...तर उद्धव ठाकरे ५ वर्षांसाठी मुख्यमंत्री झाले असते; देवेंद्र फडणवीसांनी मांडलं समीकरण

By ऑनलाइन लोकमत | Published: November 4, 2024 06:41 PM2024-11-04T18:41:56+5:302024-11-04T19:49:49+5:30

मनसेसोबत चर्चा, उद्धव ठाकरे की एकनाथ शिंदे कुणासोबत काम करणे सोपे यासारख्या अनेक मुद्द्यांवर देवेंद्र फडणवीसांनी 'लोकमत'च्या मुलाखतीत भाष्य केले आहे.

Maharashtra Assembly Election 2024 - Had the alliance not broken in 2014, Uddhav Thackeray would have been CM for 5 years, Devendra Fadnavis made a statement | ...तर उद्धव ठाकरे ५ वर्षांसाठी मुख्यमंत्री झाले असते; देवेंद्र फडणवीसांनी मांडलं समीकरण

...तर उद्धव ठाकरे ५ वर्षांसाठी मुख्यमंत्री झाले असते; देवेंद्र फडणवीसांनी मांडलं समीकरण

मुंबई - राजकारणात 'जर-तर'ला काही अर्थ नसतो. शिवसेना १४७, भाजपा १२७ आणि  मित्रपक्ष १८ हा आमचा प्रस्ताव जर २०१४ साली उद्धव ठाकरेंनी स्वीकारला असता तर ५ वर्षांसाठी तेच मुख्यमंत्री राहिले असते. मी मुख्यमंत्री झालोच नसतो, असं समीकरण उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मांडलं आहे. एकनाथ शिंदेंसोबत सरकार स्थापन केलं नसतं, जे चाललंय ते चालू दे असं म्हणून थांबला असतात, तर आज एकहाती सत्ता स्थापन करता आली असती, असं वाटत नाही का?, या प्रश्नावर त्यांनी वरील उदाहरण देत आपली बाजू मांडली. आम्ही युतीचं राजकारण स्वीकारलं आहे. जोपर्यंत स्वबळावर निवडून येण्याची क्षमता होत नाही तोपर्यंत युतीचं राजकारण सुरू राहील, अशी भूमिकाही त्यांनी स्पष्ट केली.  

लोकमत मुंबईचे संपादक अतुल कुलकर्णी आणि सहयोगी संपादक यदु जोशी यांनी देवेंद्र फडणवीस यांची मुलाखत घेतली. या मुलाखतीत फडणवीसांनी एकूणच राजकीय विषयांवर सविस्तर संवाद साधला. ते म्हणाले की, "२०१४ साली आम्ही स्वबळावर निवडणूक लढवली. त्यामुळेच आमची प्रगती झाली. तोपर्यंत भाजपाची ताकद काय हे जनतेलाही माहिती नव्हते आणि आम्हालाही माहीत नव्हते. त्यासाठी उद्धव ठाकरेंचे आभार मानेन, त्यांनी केवळ ४ जागांसाठी युती तोडली. १२७ जागांवर लढणाऱ्या भाजपाला २६० जागा लढता आल्या. त्यातील १२२ जागा निवडून आल्या. महाराष्ट्रात सर्वात मोठा पक्ष भाजपा पुढे आला. २०१४ च्या निवडणुकीनंतर आमची प्रगती झाली. कदाचित भविष्यात अशी संधी पुन्हा येईल."

उद्धव ठाकरें राजकीय विचार, वस्तुस्थितीचं भान ठेवून विचार करत नाहीत, असं देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टपणे सांगितलं. उद्धव ठाकरेंसोबत काम करणं मला कठीण गेले नाही. शेवटच्या काळात थोडं कठीण झाले. उद्धव ठाकरेंसोबत काम करताना काय अडचणी येतात हे महाविकास आघाडीला कळलं असेल, अशी टिप्पणीही त्यांनी केली. तुमच्यासोबत काम करणारे हे प्रॅक्टिकल विचार करणारे असतील, वस्तुस्थितीचे भान ठेवून निर्णय घेणारे असतील तर ते अधिक सोपे जाते. उद्धव ठाकरेंच्या तुलनेने एकनाथ शिंदे हे वस्तुस्थितीचे भान ठेवून, जमिनीवरील ज्ञान ठेवून निर्णय घेतात. त्यामुळे त्यांच्यासोबत काम करणे सोपे आहे, असं फडणवीस यांनी नमूद केलं. एकनाथ शिंदेंसोबत अनेक वर्षं काम केलं आहे. अजितदादा विरोधात होते त्यामुळे त्यांच्याशी तितका संबंध आला नव्हता, असंही ते म्हणाले. 

"राजकारणात कुणी कुणाला संपवू शकत नाही!"

राजकारणात कुणीच कुणाला संपवू शकत नाही. मीदेखील कुणाला संपवू शकत नाही आणि कुणी मला संपवू शकत नाही. राजकारणात नेत्यांना फक्त जनता संपवू शकते. ही जनतेची ताकद आहे. जनतेचा आशीर्वाद घेऊन पुढे चालतोय त्यामुळे संपण्याचा विषय नाही. २०१९ ते २०२४ महाराष्ट्रातलं राजकारण जे झालंय ते पाहिल्यानंतर निवडून कोण येणार, सरकार कोण बनवतं अशाप्रकारे अनेक प्रश्न निर्माण होतात. यावेळी महाराष्ट्रात स्पष्ट बहुमत जनता देईल असा विश्वास आहे, असं फडणवीस यांनी ठामपणे सांगितलं.

अडीच वर्षाचा शब्द कुणाला बंद खोलीत दिला नाही, उघडही दिला नाही. कोणाला कुठलाच शब्द दिला नाही. निवडणूक झाल्यानंतर तिन्ही पक्षाचे नेते बसतील आणि कोण मुख्यमंत्री हे ठरवतील. माझी भूमिका निवडणूक समितीत असते. पुढील भूमिकेत माझा रोल नसतो. कोत्या मनाने वागण्यापेक्षा सरळ हाताने देणे गरजेचे असते. एकनाथ शिंदे त्यांच्या कार्यपद्धतीने काम करतात. आम्हाला त्यांचं नुकसान होत नाही, असा टोला देवेंद्र फडणवीसांनी उद्धव ठाकरेंना लगावला. 

राज ठाकरे मित्र, पण...

सध्या राज ठाकरे हे आमच्या महायुतीचा भाग नाहीत. व्यक्तिगत मैत्री असली तरी आघाडीचा भाग नाहीत. शिवडीसारख्या एका जागेवर आम्ही उमेदवार दिला नाही. तिथे मनसेचा उमेदवार आहे. भाजपाविरोधात ७० टक्के जागांवर मनसेचे उमेदवार आहेत. त्यामुळे लढाई आमची आहे. आमची लढाई थेट त्यांच्याशी नाही, कारण काही मुद्द्यांवर त्यांचे आणि आमचे एकमत आहे. विचार सारखे आहेत. ते त्यांचा पक्ष चालवताहेत. राज ठाकरे मत मागताना महायुतीसाठी मागणार नाहीत. ते आमच्या उमेदवाराविरोधात मत मागताहेत. त्यामुळे आमची लढाई निश्चित आहे असं सांगत देवेंद्र फडणवीसांनी बंद दाराआड मनसेसोबत सध्या कुठलीही चर्चा नसल्याचं स्पष्ट केले.

पाहा व्हिडिओ

Web Title: Maharashtra Assembly Election 2024 - Had the alliance not broken in 2014, Uddhav Thackeray would have been CM for 5 years, Devendra Fadnavis made a statement

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.