घनसावंगी विधानसभा मतदारसंघात राजेश टोपेंविरुद्ध हिकमत उढाण पुन्हा आखाड्यात !
By विजय मुंडे | Published: November 8, 2024 09:01 AM2024-11-08T09:01:37+5:302024-11-08T09:02:21+5:30
Maharashtra Assembly Election 2024: पाच वेळा आमदार, माजी आरोग्यमंत्री म्हणून काम केलेले राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार राजेश टोपे यांच्याविरुद्ध शिवसेना शिंदे गटाकडून पुन्हा एकदा हिकमत उढाण यांना मैदानात उतरविले आहे.
- विजय मुंडे
जालना - जालना जिल्ह्यातील पाच पैकी घनसावंगी विधानसभा मतदारसंघातील लढत यंदा चांगलीच चुरशीची होत आहे. पाच वेळा आमदार, माजी आरोग्यमंत्री म्हणून काम केलेले राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार राजेश टोपे यांच्याविरुद्ध शिवसेना शिंदे गटाकडून पुन्हा एकदा हिकमत उढाण यांना मैदानात उतरविले आहे.
राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते माजी मंत्री आ. राजेश टोपे यांनी घनसावंगी विधानसभा मतदारसंघातून सलग पाचवेळा विजय मिळविला असून, यंदा ते षटकार मारण्याच्या इराद्याने मैदानात उतरले आहेत. शिवसेना शिंदे गटाने जागा वाटपात अखेरपर्यंत जोर लावत ही जागा आपल्याकडे खेचली असून, टोपे यांचे राजकीय विरोधक हिकमत उढाण यांना पुन्हा उमेदवारी देण्यात आली आहे. या मतदारसंघात टोपे विरूद्ध उढाण अशी लढत आहे. परंतु भाजपला सोडचिठ्ठी दिलेले सतीश घाटगे आणि उद्धव सेनेचे माजी आमदार शिवाजी चोथे यांनी बंडखोरी केली आहे. या बंडखोरांमुळे निवडणुकीतील चुरस वाढली आहे.
निवडणुकीतील कळीचे मुद्दे
- मराठा आरक्षण आंदोलनाचे केंद्र असलेले अंतरवाली सराटी हे गाव घनसावंगी मतदारसंघात येते. त्यामुळे मराठा व ओबीसी आरक्षणाचा मुद्दा हा कळीचा आहे.
- या मतदारसंघात पूर्वीपासूनच उसाचे गाळप आणि उसाचा दर हे मुद्दे राजकीय पटलावरील प्रमुख विषय राहिले आहेत. दोन्ही प्रमुख उमेदवारांसह घाटगे यांचाही कारखाना असून, ऊसही येथे कळीचा मुद्दा राहणार आहे.
- मतदारसंघातील रस्त्यांसह इतर मूलभूत सोयी-सुविधांचा प्रश्न कायम असून, विरोधकांकडून या मुद्द्यांना हात घालत प्रचार यंत्रणा राबविली जात आहे.
माजी मंत्री आ. राजेश टोपे गत २५ वर्षांच्या कार्यकाळात केलेल्या विकासकामांची, आरोग्यमंत्री म्हणून केलेल्या कामांची माहिती घेऊन मतदारसंघातील मतदारांसमोर जात आहेत.