बारामतीमध्ये कुणाचा विजय होणार? जयंत पाटील म्हणाले, "निर्णय कसा लागेल सांगणे अवघड"
By ऑनलाइन लोकमत | Published: November 6, 2024 07:04 PM2024-11-06T19:04:05+5:302024-11-06T19:17:00+5:30
बारामती विधानसभा निवडणुकीच्या निकालाबाबत जयंत पाटील यांनी महत्त्वाचे विधान केलं आहे.
Baramati Assembly Election : लोकसभा निवडणुकीनंतर बारामती विधानसभा निवडणुकीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागलं आहे. बारामती मतदारसंघात यंदा राज्यातील सर्वाधिक लक्षवेधी लढत होणार आहे. बारामतीमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याविरोधात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून युगेंद्र पवार हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा काका विरुद्ध पुतण्या अशी लढत पाहायला मिळणार आहे. युगेंद्र पवार यांच्या विजयासाठी शरद पवार यांनी स्वत: ताकद लावल्याने बारामतीचं राजकारण चांगलंच तापलं आहे. बारामतीकर आपल्या बाजूने निकाल देतील अशी खात्री अजित पवारांना आहे. तर दुसरीकडे आता शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी बारामतीच्या निकालाबाबत मोठं विधान केलं आहे.
लोकसभा निवडणुकीत बारामतीमध्ये अजित पवारांना मोठा धक्का बसला होता. खुद्द अजित पवार यांच्या विधानसभा मतदारसंघातच सुनेत्रा पवार लोकसभेला पिछाडीवर राहिल्या होत्या. त्यामुळे यावेळी बारामतीची निवडणूक अजित पवारांसाठी प्रतिष्ठेची बनली आहे. अशातच अजित पवारांसमोर युगेंद्र पवार यांचे तगडे आव्हान असणार आहे. १९९१ पासून एकतर्फी अजित पवारांचे वर्चस्व असलेल्या मतदारसंघातील मतदार यावेळी काय निकाल देणार याची सर्वत्र चर्चा सुरु झाली आहे. मुंबई तकला दिलेल्या मुलाखतीमध्ये जयंत पाटील यांनी बारामतीच्या निकालाबाबत तसेच युगेंद्र पवारांबाबत महत्त्वाचे विधान केलं आहे.
"बारामतीमध्ये युगेंद्र पवार निवडून येण्याची शक्यता ५० टक्क्यांच्या वर आहे. सुप्रिया सुळेंच्या वेळी आम्ही चाचपणी करत होतो तेव्हा सगळ्यात कमी लीड बारामती मतदारसंघात मिळेल असं वाटत होतं. आमच्या वेगवेगळ्या सर्वेक्षणातही असं दिसत होतं की बारामतीमध्ये सुप्रिया सुळेंना सर्वात कमी लीड मिळेल. मत मोजल्यानंतर लक्षात आलं की सर्वात जास्त लीड बारामतीमध्ये मिळाला. त्यामुळे बारामतीमधील लोक मनातील गोष्टी समोर सांगत नाहीत. त्याच्या मनात जे आहे ते मतपेटीत जाऊन टाकतात. हा फार मोठा अनुभव लोकसभा निवडणुकीतून आलेला आहे. त्यामुळे लोकांना बारामतीमध्ये मोकळेपणा बोलता येत नाहीये असं दिसत आहे. पण लोकसभेच्या निकालानंतर अधिक प्रतिसाद मिळायला लागला आहे. युगेंद्र पवार जिथे जात आहेत तिथे त्यांचे स्वागतही व्यवस्थित होत आहे. त्यामुळे लोकांना हे हवं असेल कदाचित. पण लोक हे उघडपणे बोलत नाहीत. त्यामुळे बारामतीमध्ये निर्णय कसा लागेल हे सांगणे मुश्किल आहे. पण युगेंद्र पवारांना लोकांची साथ जास्त आहे असं दिसतं," असं जयंत पाटील यांनी म्हटलं आहे.
यावेळी जयंत पाटील यांना ८७ पैकी शरद पवार गटाच्या किती जागा येतील असा सवाल विचारण्यात आला होता. "लोकसभा निवडणुकीत १० जागांवर उमेदवार दिले तेव्हा मला आधी वाटायचं की चार ते पाच येतील. मी गमतीने सांगायचे की सगळे होते तेव्हा चार होते आणि आता चाराचे पाच झाले तरी मी खूष आहे. महाराष्ट्रात फिरायला लागलो तेव्हा वाटायला लागलं सात येतील. पण आमचे आठ उमेदवार निवडून आले. तसं आता महाराष्ट्रात फिरून आल्यावर सांगता येईल की महाराष्ट्रात विधानसभेला आमचे किती उमेदवार निवडून येतील," असं जयंत पाटील म्हणाले.