सत्तेत आल्यास मुलांनाही मोफत शिक्षण, उद्धव ठाकरे यांचे आश्वासन, कोल्हापुरातून प्रचाराचा फोडला नारळ
By ऑनलाइन लोकमत | Published: November 6, 2024 07:32 AM2024-11-06T07:32:46+5:302024-11-06T07:33:04+5:30
Maharashtra Assembly Election 2024: मुलींना मोफत शिक्षण दिले जात असले तरी मुलांनी काय घोडे मारले आहे. त्यांनाही अशा शिक्षणाची नितांत गरज असून महाविकास आघाडी सत्तेत आल्यास मुलांना सर्व शिक्षण मोफत देणार असल्याची घोषणा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी आदमापूर (जि. कोल्हापूर) येथे केली.
कोल्हापूर : मुलींना मोफत शिक्षण दिले जात असले तरी मुलांनी काय घोडे मारले आहे. त्यांनाही अशा शिक्षणाची नितांत गरज असून महाविकास आघाडी सत्तेत आल्यास मुलांना सर्व शिक्षण मोफत देणार असल्याची घोषणा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी आदमापूर (जि. कोल्हापूर) येथे केली. राधानगरी - भुदरगडचे उमेदवार के. पी. पाटील यांच्या प्रचारसभेत ठाकरे यांनी प्रचाराचा नारळ फोडला.
तुटू व लुटू देणार नाही
■ राज्यातील सगळे उद्योग गुजरातला नेले जात असून मुंबईसह महाराष्ट्र त्यांना लुटून न्यायचा आहे. मात्र, हे राज्य स्वाभिमानी असून ते कधीही तुटू आणि लुटू देणार नाही.
■ मी मुख्यमंत्री असताना त्यांना महाराष्ट्राकडे वाकड्या नजरेने पाहू दिले नाही, असेही ठाकरे म्हणाले. खासदार शाहू छत्रपती, विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
ठाकरेंनी केल्या पाच महत्त्वाच्या घोषणा
■ महागाईमुळे जनता त्रस्त असून डाळी, खाद्यतेल यांसह पाच जीवनावश्यक वस्तूंचे भाव स्थिर ठेवणार.
■ महिला पोलिसांची भरती, स्वतंत्र पोलीस ठाणी उभारणार
■ मुंबईतील अदानीचा प्रकल्प रद्द करुन धारावीकरांना उद्योग- धंद्यासह घरे देऊ, शेतीमालाला हमीभाव देऊ.
■ प्रत्येक जिल्ह्यात, तसेच सुरतमध्येही छत्रपती शिवाजी महाराज यांचे मंदिर उभारणार.