काम, क्रिया किंवा वक्तव्य टाळायला हवे. उमेदवारांनी वैयक्तिक हल्ले किंवा सार्वजनिक भूमिकांशी संबंधित नसलेली टीका टाळावी,असे राजीव कुमार यांनी म्हटलं आहे. निवडणूक आचारसंहितेचा भंग करुन महिलांबाबत केलेल्या कोणत्याही अपमानास्पद वक्तव्याविरुद्ध तात्काळ आणि कठोर कारवाई केली जाईल याची खात्री करण्याचे निर्देश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत.
निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार आणि सुखबीर सिंग संधू यांच्यासोबत व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे अधिकाऱ्यांच्या आढावा बैठकीला संबोधित करताना राजीव कुमार यांनी महिला नेत्यांना लक्ष्य करून केलेल्या अपमानास्पद आणि असभ्य टिप्पण्यांचा निषेध केला. अधिकाऱ्यांना अशा प्रकरणांमध्ये कारवाई करण्यास सांगितले.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी प्रचारादरम्यान शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी मुंबादेवी विधानसभा मतदारसंघातील शिवसेनेच्या उमेदवार शायना एनसी यांना इम्पोर्टेड माल असं म्हटले होते. त्यानंतर शायना एनसी यांनी नागपाडा पोलिस ठाण्यात सावंतविरोधात तक्रार दाखल केली. मात्र, नंतर सावंत यांनी आपल्या वक्तव्यावर माफी मागितली. महिला आयोगासह निवडणूक आयोगानेही याची दखल घेतली आहे.