बंडखोरांमुळे महायुती आणि मविआलाही जबर धक्के; यंदा वाढणार रंगत
By ऑनलाइन लोकमत | Published: November 5, 2024 07:21 AM2024-11-05T07:21:45+5:302024-11-05T07:22:18+5:30
Maharashtra Assembly Election 2024: विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी सोमवारी अनेक बंडखोरांनी रिंगणात कायम राहण्याची भूमिका घेतल्याने महायुती आणि महाविकास आघाडी या दोन्हींची डोकेदुखी वाढली आहे.
मुंबई - विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी सोमवारी अनेक बंडखोरांनी रिंगणात कायम राहण्याची भूमिका घेतल्याने महायुती आणि महाविकास आघाडी या दोन्हींची डोकेदुखी वाढली आहे. राज्यभरातील जवळपास प्रत्येक जिल्ह्यात बंडखोर उमेदवार रिंगणात असून सर्वच पक्षांना याचा फटका बसण्याची शक्यता आहे.
ज्या पक्षाकडे जागा गेली, त्या पक्षात बंडखोरी झाल्याचे तसेच मित्रपक्षांच्या जागांवरही दोन्हींकडे बंडखोरी झाल्याचे चित्र सर्वदूर दिसत आहे. दुपारी तीनपर्यंत अर्ज मागे घ्यावेत यासाठी दोन्ही बाजूंकडील वरिष्ठ नेत्यांनी प्रयत्नांची शिकस्त केली. काही ठिकाणी यश आले; पण अनेक ठिकाणी बंडखोरांनी नेतृत्वाचे न ऐकता आव्हान कायम ठेवले आहे. त्यामुळे बंडखोर असलेल्या मतदारसंघांमध्ये त्रिकोणी वा बहुरंगी लढतींचे चित्र आहे.
४,१४० उमेदवार रिंगणात
राज्यातील विधानसभा निवडणुकसाठी २८८ मतदारसंघात ७ हजार ७८ उमेदवारांचे नामनिर्देशन पत्र वैध ठरले होते. त्यातील सोमवारी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अंतिम मुदतीपर्यंत २,९३८ उमेदवारांनी माघार घेतल्याने आता राज्यात ४ हजार १४० उमेदवार अंतिमत: निवडणूक रिंगणात आहेत, अशी माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने दिली आहे. राज्यात २० नोव्हेंबर रोजी मतदान होणार असून २३ नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार आहे.
माहीमसाठी ड्रामा : राज ठाकरेंनी भेट नाकारली, सरवणकर यांचा मैदानात कायम राहण्याचा निर्णय
मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचे पुत्र अमित ठाकरे यांच्याविरुद्ध शिंदेसेनेचे सदा सरवणकर यांनी माघार घेतली नाही. त्यामुळे मुंबईतील माहीम मतदारसंघात सरवणकर, ठाकरे आणि उद्धवसेनेचे महेश सावंत अशी लढत आहे. अमित ठाकरेंना पाठिंबा द्यावा, अशी भूमिका भाजपने घेतली होती. मात्र, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तशी भूमिका घेतली नाही. सरवणकर यांनी शिंदेंशी चर्चा करून उमेदवारी कायम ठेवण्याचा निर्णय घेतला. राज ठाकरेंनी आपल्याशी भेटायला नकार दिला, असा आरोप सरवणकर यांनी केला.
श्रीगोंदामध्ये भाजपतर्फे आईऐवजी मुलगा रिंगणात
श्रीगोंदा मतदारसंघात भाजपच्या प्रतिभा बबनराव पाचपुते यांना भाजपने उमेदवारी दिली होती पण त्यांनी माघार घेतली. त्याचवेळी त्यांचे पुत्र विक्रम यांनीही पर्यायी उमेदवार म्हणून भाजपकडूनच अर्ज भरला होता. त्यामुळे विक्रम हे तिथे भाजपचे उमेदवार असतील.
डॉ. जिचकारांच्या मुलाची बंडखोरी कायम
काटोलमध्ये (जि. नागपूर) काँग्रेस नेते दिवंगत डॉ. श्रीकांत जिचकार यांचे पुत्र युवक काँग्रेसचे याज्ञवल्क्य यांनी अपक्ष उमेदवारी कायम ठेवली. डॉ. जिचकार यांच्या पत्नी राजश्री यांनी माघार घेतली. येथे माजी गृहमंत्री अनिल देशमुख हे शरद पवार गटाचे उमेदवार आहेत. यवतमाळ जिल्ह्याच्या उमरखेडमध्ये काँग्रेसचे माजी आमदार विजयराव खडसे, भाजपचे माजी आमदार राजेंद्र नजरधने यांनी बंड कायम ठेवले.