ऐन विधानसभा निवडणुकीत ठाकरे गटाच्या ५ बड्या नेत्यांची पक्षातून हकालपट्टी
By ऑनलाइन लोकमत | Published: November 5, 2024 04:36 PM2024-11-05T16:36:39+5:302024-11-05T16:38:33+5:30
उद्धव ठाकरे यांच्याकडून पक्षविरोधी कारवाया करणाऱ्या नेत्यांना पक्षातून बाहेर काढलं आहे.
मुंबई - राज्यात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. त्यातच पक्षविरोधी कारवाया केल्यामुळे ठाकरे गटातील ५ बड्या नेत्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. त्यात भिवंडी येथील माजी आमदार रुपेश म्हात्रे यांचा समावेश आहे. भिवंडी पूर्व मतदारसंघ महाविकास आघाडीकडून समाजवादी पक्षाला सोडण्यात आला. त्यात तिथले माजी आमदार रुपेश म्हात्रे यांनी अपक्ष निवडणुकीत अर्ज दाखल केला. मात्र शेवटच्या क्षणी त्यांनी अर्ज मागे घेतला. तरीही पक्षविरोधी कारवाया केल्यामुळे रुपेश म्हात्रे यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे.
शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून ही माहिती देण्यात आली आहे. त्यात शिवसेना ठाकरे गटाचे भिवंडी लोकसभा मतदारसंघाचे संपर्क प्रमुख रुपेश म्हात्रे यांची पक्षविरोधी कारवाया केल्यामुळे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. तसेच यवतमाळ जिल्ह्यातील विश्वास नांदेकर, जिल्हाप्रमुख वणी विधानसभा, चंद्रकांत घुगूल, झरी तालुकाप्रमुख, संजय आवारी- मारेगाव तालुकाप्रमुख, प्रसाद ठाकरे, वणी तालुकाप्रमुख यांचीही पक्षविरोधी कारवाया केल्याने पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे.
रुपेश म्हात्रेंनी केला होता गंभीर आरोप
अपक्ष उमेदवारी दाखल केल्यानंतर माजी आमदार रुपेश म्हात्रे यांनी कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला होता. यावेळी त्यांनी माध्यमांसोबत बोलताना उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली. रुपेश म्हात्रे म्हणाले होते की, पक्षात फूट झाली त्यानंतर आम्ही पक्षाची एकजूट करण्यासाठी मी सर्व काही केले आहे. लोकसभेत आम्ही ताकद वाढवली. आमच्या पक्षाने ठरवला तो खासदार आम्ही निवडून दिला, लोकसभेत आमच्यावर अन्याय झाला. आता विधानसभेत जागावाटपाटतही आमच्यावर अन्याय झाला. २०१४ मध्ये एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या मुलाला निवडून यावं म्हणून कपिल पाटील यांचं काम आम्हा सर्वांना करावं लागलं. आता देखील तीच परिस्थिती आहे. वांद्रे आणि वरळीमध्ये मदत व्हावी म्हणून या ठिकाणी मुस्लिम उमेदवारी किंवा समाजवादीचा उमेदवार देण्यात यावा, अशापद्धतीने कुठेतरी त्यांच्या राजकारणासाठी आमचा प्रत्येकवेळी बळी देण्याचं काम होत आहे. भिवंडीवर नेहमी अन्याय केला जात आहे. हेच यापूर्वी एकनाथ शिंदे यांनी केले आहे, आता उद्धव ठाकरेही करत आहेत असा आरोप त्यांनी केला होता.