भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 16, 2024 05:36 PM2024-11-16T17:36:43+5:302024-11-16T17:38:30+5:30

Maharashtra Assembly Election 2024 : "जग एवढे पुढे गेले, पण भारतीय जनता पक्षवाले अजून 'बटेंगे तो कटेंगे'मध्येच अडकलेले आहेत."

maharashtra assembly election 2024 How many seats will BJP get Jayant Patal told the figure | भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!

भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!

राज्यात विधानसभा निवडणुकीचा रणसंग्राम सुरू आहे. प्रचारादरम्यान सर्वच राजकीय पक्षांचे नेते एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत टोलेबाजी करताना दिसत आहेत. यातच आता, "जग एवढे पुढे गेले, पण भारतीय जनता पक्षवाले अजून 'बटेंगे तो कटेंगे'मध्येच अडकलेले आहेत. दुनिया खूप पुढे गेली आहे," असा टोला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे नेते जयंत पाटलील यांनी भाजपला  लगावला आहे. एवढेच नाही तर, "...याचा अर्थ क्लिअर आहे. भारतीय जनता पक्षाच्या ५० पेक्षा जास्त जागा महाराष्ट्रात निवडून येणार नाहीत," अशी भविष्यवाणीही त्यांनी यावेळी केली. ते बीडमध्ये प्रचारसभेत बोलत होते.

काय म्हणाले जयंत पाटील? -
पाटील म्हणाले, "काळ बदललेला आहे. जातीवर आणि धर्मावर हे निवडणूक नेत आहेत. "बटेंगे तो कटेंगे" म्हणणाऱ्यांना मी एवढेच सांगतो की, ही अठराव्या-एकोणिसाव्या शतकातली भाषा आहे. आपण आता २१ व्या शतकात आलोय. २१ व्या शतकात लोकं फार पुढे गेली आहेत. ते इलॉन मस्क नावाचा एक माणूस आहे, जगातल्या सगळ्या नव्या नव्या संशोधन करून प्रयोग करण्याचा त्याचा हातखंडा आहे. तो आता काय विचार करतोय माहिती आहे का? तो विचार करतोय की, मंगळावर इंटरनेट कसं चालू करता येईल? याचा विचार पृथ्वीवर, इलॉन मस्क करतोय आणि त्यासाठी आता प्रयोग करण्याचं काम त्यांनी सुरू केलेले आहे. जग एवढं पुढे गेलं, पण भारतीय जनता पक्ष वाले अजून 'बटेंगे तो कटेंगे' मध्ये अडकलेले आहेत. दुनिया खूप पुढे गेली आहे." 

जयंत पाटील पुढे म्हणाले, "अमित शहा आणि ते योगी आदित्यनाथ इथे येऊन असल्या घोषणा करतात. त्या योगींना माहीत नाही की, यांचा निम्मा उत्तर प्रदेश मुंबई आणि पुण्यात नोकरीला आलाय यांचा आणि आम्हाला येऊन शिकवताय की "बटेंगे तो कटेंगे". याचा अर्थ क्लिअर आहे. भारतीय जनता पक्षाच्या ५० पेक्षा जास्त जागा महाराष्ट्रात निवडून येणार नाहीत," असा टोला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे नेते जयंत पाटलील यांनी भाजपला लगावला आहे."

इंदिरा गांधी असत्या, तर... -
बांगलादेशात सत्ता परिवर्तनानंतर हिंदूंवर झालेल्या अत्याचारांचा आणि मंदिरांवरील हल्ल्याचा उल्लेख करत जयंत पाटील म्हणाले, "अरे, तुमचा नेता विश्वगुरु झालाय ना? शेजारच्या बांगलादेसला दम देऊन हिंदूंवरचे अत्याचार थांबवता आले नाहीत? इंदिरा गांधी असत्या, तर त्या बांगलादेशवर हल्ला केला असता आणि तिथल्या हिंदूंचे संरक्षण केले असतं."

"निवडणूक जवळ आली की धर्मावर निवडणूक न्यावी, असे कधी वाटते भाजपला? ज्यावेळी लक्षात येते की, जमणे जरा अवघड आहे, इलेक्शन जरा अवघड झाले आहे, हे आता त्यांच्या लक्षात आले आहे, असा टोलाही जयंत पाटील यांनी यावेळी लगावला. 

Web Title: maharashtra assembly election 2024 How many seats will BJP get Jayant Patal told the figure

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.