"आम्हाला ५ जागा द्या, अन्यथा २५ जागांवर लढणार’’, मित्रपक्षाचा मविआला इशारा
By ऑनलाइन लोकमत | Published: October 25, 2024 06:13 PM2024-10-25T18:13:01+5:302024-10-25T18:51:08+5:30
Maharashtra Assembly Election 2024: महाविकास आघाडीतील छोट्या घटक पक्षांपैकी प्रमुख पक्ष असलेल्या समाजवादी पार्टीने ५ जागा द्या अन्यथा आम्ही २५ जागांवर निवडणूक लढवणार असा थेट इशाराच दिला आहे.
विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख जवळ येत चालली तरी महाविकास आघाडीमधील जागावाटपाचा धोळ अद्यापही सुटलेला नाही. महाविकास आघाडीतील तिन्ही प्रमुख पक्षांना आपापल्या पहिल्या यादीमधून काही जागांवरील उमेदवारांची घोषणा केली आहे. मात्र बहुतांश जागांवरील तिढा अद्याप सुटलेला नाही. त्यातच महाविकास आघाडीकडून मित्रपक्षांना किती जागा मिळणार हेही स्पष्ट होऊ शकलेलं नाही. त्यामुळे महाविकास आघाडीतील छोट्या पक्षांच्या मनामध्ये चलबिचल निर्माण झालेली आहे. तसेच महाविकास आघाडीतील छोट्या घटक पक्षांपैकी प्रमुख पक्ष असलेल्या समाजवादी पार्टीने ५ जागा द्या अन्यथा आम्ही २५ जागांवर निवडणूक लढवणार असा थेट इशाराच दिला आहे.
समाजवादी पक्षाला विधानसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीच्या जागावाटपामधून किमान ५ जागा मिळाव्यात अन्यथा आम्ही २५ जागांवर लढण्याची तयारी केली आहे, असं सूचक विधान समाजवादी पक्षाचे महाराष्ट्रातील नेते अबू आझमी यांनी केलं आहे. उद्यापर्यंत महाविकास आघाडीचं जागावाटप जाहीर झालं नाही तर स्वतंत्रपणे लढण्याचा निर्णय घेतला जाईल, असा इशारा त्यांनी शरद पवार यांची भेट घेतल्यानंतर दिला आहे.
शरद पवार यांची भेट घेतल्यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना अबू आझमी म्हणाले की, शरद पवार यंच्यापेक्षा मोठा नेता महाविकास आघाडीमध्ये आहे, असं मला वाटत नाही. शरद पवारच आहेत ज्यांच्याशी चर्चा केली जाऊ शकते. मी केवळ त्यांच्याकडे एवढंच सांगण्यासाठी आलो होतो की, मी पाच उमेदवारांची नावं जाहीर केली आहेत. तुम्ही उत्तर देत असाल तर ठीक आहे नाहीतर माझ्याकडे २५ उमेदवार तयार आहे. त्यांना मी उमेदवारी देईन. कारण याआधी माझी दोनवेळा काँग्रेसकडून फसवणूक झालेली आहे. कारण हे लोक शेवटच्या एक दोन दिवसांपर्यंत वाट पाहा, वाटा पाहा असं सांगतात आणि शेवटच्या क्षणी फसवणूक करतात, असा आरोप अबू आझमी यांनी केला.
ते पुढे म्हणाले की, शरद पवार यांनी मला एक दिवस थांबण्यास सांगितलं आहे. जर यांनी तोपर्यंत आम्हाला ५ जागा देण्याची घोषणा केली तर मी महाविकास आघाडीमध्ये राहीन. नाहीतर मी आमचे २५-३० उमेदवार मैदानात उतरवेन. मग त्यांच काय व्हायचं ते होऊ दे, असा इशाराच अबू आझमी यांनी दिला.