'प्रथम महाराष्ट्र, मग पक्ष, शेवटी स्वतः!' केवळ उक्ती नव्हे, कृतीतून सिद्ध करणारे देवेंद्र फडणवीस

By ऑनलाइन लोकमत | Published: November 15, 2024 11:11 AM2024-11-15T11:11:46+5:302024-11-15T11:12:12+5:30

Maharashtra Assembly Election 2024: महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सध्याच्या काळात स्वकर्तृत्वावर आपलं नेतृत्व प्रस्थापित करणारे जे काही मोजके नेते आहेत. त्यापैकी एक म्हणजे देवेंद्र फडणवीस. नागपूरचे सर्वात तरुण महापौर ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री अशी देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाची कमान ही सदैव चढतीच राहिली आहे. सक्रिय राजकारणातील सुमारे ३० वर्षांच्या कारकिर्दीमध्ये देवेंद्र फडणवीस यांनी अनेक चढउतार पाहिले आहेत. मात्र सुरुवातीपासूनच त्यांच्यामधील नेतृत्वगुणांबाबत असलेलं वलय कायम आहे.

Maharashtra Assembly Election 2024: 'Maharashtra first, then party, finally self!' Devendra Fadnavis who proves not just words but actions | 'प्रथम महाराष्ट्र, मग पक्ष, शेवटी स्वतः!' केवळ उक्ती नव्हे, कृतीतून सिद्ध करणारे देवेंद्र फडणवीस

'प्रथम महाराष्ट्र, मग पक्ष, शेवटी स्वतः!' केवळ उक्ती नव्हे, कृतीतून सिद्ध करणारे देवेंद्र फडणवीस

महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सध्याच्या काळात स्वकर्तृत्वावर आपलं नेतृत्व प्रस्थापित करणारे जे काही मोजके नेते आहेत. त्यापैकी एक म्हणजे देवेंद्र फडणवीस. नागपूरचे सर्वात तरुण महापौर ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री अशी देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाची कमान ही सदैव चढतीच राहिली आहे. सक्रिय राजकारणातील सुमारे ३० वर्षांच्या कारकिर्दीमध्ये देवेंद्र फडणवीस यांनी अनेक चढउतार पाहिले आहेत. मात्र सुरुवातीपासूनच त्यांच्यामधील नेतृत्वगुणांबाबत असलेलं वलय कायम आहे. आजच्या बदलेल्या राजकारणामध्ये पक्ष, विचारसरणी आदींबाबत नेत्यांमधील निष्ठा दुय्यम होत चालली असताना आपल्या विचारधारेशी ठाम आणि पक्षावर अढळ निष्ठा असणारे नेते म्हणून देवेंद्र फडणवीस यांचा उल्लेख अग्रक्रमाने करावा लागतो. त्याबरोबरच महाराष्ट्राच्या राजकारणाचा असलेला चौफेर अभ्यास, येथील सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक परिस्थिती यांची जाणीव, राज्यातील प्रत्येक भागात आपल्या नेतृत्वाच्या बळावर जमवलेला चाहता आणि समर्थक वर्ग या बाबी देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वगुणांना अधोरेखित करतात. तसेच सध्याच्या राजकारणातील त्यांच्या नेतृत्वाचं वेगळंपण सिद्ध करतात. 

महाराष्ट्राच्या राजकारणाची खडानखडा माहिती आणि येथील कानाकोपऱ्यातील परिस्थितीचा अभ्यास असलेला नेता म्हणून शरद पवार यांचा उल्लेख केला जातो.  माजी मुख्यमंत्री दिवंगत विलासराव देशमुख आणि भाजपाचे ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे यांनाही राज्याच्या राजकारणाचा चांगला अभ्यास होता. सद्यस्थितीत आजच्या पिढीतील राजकारण्यांमध्ये महाराष्ट्रातील विविध विषयांचा, सर्व समाजघटकांचा अभ्यास आणि सर्व विषयांची सखोल माहिती असलेले आजच्या पिढीतील नेते म्हणून देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाहिले जाते. तसेच फडणवीस यांनी ही बाब राज्याचं नेतृत्व करताना सभागृहातील अभ्यासपूर्ण भाषणांमधून दाखवून दिली आहे. एवढंच नाही तर राज्याचं नेतृत्व करताना देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील सर्व प्रदेश आणि रहिवाशांना लाभ होईल हा दृष्टिकोन ठेवून योजनांची आखणी केल्याचं दिसून येतं. 

