किशोर जोरगेवार यांचा अखेर भाजपामध्ये प्रवेश, विरोध करणाऱ्या सुधीर मुनगंटीवार यांनीच केलं स्वागत
By ऑनलाइन लोकमत | Published: October 27, 2024 01:24 PM2024-10-27T13:24:26+5:302024-10-27T13:26:04+5:30
Maharashtra Assembly Election 2024: जोरगेवार यांना पक्षात प्रवेश देऊन उमेदवारी देण्यास सुधीर मुनंगटीवार यांनी तीव्र विरोध केला होता. मात्र दिल्लीतील पक्षश्रेष्ठींनी किशोर जोरगेवार (Kishore Jorgewar) यांच्या पक्षप्रवेशास मान्यता दिल्याने सुधीर मुनगंटीवार यांचा विरोध मावळला. तसेच आज सकाळी सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांच्या उपस्थितीतच जोरगेवार यांनी भाजपामध्ये प्रवेश केला.
चंद्रपूर विधानसभा मतदारसंघातील अपक्ष आमदार किशोर जोरगेवार यांचा हो नाही करत अखेर भाजपामध्ये प्रवेश झाला आहे. २०१९ साली अपक्ष म्हणून निडणून आलेल्या किशोर जोरगेवार यांनी २०२२ मध्ये झालेल्या सत्तांतरानंतर किशोर जोरगेवार यांनी महायुतीला पाठिंबा दिला होता. दरम्यान, विधानसभा निवडणुकीसाठी जोरगेवार यांना पक्षात प्रवेश देऊन उमेदवारी देण्यास सुधीर मुनंगटीवार यांनी तीव्र विरोध केला होता. मात्र दिल्लीतील पक्षश्रेष्ठींनी किशोर जोरगेवार यांच्या पक्षप्रवेशास मान्यता दिल्याने सुधीर मुनगंटीवार यांचा विरोध मावळला. तसेच आज सकाळी सुधीर मुनगंटीवार यांच्या उपस्थितीतच जोरगेवार यांनी भाजपामध्ये प्रवेश केला. किशोर जोरगेवार यांना चंद्रपूर विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर होण्याची शक्यता आहे.
अपक्ष आमदार म्हणून महायुतीसोबत असलेल्या किशोर जोरगेवार यांना भाजपामध्ये घेण्यास सुधीर मुनगंटीवार यांनी तीव्र विरोध केला होता. त्यानंतर किशोर जोरगेवार शरद पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश करणार होते, परंतु त्याला स्थानिक काँग्रेस खासदार प्रतिभा धानोरकर यांनी विरोध केला. त्यानंतर जोरगेवारांचा राष्ट्रवादीतील पक्षप्रवेश खोळंबला होता. त्यानंतर ते भाजपामध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चा पुन्हा सुरू झाल्या होत्या. मात्र जोरगेवार यांचा पक्षप्रवेस रोखण्यासाठी सुधीर मुनगंटीवार यांनी स्थानिक पातळीपासून दिल्लीपर्यंत मोर्चेबांधणी केली होती. त्यामुळे किशोर जोरगेवार हे पुन्हा अपक्ष निवडणुकीच्या रिंगणात उतरणार होते. मात्र अखेरीत पक्षश्रेंष्ठींनी जोरगेवार यांच्या पक्षप्रवेशास हिरवा कंदील दाखवला. किशोर जोरगेवार यांच्या पक्षप्रवेशामागे माजी खासदार हंसराज अहिर यांचे पाठबळ लाभले त्यामुळे जोरगेवारांचा भाजपा पक्षप्रवेश निश्चित झाला, असे सांगण्यात येत आहे,
दरम्य्यान, २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत किशोर जोरगेवार यांनी अपक्ष निवडणूक लढवताना भाजपा आणि काँग्रेसच्या मातब्बर उमेदवारांचा पराभव केला होता. त्या निवडणुकीत किशोर जोरगेवार यांनी भाजपाचे तत्कालीन विद्यमान आमदार नानाजी शामकुळे यांचा तब्बल ७२ हजार ६६१ मतांनी पराभव केला होता.