"लोकांना सरकारबद्दल आपुलकी आहे म्हणूनच..."; मतदानाची टक्केवारी वाढल्यावर फडणवीसांचे विधान
By ऑनलाइन लोकमत | Published: November 21, 2024 02:00 PM2024-11-21T14:00:43+5:302024-11-21T14:10:38+5:30
लाडकी बहीण योजनेमुळे महिलांची मतदानाची टक्केवारी वाढल्याची शक्यताही देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली आहे.
Maharashtra Assembly Election 2024 : महाराष्ट्र विधानसभेच्या २८८ जागांच्या निवडणुकीसाठी बुधवारी मतदान पार पडलं. विधानसभा निवडणुकीत राज्यात सरासरी ६५ टक्क्यांपेक्षा अधिक मतदान झालं आहे. लोकसभेपेक्षा यंदा मतदानाची टक्केवारी वाढली आहे. अखेरच्या काही तासांत मतदान मतदानाची आकडेवारी वाढल्याचे दिसून आलं. या वाढलेल्या मतदानाच्या टक्केवारीवरुन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महत्त्वाचे विधान केलं आहे. लोकांना सरकारच्या बद्दल थोडी आपुलकी वाटल्याने मतदान वाढल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.
रात्री उशिरा आलेल्या आकडेवारीनुसार राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी एकूण ६५.११ टक्के मतदान झालं आहे. गेल्या ३० वर्षांमध्ये पहिल्यांदाच राज्यात इतक्या मोठ्या प्रमाणात मतदान झाल्याचं पाहायला मिळालं. त्यामुळे याचा परिणाम निकालावर देखील होणार आहे. या वाढलेल्या मतदानाचा महायुतीला फायदा होणार असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. तसेच लाडकी बहीण योजनेमुळे महिलांची मतदानाची टक्केवारी वाढल्याची शक्यताही देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली आहे.
"महाराष्ट्रामध्ये मतदान वाढलेला आहे महाराष्ट्र मध्ये मतदान वाढलेले आहे मतदानाची टक्केवारी वाढली आहे. आजपर्यंतचा अनुभव असा आहे की जेव्हा जेव्हा मतदानाची टक्केवारी वाढते त्याचा भाजप आणि मित्र पक्षांना फायदा होतो. त्यामुळे आम्हाला आशा आहे की वाढलेल्या मतदानाचा आम्हाला निश्चितपणे फायदा मिळेल आणि महाराष्ट्रात आमचे सरकार तयार होईल अशी मला अपेक्षा आहे. मी २५ ते ३० मतदारसंघाच्या बुथवर फोनवरून संवाद साधला तेव्हा त्यांनी सांगितले की महिलांची टक्केवारी वाढली आहे. आम्ही अजून कोणासोबत संपर्क साधलेला नाही तसेच एक्झिट पोलवर प्रवक्ते बोलतात प्रमुख नेते बोलत नाहीत," असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं.
"लाडकी बहीण योजनेमुळे महिलांची मतदानाची टक्केवारी वाढली ही शक्यता नाकारता येत नाही. २३ तारखेला निकाल लागल्यानंतर आम्ही तिन्ही पक्ष एकत्र बसू आणि चांगला निर्णय करू. मतदानाची टक्केवारी ज्या प्रकारे वाढली आहे त्यानुसार थोडासा मला प्रो इन्कम्बन्सी फॅक्टर दिसतो. लोकांना सरकारच्या बद्दल थोडी आपुलकी वाटणं हा त्याचा अर्थ होतो, असंही देवेंद्र फडणवीस म्हणाले.