विदर्भ: जागांवरून महायुतीत रस्सीखेच; भाजपला हव्या ५०पेक्षा अधिक जागा, त्याग कोण करणार?

By यदू जोशी | Published: October 22, 2024 11:51 AM2024-10-22T11:51:11+5:302024-10-22T11:53:10+5:30

मित्रपक्ष शिंदेसेना व अजित पवार गटाला त्यागाची भूमिका घ्यावी लागणार, असे चित्र आहे

Maharashtra Assembly Election 2024 Mahayuti seat sharing stuck in Vidarbha as BJP wants more than 50 seats | विदर्भ: जागांवरून महायुतीत रस्सीखेच; भाजपला हव्या ५०पेक्षा अधिक जागा, त्याग कोण करणार?

विदर्भ: जागांवरून महायुतीत रस्सीखेच; भाजपला हव्या ५०पेक्षा अधिक जागा, त्याग कोण करणार?

यदु जोशी, लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: विदर्भात भाजपला ४५ जागा मिळतील अशी चार दिवसांपूर्वीपर्यंत परिस्थिती असताना आता भाजपने ५० हून अधिक जागांचा आग्रह धरल्याने मित्रपक्ष शिंदेसेना व अजित पवार गटाला त्यागाची भूमिका घ्यावी लागणार, असे चित्र आहे. 

अमरावती विभागात भाजपला ३२ पैकी २४ आणि नागपूर विभागात ३० पैकी २७ जागा मिळण्याची शक्यता आहे. अमरावती जिल्ह्यातील अमरावती शहराची जागा अजित पवार गटाला, बडनेराची जागा अपक्ष रवि राणा यांना तर दर्यापूरची जागा शिंदेसेनेला देण्यात येणार असल्याचे खात्रीलायक सूत्रांनी सांगितले. भाजप तिथे तिवसा, धामणगाव रेल्वे, मेळघाट, वरुड-मोर्शी आणि अचलपूरची जागा लढणार असल्याचे समजते. वरुड-मोर्शीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत असलेले देवेंद्र भुयार सध्या आमदार आहेत. 

बुलडाणा जिल्ह्यातील मेहकर, सिंदखेड राजा व बुलडाणा, यवतमाळ  जिल्ह्यातील दिग्रस या जागा शिंदेसेना लढू शकते. पुसदची जागा अजित पवार गटाकडे जाईल, हे जवळपास स्पष्ट आहे. नागपूर विभागात रामटेक आणि भंडारा या दोन जागा शिंदेसेनेला तर सडक अर्जुनीची जागा अजित पवार गटाकडे जाण्याची शक्यता आहे. नागपूर विभागात ३० पैकी  तीन जागा मित्रपक्षांनी घ्याव्यात यासाठी भाजप आग्रही असल्याचे सूत्रांनी सांगितले. तर शिंदेसेना १० जागांसाठी आग्रही आहे. 

अकोला जिल्ह्यातील बाळापूरची जागा भाजपला की, शिंदेसेनेला याचा फैसला झालेला नाही. तिथे शिंदेसेनेने सुचविलेल्या उमेदवाराच्या नावाला भाजपची संमती नाही. भाजप या जागेसाठी आग्रही आहे. तसे झाले नाही तर उमेदवार भाजपने द्यावा, जागा शिंदेसेनेने लढवावी, असाही पर्याय समोर येऊ शकतो. हा विषय सध्या अनिर्णित आहे.

कोणाला मिळणार संधी?

  • अकोटमध्ये विद्यमान आमदार प्रकाश भारसाकळे यांची उमेदवारी जवळपास पक्की आहे, पण गेल्यावेळी अपक्ष लढून २८ हजार मते घेणारे अनिल गावंडे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सोमवारी भेट घेतली.
  • मूर्तिजापूरमध्ये विद्यमान आमदार हरिश पिंपळे यांचा पत्ता कापला जाण्याची शक्यता आहे. तिथे गेल्यावेळी राष्ट्रवादीकडून लढून ४१ हजारावर मते घेतलेले पण तिसऱ्या क्रमांकावर राहिलेले रविकुमार राठी यांना भाजप उमेदवारी देणार, अशी जोरदार चर्चा आहे.
  • वाशिममधून विद्यमान आमदार लखन मलिक यांच्या उमेदवारीवरील टांगती तलवार कायम आहे. त्यांचा पर्याय खुला ठेवतानाच भाजपने अन्य पर्यायांवर गांभीर्याने विचार सुरू केल्याचे समजते.

Web Title: Maharashtra Assembly Election 2024 Mahayuti seat sharing stuck in Vidarbha as BJP wants more than 50 seats

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.