शिवसेनेला भाजपापासून वेगळं करण्यासाठी 'ते' विधान, मग...; शरद पवारांचा गौप्यस्फोट
By ऑनलाइन लोकमत | Published: November 16, 2024 01:06 PM2024-11-16T13:06:04+5:302024-11-16T13:07:44+5:30
षडयंत्र करून त्यांनी उद्धव ठाकरेंना भाजपापासून दूर केले हे आता स्वत: शरद पवार कबुल करत आहेत असा टोला फडणवीसांनी लगावला.
मुंबई - भाजपाला पाठिंबा देण्याचा काही प्रश्नच नव्हता. आम्हाला शिवसेनेला भाजपापासून वेगळं करायचं होतं म्हणून राजकीय चाचपणी केली असा गौप्यस्फोट शरद पवारांनी केला आहे. २०१४ साली भाजपाला पाठिंबा देण्यावरून एका मुलाखतीत शरद पवारांना प्रश्न विचारण्यात आला. त्यावेळी पवारांनी या प्रश्नावर खुलासा केला.
२०१४ साली भाजपाने न मागता तुमच्या पक्षाकडून पाठिंबा देण्यात आला होता, त्यामागे काय हेतू होता असा प्रश्न पत्रकाराने मुलाखतीत विचारला. त्यावेळी शरद पवार म्हणाले की, विनाकारण नाही, तर २०१४ साली भाजपाला आम्हाला पाठिंबा द्यायचा नव्हताच. आम्हाला केवळ शिवसेना आणि भाजपा यांची जी युती होती त्यांना वेगळे कसं करता येईल. करू शकतो का हे आम्हाला पाहायचे होते. त्यासाठी चाचपणी म्हणून आम्ही राजकीय विधान केले आम्ही त्यांना मदत कधी केली नाही. केवळ विधान केले होते मात्र त्या विधानानंतर जसं आम्हाला हवं होते तेच झाले. भाजपा गेले आणि शिवसेना आमच्यासोबत आली. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री बनले असं विधान पवारांनी केले. एबीपी न्यूजला दिलेल्या मुलाखतीत पवारांनी यावर भाष्य केले.
तर शरद पवार वारंवार रोज नवीन गोष्टी सांगत आहेत. षडयंत्र करून त्यांनी उद्धव ठाकरेंना भाजपापासून दूर केले हे आता स्वत: शरद पवार कबुल करत आहेत. २०१९ ला भाजपा-राष्ट्रवादीची बैठक झाली ते त्यांनी अमान्य केले होते. मी २०२० पासून या बैठकीबाबत सांगत आहे. मी स्पष्ट सांगितले, गौतम अदानी बैठकीत नव्हते, ही बैठक दिल्लीत झाली होती असा दावा देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.
२०१४ साली काय घडलं होतं?
२०१४ साली भाजपा-शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे सगळे प्रमुख पक्ष वेगवेगळे निवडणूक लढले होते. त्यात भाजपा सर्वात मोठा पक्ष बनला. त्यानंतर निकालाच्या दिवशीच शरद पवारांच्या सांगण्यावरून राष्ट्रवादी नेते प्रफुल पटेल यांनी माध्यमांना येऊन आम्ही भाजपाला सरकार बनवण्यासाठी बाहेरून पाठिंबा देऊ असं विधान केले. त्यानंतर विधानसभेत भाजपाने बहुमत सिद्ध केले. तेव्हा शिवसेना विरोधी बाकांवर बसली होती. विरोधी पक्षनेते म्हणून एकनाथ शिंदे काम करत होते. मात्र काही महिन्यातच विरोधी बाकांवरील शिवसेना भाजपासोबत सत्तेत आली. त्यानंतर २०१९ पर्यंत शिवसेना-भाजपाने सरकार चालवले. परंतु २०१९ च्या निवडणूक निकालानंतर मुख्यमंत्रिपदावरून शिवसेना भाजपात बिनसले आणि उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस राष्ट्रवादीसोबत हातमिळवणी केली. त्यानंतर शिवसेना-राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांची महाविकास आघाडी बनली आणि राज्यात उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले.