अडीच वर्षांचा शब्द कुणालाही दिलेला नाही; देवेंद्र फडणवीस यांनी आधीच स्पष्ट केलं

By ऑनलाइन लोकमत | Published: November 4, 2024 08:27 PM2024-11-04T20:27:08+5:302024-11-04T20:28:07+5:30

भाजपाचं शतप्रतिशतचं स्वप्न कधी पूर्ण होणार, मित्रपक्षांची गरज का भासतेय, निकालानंतर मुख्यमंत्री कोण यावर देवेंद्र फडणवीसांनी लोकमतच्या मुलाखतीत दिलखुलास उत्तरे दिली. 

Maharashtra Assembly Election 2024 - Has BJP promised the post of CM in the Mahayuti, What Devendra Fadnavis said | अडीच वर्षांचा शब्द कुणालाही दिलेला नाही; देवेंद्र फडणवीस यांनी आधीच स्पष्ट केलं

अडीच वर्षांचा शब्द कुणालाही दिलेला नाही; देवेंद्र फडणवीस यांनी आधीच स्पष्ट केलं

मुंबई - महाराष्ट्रातील राजकारणात २०१९ च्या निकालानंतर मोठी उलथापालथ झाली. यात कारणीभूत ठरलं ते म्हणजे मुख्यमंत्री खुर्ची...मुख्यमंत्रि‍पदाचा दिलेला शब्द पाळला नाही असा आरोप करत उद्धव ठाकरेंनी काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत हातमिळवणी केली. २०२४ च्या निकालानंतरही अशी परिस्थिती निर्माण होईल का अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. त्यात भाजपा नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट शब्दात अडीच वर्षाचा शब्द आम्ही कुणालाही दिला नाही असं मुलाखतीत सांगितले आहे. 

देवेंद्र फडणवीस म्हणाले की, अडीच वर्षाचा शब्द आम्ही कुणाला बंद खोलीत दिला नाही, उघडही दिला नाही. कोणाला कुठलाच शब्द दिला नाही. निवडणूक झाल्यानंतर तिन्ही पक्षाचे नेते बसतील आणि कोण मुख्यमंत्री हे ठरवतील. माझी भूमिका निवडणूक समितीत असते. पुढील भूमिकेत माझा रोल नसतो. २०१९ ते २०२४ महाराष्ट्रातलं राजकारण जे झालंय ते पाहिल्यानंतर निवडून कोण येणार, सरकार कोण बनवतं अशाप्रकारे अनेक प्रश्न निर्माण होतात. यावेळी महाराष्ट्रात स्पष्ट बहुमत जनता देईल असा विश्वास आहे असं त्यांनी ठामपणे सांगितले. लोकमत मुंबईचे संपादक अतुल कुलकर्णी आणि सहयोगी संपादक यदु जोशी यांनी देवेंद्र फडणवीस यांची मुलाखत घेतली. त्यात ते बोलत होते.

तसेच प्रत्येकाला आपापला पक्ष आहे, त्यामुळे जास्त जागा मिळाव्यात असा आग्रह असतो. कार्यकर्त्यांचाही असतो. महाविकास आघाडीशी तुलना करता आम्ही सामंजस्याने जागावाटप केले. पहिल्या २ चर्चांमध्ये आमचं २४० जागांचं वाटप झालं होतं. ४८ जागांपैकी ३८ जागांवर तिसऱ्या चर्चेत तोडगा निघाला. १० जागांवर निश्चितपणे आम्हाला त्रास झाला. शेवटी त्याचा निकालही आम्ही लावला आहे. महायुतीत आम्हाला १६०-१६५ जागांची अपेक्षा होती. परंतु १५२ जागा मिळाल्या. महायुतीत तीन पक्ष लढत असताना १५२ जागा मिळणे हेदेखील अत्यंत महत्त्वाचे आहे असं फडणवीसांनी नमूद केले. 

दरम्यान, ५० वर्षं राम मंदिराचं स्वप्न उराशी बाळगून आम्ही एक दिवस हे स्वप्न पूर्ण करू शकतो अशा ताकदीने काम करायचे. जेव्हा योग्य वेळ आली तेव्हा राम मंदिर उभं राहिले. त्यामुळे शत प्रतिशत भाजपा एका दिवसात होऊ शकत नाही. लोकांचा विश्वास आम्हाला अधिक कमवावा लागेल. आज महाराष्ट्रात जे काही युतीचे राजकारण आहे त्याला पर्याय नाही. भाजपाची ताकद आहे, पण केवळ ताकदीवर निवडून येऊ शकतो का तर असं नाही. आम्हाला मित्रांची गरज आहे. त्यामुळे आम्ही मित्रांसोबत लढतोय असंही देवेंद्र फडणवीसांनी स्पष्ट केले. 
 

Web Title: Maharashtra Assembly Election 2024 - Has BJP promised the post of CM in the Mahayuti, What Devendra Fadnavis said

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.