"वर्षभर वेळ मागितला, तरी दिला नाही; मातोश्रीवर गेलो तिथे ६ तास थांबवलं अन् २ मिनिटे भेटले"

By ऑनलाइन लोकमत | Published: October 25, 2024 05:12 PM2024-10-25T17:12:57+5:302024-10-25T17:13:40+5:30

महाविकास आघाडीकडून तिकीट न मिळाल्याने माजी आमदार नाराज, अपक्ष निवडणूक लढण्याचा निर्णय घेणार?

Maharashtra Assembly Election 2024 - Former MLA Mahadev Babar upset with Uddhav Thackeray for not getting candidature in Hadapsar constituency | "वर्षभर वेळ मागितला, तरी दिला नाही; मातोश्रीवर गेलो तिथे ६ तास थांबवलं अन् २ मिनिटे भेटले"

"वर्षभर वेळ मागितला, तरी दिला नाही; मातोश्रीवर गेलो तिथे ६ तास थांबवलं अन् २ मिनिटे भेटले"

पुणे - शहरातील हडपसर मतदारसंघ महाविकास आघाडीत शरद पवारांच्या राष्ट्रवादीला सोडल्याने ठाकरे गटात नाराजी पसरली आहे. या मतदारसंघात माजी आमदार महादेव बाबर हे इच्छुक होते. गेल्या कित्येक दिवसांपासून ते मतदारसंघात निवडणूक लढण्याची तयारी करत होते. त्यासाठी मातोश्री येथे जाऊन महादेव बाबर यांनी शक्ती प्रदर्शन करत हडपसर मतदारसंघावर दावा सांगितला होता. मात्र याठिकाणी मविआकडून प्रशांत जगताप यांना उमेदवारी जाहीर झाली आहे.

याबाबत ठाकरे गटाचे नेते माजी आमदार महादेव बाबर म्हणाले की, मी आजही या मतदारसंघात लढण्यास इच्छुक आहे. हडपसर मतदारसंघात जिंकायचं असेल तर महादेव बाबरशिवाय पर्याय नव्हता. गेली २५-३० वर्ष या मतदारसंघात मी काम करतोय. लोकांची नाळ माझ्याशी जोडलेली आहे. ज्यांचा या मतदारसंघाशी संबंध नाही. ज्यांचे इथं मतदार यादीत नाव नाही त्या माणसासाठी इतका अट्टाहास का केला हे कळालं नाही अशी खंत त्यांनी व्यक्त केली.

तसेच १९८३ पासून मी शिवसेनेचा शाखाप्रमुख, त्यानंतर नगरसेवक, शहरप्रमुख आणि मग आमदार होतो. १० वर्षापूर्वी मी निवडणूक हरलो तरी सातत्याने या मतदारसंघात लोकांशी संपर्क, पक्ष वाढवण्याचा प्रयत्न केला परंतु पक्षाने मला न्याय दिला नाही हे दुर्दैव आहे. माझे वडील आज हयात नाहीत, त्यांनी जरी मला येऊन सांगितले तुम्ही महाविकास आघाडीचं काम करा तरी मी करू शकत नाही. माझ्यावर अन्याय झाला आहे. कार्यकर्त्यांशी बोलून मी पुढचा निर्णय घेणार आहे. काहीही झालं तरी महाविकास आघाडीचं काम करणार नाही हे माझे पक्क आहे असं महादेव बाबर यांनी स्पष्ट सांगितले.

दरम्यान, आमचा फॉर्म तयार आहे. निवडणूक लढण्याची तयारी आहे. फक्त कार्यकर्त्यांना विचारायचं आहे, जर ते म्हणाले पुढे जायचे तर जायचे, जर बोलले थांबायचे तर थांबायचे पण कुणाचे काम करणार नाही. मला कुणाचाही निरोप येऊ द्या. ज्यांना आपलं देणेघेणे नाही त्यांच्याशी आपल्यालाही देणेघेणे नाही. उद्धव ठाकरेंकडे गाऱ्हाणे मांडायला १ वर्षाने वेळ दिली, ती पण वेळ दिली नाही तर आम्ही मातोश्रीवर गेलो. सहा तास आम्हाला बसवलं आणि २ मिनिटे वेळ दिला ही आमची शोकांतिका आहे अशी नाराजीही माजी आमदार महादेव बाबर यांनी बोलून दाखवली. 

Web Title: Maharashtra Assembly Election 2024 - Former MLA Mahadev Babar upset with Uddhav Thackeray for not getting candidature in Hadapsar constituency

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.