हे बघा, देवेंद्र फडणवीस यांच्या बॅगही तपासल्यात; भाजपचा उद्धवना टोला, व्हिडिओच दाखवला
By ऑनलाइन लोकमत | Published: November 13, 2024 10:35 AM2024-11-13T10:35:47+5:302024-11-13T10:49:20+5:30
Maharashtra Assembly Election 2024: प्रचारसभेसाठी जात असताना बॅगांची तपासणी करण्यात आल्याने उद्धव ठाकरे हे केंद्रीय निवडणूक आयोगासह भाजपा आणि भाजपाच्या नेत्यांविरोधात कमालीचे आक्रमक झाले आहेत. त्यावरून आता भाजपाने उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार पलटवार केला आहे.
विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान, शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या बॅगांची निवडणूक आयोगाच्या कर्मचाऱ्यांकडून तपासणी करण्यात आल्याचं प्रकरण सध्या चांगलंच तापलेलं आहे. या प्रकारावरून उद्धव ठाकरे हे केंद्रीय निवडणूक आयोगासह भाजपा आणि भाजपाच्या नेत्यांविरोधात कमालीचे आक्रमक झाले आहेत. त्यावरून आता भाजपाने उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार पलटवार केला आहे. तसेच निवडणुकीच्या काळात अशा प्रकारची तपासणी होणं ही सामान्य बाब असल्याचे सांगत भाजपाने देवेंद्र फडणवीस यांच्याकडील बॅगेचीही तपासणी झाली असल्याचा व्हिडीओ समोर आणला आहे.
भाजपा महाराष्ट्रकडून यासंदर्भातील एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे. त्या व्हिडीओमध्ये देवेंद्र फडणवीस यांच्याकडील बॅगांची निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांकडून तपासणी झाल्याचंही दिसत आहे. यावरून उद्धव ठाकरे यांना टोला लगावताना भाजपाने म्हटलंय की, ‘’जाऊ द्या, काही नेत्यांना तमाशा करण्याची सवयच असते! हा व्हिडीओ पाहा, ७ नोव्हेंबरला यवतमाळ जिल्ह्यात आमचे नेते देवेंद्र फडणवीस यांच्या बॅगची तपासणी झाली. पण, त्यांनी ना कोणता व्हिडीओ काढला, ना कोणती आगपाखड केली. तत्पूर्वी, ५ नोव्हेंबर रोजी कोल्हापूर विमानतळावरसुद्धा देवेंद्र फडणवीस यांच्या बॅग्जची तपासणी झाली होती, असं सांगत महाराष्ट्र भाजपाकडून त्या तपासणीचा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे.
जाऊ द्या, काही नेत्यांना तमाशा करण्याची सवयच असते!
— भाजपा महाराष्ट्र (@BJP4Maharashtra) November 13, 2024
हा व्हीडिओ पहा, 7 नोव्हेंबरला यवतमाळ जिल्ह्यात आमचे नेते मा. देवेंद्रजी फडणवीस यांच्या बॅगची तपासणी झाली. पण, त्यांनी ना कोणता व्हीडिओ काढला, ना कोणती आगपाखड केली. तत्पूर्वी, 5 नोव्हेंबर रोजी कोल्हापूर विमानतळावर सुद्धा मा.… pic.twitter.com/ebkuigJE2E
दिखाव्यासाठी केवळ संविधान हाती घेऊन चालत नाही, तर संवैधानिक व्यवस्थाही पाळाव्या लागतात. संविधानाचे भान प्रत्येकाला असलेच पाहिजे, एवढीच आमची विनंती आहे, असा टोलाही भाजपाने या पोस्टमधून लगावला आहे.