राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्लांची तातडीनं बदली; निवडणूक आयोगाचे आदेश
By ऑनलाइन लोकमत | Published: November 4, 2024 12:19 PM2024-11-04T12:19:45+5:302024-11-04T12:21:57+5:30
विरोधकांच्या फोन टॅपिंगमुळे चर्चेत असणार्या राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांची तातडीने बदली करण्याचे आदेश निवडणूक आयोगाने दिले आहेत.
मुंबई- विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत निवडणूक आयोगाने मोठा निर्णय घेतला आहे. राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांची तातडीने बदली करण्याचे आदेश आयोगाने दिले आहेत. रश्मी शुक्ला यांच्याविरोधात काँग्रेससह विरोधकांनी आयोगाकडे तक्रारी केल्या होत्या. त्यानंतर आज यावर निर्णय घेत निवडणूक आयोगाने शुक्ला यांची बदली करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याशिवाय ३ वरिष्ठ अधिकाऱ्यांची नावे उद्यापर्यंत पाठवा अशा सूचना राज्याचे मुख्य सचिव यांना आयोगाने दिले आहेत.
रश्मी शुक्ला यांची कारकिर्द वादात होती. फोन टॅपिंगमुळे विरोधकांनी रश्मी शुक्ला यांच्यावर आरोप केले होते. मुदत संपूनही रश्मी शुक्ला यांना २ वर्षाची मुदतवाढ देण्यात आली होती. रश्मी शुक्ला यांना पदावरून हटवावं अशी मागणी सातत्याने विरोधकांकडून केली जात होती. याबाबत विरोधकांनी केंद्रीय निवडणूक अधिकाऱ्यांचीही भेट घेतली होती. रश्मी शुक्ला यांच्या कार्यकाळात निष्पक्षपणे निवडणूक पार पडणार नाहीत असा आरोप विरोधकांनी केला होता. त्यानंतर आज निवडणूक आयोगाने हा निर्णय घेतला आहे.
Acting on the complaints from INC and other parties, Election Commission of India orders transfer of Rashmi Shukla, DGP Maharashtra with immediate effect with directions to Chief Secretary to hand over her charge to the next senior most IPS officer in the cadre. The Chief… pic.twitter.com/DqocropZo0
— ANI (@ANI) November 4, 2024
नाना पटोले काय म्हणाले?
रश्मी शुक्ला यांना पदावरून हटवले असले तरी निवडणूक प्रक्रियेत त्या सहभागी होणार नाहीत याची काळजी निवडणूक आयोगाने घेतली पाहिजे. निवडणूक आयोगाने जो निर्णय घेतला त्याचे स्वागत आहे. राज्याच्या पोलीस महासंचालकपदावर बसून भाजपाला पाठिंबा देणाऱ्या या अधिकारी होत्या. विरोधकांचे फोन टॅपिंग केले जात होते. निवडणुकीत फायदा व्हावा यासाठी सत्ताधाऱ्यांनी त्यांना या पदावर बसवलं होते. निवडणूक आयोगाकडे आम्ही याबाबत तक्रार केली होती. झारखंड, पश्चिम बंगाल याठिकाणी महासंचालक बदलले मात्र इतका वेळ निवडणूक आयोगाला निर्णय घ्यायला का लागला हा प्रश्न आहे अशी प्रतिक्रिया काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिली.
संजय राऊतांनीही केले होते आरोप
केंद्रीय गृहमंत्री राज्यांमध्ये फिरून आपण कसे जिंकणार, याची तयारी करत आहेत. राज्याच्या पोलीस महासंचालिका रश्मी शुक्ला यांची तातडीने बदली करावी. राज्यात ज्या पद्धतीने गुंडशाही सुरू आहे त्यावर तातडीने कारवाई करण्याचे आदेश देण्यात यावे, अशी मागणी संजय राऊत यांनी देशाच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना केली होती. सध्या घडीला पोलीस यंत्रणा राजकीय कामाला झोपली आहे एका पक्षाच्या कामाला जंपली आहे. त्यामुळे निवडणुका स्वच्छ वातावरणात होणार नाही. हा आमचा अंदाज होता तो आता खरा होताना दिसत आहे असं संजय राऊतांनी केला होता.