महाराष्ट्रामध्ये जसा शेती आणि शेतकरी महत्त्वाचा आहे, तसेच येथील उद्योग जगत हे राज्याच्या अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने महत्त्वाचं आहे. देशाची आर्थिक राजधानी असलेली मुंबई ही महाराष्ट्रात असल्याने येथील नेतृत्वाला ग्रामीण अर्थव्यवस्थेबरोबरच उद्योगविश्वातील विषयांची जाणीव असणं आवश्यक असतं. देवेंद्र फडणवीस यांनी या दोन्ही बाबतीत उत्तम समन्वय दाखवून दिला आहे. एकीकडे शेतीमधील समस्या सोडवण्यासाठी नवनव्या योजना आणताना नमो कृषि सन्मान योजना, एक रुपयात पिकविमा, सोलर पंपाच्या वापरावर भर आदींच्या माध्यमातून शेतकऱ्यांना सशक्त करण्याची दूरदृष्टी फडणवीस यांनी दाखवली आहे. तर दुसरीकडे नवनवे उद्योग महाराष्ट्रात यावेत यासाठी पायाभूत सुविधांच्या निर्मितीसह उद्योगानुकूल वातावरणनिर्मितीवर ते भर देत आहेत. त्यामुळे मधल्या काळात परकीय गुंतवणुकीच्याबाबतीत काहीसा माघारलेला महाराष्ट्र पुन्हा एकदा अव्वल स्थानावर पोहोचला आहे. एवढंच नाही तर समृद्धी महामार्गासह उत्तम दर्जाचे रस्ते, मुंबई, पुणे, नागपूरसारख्या शहरांमध्ये प्रवास सुलभ व्हावा यासाठी मेट्रोंचं जाळं आदींच्या माध्यमातून दळणवळण सुलभ व्हावं याकडेही त्यांनी विशेष लक्ष दिलेलं आहे.   

मागच्या काही काळापासून राज्यामध्ये आरक्षणासारख्या संवेदनशील विषयांवरून तणाव वाढत असताना देवेंद्र फडणवीस यांनी संयमी राजनेत्याचं दर्शन घडवलं आहे. पूर्वी राज्याचं मुख्यमंत्रिपद भूषवताना आणि आता उपमुख्यमंत्रिपदावर असतानाही देवेंद्र फडणवीस यांनी जातपात न पाहता समाजातील सर्व समाजघटकांना सोबत घेऊन पुढे जाण्यावर विश्वास ठेवून वाटचाल सुरू ठेवली आहे. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून टीकेचं लक्ष्य झाल्यानंतरही आपला तोल ढळू न देता मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळवून दिलं होतं. एवढंच नाही तर अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास मंडळ, सारथी, मराठा समाजातील विद्यार्थ्यांना आर्थिक सवलती आदी माध्यमातून मराठा समाजाच्या हितासाठी त्यांनी अनेक निर्णय घेतले. मात्र मराठा समाजासाठी निर्णय घेताना इतर समाजांकडे दुर्लक्ष होणार नाही, तसेच कुणाच्या हितांना बाधा येणार नाही, याचीही काळजी त्यांनी घेतली. त्याशिवाय विविध विकास योजनांचा लाभ देताना कुठल्याही जातीसमुहाला केंद्रस्थानी न ठेवता सर्वांना त्याचा लाभ मिळेल याची काळजी त्यांनी घेतली. 

देवेंद्र फडणवीस यांच्यामधील नेतृत्वगुणाचं वेगळेपण अधोरेखित करणारे आणखी काही गुण म्हणजे फडणवीस यांनी राजकारणाचा वापर वैयक्तिक हितसंबंध आणि संपत्ती गोळा करण्यासाठी केलेला नाही. राज्याच्या मुख्यमंत्रिपदासह अनेक महत्त्वाची पदं सांभाळतानाही फडणवीस यांनी कुठेही साखर कारखाने, शिक्षणसंस्था, बँका असल्या वैयक्तिक मालमत्ता उभ्या केलेल्या नाहीत. एवढंच काय तर मुंबईसारख्या शहरामध्येही स्वत:चं खासगी घरही घेलेलं नाही. इतर नेते आपल्या कुटुंबीयांना, नातेवाईकांना राजकारणात स्थापित करण्यासाठी आटापिटा करत असतानाही देवेंद्र फडणवीस असा गोष्टींपासून कोसो दूर राहिले आहेत. त्याबरोबरच पक्ष आणि विचारधारा यांच्यावर अढळ निष्ठा असलेल्या मोजक्या नेत्यांपैकी देवेंद्र फडणवीस हे एक आहे. २०२२ मध्ये राज्यात पुन्हा एकदा महायुतीचं सरकार स्थापन होत असताना पक्षाने आदेश दिल्यानंतर त्यांनी पक्षहित विचारात घेऊन सहजपणे उपमुख्यमंत्रिपद स्वीकारलं होतं. तसेच पक्षाला सक्षम बनवण्यासाठी पुढील वाटचाल सुरू केली होती.  फडणवीस यांच्या नेतृत्वातील याच वेगळेपणामुळे कदाचित राज्यातील आणि देशातील राजकारणात त्यांना पुन्हा एकदा मोठी संधी मिळू शकते.

Web Title: Maharashtra Assembly Election 2024: 'Maharashtra first, then party, finally self!' Devendra Fadnavis who proves not just words but actions

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.