मनसेची आज पहिली सभा; राज ठाकरे कोणाचा समाचार घेणार?
By ऑनलाइन लोकमत | Published: November 4, 2024 11:17 AM2024-11-04T11:17:16+5:302024-11-04T11:19:57+5:30
Maharashtra Assembly Election 2024 : डोंबिवली मतदारसंघात भाजपचे उमेदवार मंत्री रवींद्र चव्हाण यांच्याविरोधात मनसेने उमेदवार दिलेला नाही.
Maharashtra Assembly Election 2024 : डोंबिवली : राज्यात विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची आज (दि.४) पहिली सभा कल्याण ग्रामीणमध्ये होणार आहे. यानिमित्ताने राज ठाकरे प्रचाराचा नारळ फोडणार आहेत. येथील उमेदवार आ. राजू पाटील यांच्या प्रचारासाठी ही सभा डोंबिवलीतील पी एण्ड टी कॉलनीमधील श्री महावैष्णव मारुती मंदिर येथील चौकात संध्याकाळी ४ वाजता होणार आहे.
डोंबिवली मतदारसंघात भाजपचे उमेदवार मंत्री रवींद्र चव्हाण यांच्याविरोधात मनसेने उमेदवार दिलेला नाही. दरम्यान, मनसेचा आमदार असलेल्या कल्याण ग्रामीणमधून कल्याण लोकसभा निवडणुकीवेळी शिंदेसेनेचे उमेदवार खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांना भरभरून मते मिळाली होती. त्यामुळे परतफेड म्हणून शिंदेसेना या मतदारसंघात उमेदवार उभा करणार नाही, अशी चर्चा होती, मात्र मनसेच्या विरोधात शिंदेसेनेने शहरप्रमुख राजेश मोरे यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे राज ठाकरे विरोधकांसह शिंदेसेनेचा समाचार घेतात का? याकडे लक्ष लागले आहे.
या सभेनंतर राज ठाकरे उमेदवार अविनाश जाधव यांच्या प्रचारार्थ ठाणे येथे सभा घेणार आहेत. मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यात राज ठाकरे यांची सभा होणार आहे. ठाण्यातील कोपरी-पाचपाखाडी वगळता उर्वरीत तीन विधानसभा मतदार संघात उभे असलेल्या मेदवारांनी युती आणि आघाडीसह दिग्गजांसमोर आव्हान उभे केले आहे. यातच आज राज ठाकरे हे अविनाश जाधव यांच्यासह इतर दोन उमेदवारांच्या प्रचारासाठी येत असल्याने मनसैनिकांमध्ये उत्साह संचारला आहे.
दरम्यान, आज उमेदवारी अर्ज माघारी घेण्याची तारीख असून त्यानंतर कोणाच्या लढती कोणासोबत होणार आहेत, याचे चित्र स्पष्ट होईल. त्यानंतर खऱ्या अर्थाने प्रचाराच्या रणधुमाळीला सुरुवात होईल.