महायुतीत भाजपच मोठा भाऊ! साताऱ्यातील आणखी एक मतदारसंघ मिळण्याचे प्रयत्न
By ऑनलाइन लोकमत | Published: October 25, 2024 08:32 PM2024-10-25T20:32:26+5:302024-10-25T20:35:24+5:30
Maharashtra Assembly election 2024: सातारा जिल्ह्यातील आणखी एक मतदारसंघ महायुतीत भाजपकडे जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे शिंदेंची शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी यांना प्रत्येकी दोन मतदारसंघ मिळणार आहे.
नितीन काळेल,सातारा
Maharashtra Assembly Election 2024 : विधानसभा निवडणुकीसाठी महायुतीतून सातारा जिल्ह्यातील सहा मतदारसंघाचा तिढा सुटला असला, तरी दोन मतदारसंघाचा घोळ सुरूच आहे. तरीही भाजप आणखी एक मतदारसंघ पदरात पाडून मोठा भाऊ होण्याच्या प्रयत्नात आहे. त्यामुळे शिंदेसेना आणि राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाच्या वाट्याला प्रत्येकी दोन मतदारसंघ येणार आहेत.
विधानसभा जागा वाटपाचे महाविकास आघाडी तसेच महायुतीतील गुऱ्हाळ सुरूच आहे. चर्चेच्या फेऱ्या रंगत आहेत. पण जागांचा तिढा सुटत नाही. सातारा जिल्ह्यातील आठपैकी सहा मतदारसंघांचे उमेदवार निश्चित झालेले आहेत.
कराड उत्तर आणि फलटणचा तिढा
भाजपने सातारा, माण आणि कऱ्हाड दक्षिणचा उमेदवार जाहीर केला आहे. तर शिंदेसेनेने पाटण आणि कोरेगावच्या शिलेदारांवर शिक्कामोर्तब केले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसनेही वाईचा उमेदवार दिला आहे. त्यामुळे आता कऱ्हाड उत्तर आणि फलटण मतदारसंघ मिळविण्यासाठी महायुतीत बोलणी सुरू आहे. गुरुवारी रात्रीपर्यंत यावर तोडगा निघेल, असे सांगण्यात येत होते. पण बैठकांवर बैठका झाल्या तरी तिढा दृष्टिक्षेपात नाही.
कऱ्हाड उत्तर मतदारसंघाचे आमदार बाळासाहेब पाटील आहेत. त्यामुळे राष्ट्रवादीला हा मतदारसंघ हवा आहे. याठिकाणी भाजपच्या एखाद्या नेत्याला प्रवेश देऊन जागा लढविण्याच्या प्रयत्नात राष्ट्रवादी आहे. पण भाजपही या मतदारसंघावरील दावा सोडायला तयार नाही. त्यामुळे रस्सीखेचीत मतदारसंघ वाटपाचे घोडे अडले आहे.
फलटणसाठी अजित पवार आग्रही
फलटण मतदारसंघ राखीव आहे. याठिकाणी भाजपचे माजी खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर हे उमेवार देण्याच्या तयारीत आहेत. पण याठिकाणी राष्ट्रवादीचा आमदार होता.
येथील आमदार दीपक चव्हाण यांनी नुकताच शरद पवार गटात प्रवेश केला आहे. तरीही या मतदारसंघासाठी राष्ट्रवादी आग्रही आहे. तसेच भाजपलाही मतदारसंघ हवा आहे. त्यामुळे फलटण मतदारसंघाचा घोळ संपेना, अशी स्थिती आहे.