ठाकरे गटातून माजी खासदाराची हकालपट्टी; पैसे घेऊन उमेदवारी दिल्याचा केला होता आरोप
By ऑनलाइन लोकमत | Published: November 9, 2024 08:48 AM2024-11-09T08:48:23+5:302024-11-09T08:56:17+5:30
एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबत गेलेल्यांना आपण गद्दार आहे, ५० खोके म्हणतो. पण तुमच्यासोबत राहणारे रोज गद्दारी करणारे त्यांना महागद्दार बोलायचं का असा सवाल माजी खासदाराने उद्धव ठाकरेंना विचारला होता.
नांदेड - जिल्ह्यात ९ विधानसभा मतदारसंघ आहेत. याठिकाणी केवळ १ जागा ठाकरे गटाला मिळाली. दुसरी नांदेड उत्तर याठिकाणी असलेला उमेदवार अधिकृत आहे की नाही याबाबत खेळ सुरू आहे. जिल्ह्याचे संपर्कप्रमुख बबन थोरात यांनी नांदेडमधील शिवसेना पूर्ण विकून टाकली. पैसे घेऊन उमेदवारी दिली जाते, जिल्हाप्रमुख, शहरप्रमुख तालुकाप्रमुखपदासाठी पैसे घेतात. प्रत्येक कार्यकर्त्याकडून पैसे घेतले जाते. याची तक्रार आम्ही १० वेळा पक्षप्रमुखांकडे केली. मात्र त्याची दखल घेतली जात नाही. कार्यकर्त्यांना विचार केला जात नाही असा आरोप हिंगोलीचे माजी खासदार सुभाष वानखेडे यांनी उद्धव ठाकरेंवर केला आहे.
सुभाष वानखेडे म्हणाले की, कार्यकर्ते संतप्त आहेत. नांदेड उत्तरमध्ये काँग्रेसनं उमेदवारी दिली होती. तिथे ठाकरे गटानेही आयात उमेदवाराला एबी फॉर्म दिला. महाविकास आघाडी असताना उमेदवारी पक्षाची देत असताना विचार करायला हवा होता. आम्ही उबाठात होतो, उद्या परवा काहीही होऊ शकते. पैसे घेऊन एक नाही तिकिटे विकली जातात त्यांच्यावर कारवाई करत नाहीत. पक्ष आणि पक्षाचे नेते खेळ करत असतील तर कार्यकर्तेही खेळ करतील. उद्धव ठाकरेंसोबत राहून रोज रोज गद्दारी करणारे आहेत. एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबत गेलेल्यांना आपण गद्दार आहे, ५० खोके म्हणतो. पण तुमच्यासोबत राहणारे रोज गद्दारी करणारे त्यांना महागद्दार बोलायचं का असा सवाल त्यांनी विचारला.
काय आहे वाद?
नांदेड उत्तर मतदारसंघातील उमेदवारीवरून ठाकरे गटात वाद सुरू आहे. याठिकाणी पक्षाने संगीता पाटील डक यांना उमेदवारी दिली. मात्र पैसे घेऊन आयात उमेदवारी दिल्याचा आरोप माजी खासदार सुभाष वानखेडे यांनी केला आहे. याबाबत जिल्ह्याचे संपर्कप्रमुख बबन थोरात यांच्याविरोधात घोषणाबाजी करत ठाकरे गटातील कार्यकर्ते आक्रमक झाले होते. नांदेड जिल्ह्यात एकेकाळी शिवसेनेचे ४ आमदार होते, नांदेड महापालिकाही ताब्यात होती. नांदेडमधील जिल्हा परिषद, पंचायत समिती इथं शिवसेनेचे प्रतिनिधित्व होते. मात्र बबन थोरात नावाचा व्यक्ती नांदेड जिल्ह्यात आल्यानंतर त्याने पूर्ण शिवसेना विकून खाल्ली असा आरोप वानखेडेंनी केला. त्यामुळे संतप्त झालेले शिवसैनिक बबन थोरात यांच्याविरोधात घोषणाबाजी केली.
सुभाष वानखेडेंची हकालपट्टी
दरम्यान, नांदेडमधील प्रकाराची दखल घेत हिंगोलीचे माजी खासदार सुभाष वानखेडे यांची पक्षविरोधी कारवाया केल्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने पक्षातून हकालपट्टी करण्यात आल्याची माहिती शिवसेना मध्यवर्ती कार्यालयाने दिली आहे.