महायुतीचे आतापर्यंत एकूण किती उमेदवार जाहीर? किती जागांवर निर्णय बाकी? कधी होणार अंतिम?
By ऑनलाइन लोकमत | Published: October 23, 2024 03:04 PM2024-10-23T15:04:24+5:302024-10-23T15:06:19+5:30
Maharashtra Assembly Election 2024: महायुतीतील भाजपा, शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने बहुतांश दिग्गजांनाच पुन्हा संधी दिली आहे.
Maharashtra Assembly Election 2024: महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली असून, राजकीय घडामोडींना मोठा वेग आल्याचे पाहायला मिळत आहे. गुरुवारी म्हणजे, २४ ऑक्टोबर रोजी चंद्र संपूर्ण दिवस-रात्र पुष्य नक्षत्रात राहणार असल्याने दुर्मीळ असा ‘गुरुपुष्यामृत योग’ असून हाच योग साधत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, जितेंद्र आव्हाड, भाजपचे आमदार संजय केळकर, अविनाश जाधव, राजू पाटील हे आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. आव्हाड यांचा अर्ज दाखल करण्यासाठी शरद पवार तर अविनाश जाधव यांचा अर्ज दाखल करण्यासाठी राज ठाकरे हे ठाण्यात हजेरी लावणार आहेत, असे समजते. उमेदवारी यादी जाहीर करण्यात महायुतीने बाजी मारली असून, महाविकास आघाडीचा अद्यापपर्यंत जागावाटपाचा फॉर्म्युला तयार झाल्याचे पाहायला मिळत आहे.
यंदाच्या विधानसभा निवडणुकीत महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशीच थेट टक्कर पाहायला मिळणार असली तर परिवर्तन महाशक्ती तिसरी आघाडी या निवडणुकीत आपले नशीब आजमावताना पाहायला मिळणार आहे. तर, वंचित बहुजन आघाडी आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना अद्याप तरी स्वबळावर निवडणुका लढवताना दिसत आहेत. तसेच अन्य छोटे पक्ष आणि अपक्ष उमेदवार मोठ्या प्रमाणात निवडणूक रिंगणात उतरू शकतात, असा कयास बांधला जात आहे.
महायुतीचे आतापर्यंत एकूण किती उमेदवार जाहीर?
महायुतीने आत्तापर्यंत १८२ उमेदवारांची यादी जाहीर केली. त्यात भाजपाने ९९, शिवसेना शिंदे गटाने ४५ आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस गटाने ३८ उमेदवारांची नावे जाहीर केली आहे. तसेच भाजपाची दुसरी यादी तयार असून, लवकरच उमेदवारांची नावे घोषित केली जातील. यासंदर्भात दिल्लीत खलबते सुरू असल्याची माहिती सूत्रांकडून दिली जात आहे. २८८ जागा असलेल्या विधानसभेसाठी महायुतीकडून अद्याप १०६ उमेदवारांच्या नावांची घोषणा होणे बाकी आहे.
दरम्यान, महायुतीतील भाजपा, शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने बहुतांश दिग्गजांनाच पुन्हा संधी दिली आहे. यामध्ये विद्यमान आमदार, मंत्री यांच्या नावाचा समावेश असल्याचे पाहायला मिळत आहे. आता पुढील उमेदवारांची नावे जाहीर करताना तीनही पक्षांकडून धक्कातंत्राचा वापर करण्यात येतो की, इच्छुकांनाच्याच गळ्यात उमेदवारीची माळ पडू शकते, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागलेले आहे. तसेच महायुतीतील तीनही पक्षांनी आपापल्या उमेदावारांच्या नावाची घोषणा केली असली, कोण किती जागांवर लढणार, कोणते मतदारसंघ कोणाच्या वाट्याला येणार, याचा अद्याप तरी फॉर्म्युला समोर आलेला नाही, असे सांगितले जात आहे.