दीड टक्के मते वाढवा, विधानसभा आपलीच; देवेंद्र फडणवीसांनी दिला विश्वास
By ऑनलाइन लोकमत | Published: June 15, 2024 07:23 AM2024-06-15T07:23:44+5:302024-06-15T07:24:58+5:30
Maharashtra Assembly Election 2024: लोकसभा निवडणुकीत अपयश आले, याचा अर्थ विधानसभा गेली, असा कोणीही काढू नका, लोकसभेतील आकडेवारीच सांगते की, केवळ दीड-दोन टक्के मते वाढविली की, आपला विजय नक्की आहे, त्यादृष्टीने कामाला लागा, असे आदेश उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.
मुंबई - लोकसभा निवडणुकीत अपयश आले, याचा अर्थ विधानसभा गेली, असा कोणीही काढू नका, लोकसभेतील आकडेवारीच सांगते की, केवळ दीड-दोन टक्के मते वाढविली की, आपला विजय नक्की आहे, त्यादृष्टीने कामाला लागा, असे आदेश उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी भाजपचे पदाधिकारी, आमदार, खासदार, पराभूत उमेदवार यांना दिले. तर, लोकसभेत पक्षविरोधी कारवाया करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल, असे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी जाहीर केले.
लोकसभेतील पराभवानंतर भाजपच्या चार बैठका शुक्रवारी येथे झाल्या. यावेळी फडणवीस म्हणाले, लोकसभेच्या ३१ जागा महाविकास आघाडीने जिंकल्या याचा अर्थ विधानसभेच्या १८६ जागांवर ते पुढे आहेत, असा अजिबात नाही. जवळपास ३० विधानसभा मतदारसंघांमध्ये आपण फक्त ३ ते ५ हजारांनी मागे आहोत. हार पचविण्याची सवय तुटल्याने नैराश्य आले, पण ते झटकून कामाला लागा.या बैठकीस विनोद तावडे, शिवप्रकाश, राज्यातील मंत्री, नेते उपस्थित होते.
उपमुख्यमंत्रिपद सोडण्याचे संकेत
सरकारच्या बाहेर राहूनच पक्षकार्य करता येते, असे म्हणत फडणवीस यांनी यावेळी उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा देण्याचा विचार मागे घेतलेला नसल्याचे स्पष्ट केले.
आपला लढा फेक नरेटिव्हविरोधात
लोकसभा निवडणुकीत आपल्याबाबत बुद्धिभेद (फेक नरेटिव्ह) करण्यात आला, त्याचा फटका आपल्याला बसला. आता प्रत्येक कार्यकर्त्याला भाजपविरोधातील नरेटिव्ह आला रे आला की, त्याचे जोरदार प्रत्युत्तर देण्याची मुभा आहे, असे फडणवीस यांनी जाहीर केले. प्रत्युत्तर देताना ते अंगलट येणार नाही एवढीच काळजी घ्या, असा सल्लाही देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी दिला.